कॅरिबू पर्वत: कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या आग्नेय भागातील एक पर्वतराजी. लांबी सु. ३२० किमी. फ्रेझर व तिची उपनदी टॉम्सन या नद्यांच्या वाकणात व रॉकी पर्वताला समांतर हा विस्तारला आहे. अति खडकाळ परंतु रौद्र सौंदर्याने नटलेल्या ह्या पर्वताचे अनेक प्रवाशांना आकर्षण वाटते. सर विल्फ्रेड लॉरियर हे ३,५८० मी. उंचीचे सर्वोच्च शिखर कॅरिबूच्या आग्नेयीस आहे. १८६० च्या सुमारास कॅरिबूवर सोन्याच्या खाणी सापडल्या. पुढे सोन्याचे साठे संपुष्टात आल्याने लोक लाकूडउद्योग, शेती, पशुपालन व शिकार करून राहू लागले. कॅरिबूच्या दक्षिण विभागात वेल्स ग्रे प्रॉव्हिन्शिअल पार्क हे प्रख्यात उपवन आहे. त्यांत काही सुंदर सरोवरे आहेत.

ओक, द. इ.