भिवापूर : महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या ८,२५३ (१९७१). हे उमरेडच्या दक्षिणेस २४ किमी. मारू नदीकाठी वसलेले आहे. भीमाजी नावाच्या गवळ्याने हे वसविले असे म्हणतात. तसेच भिवापूर हा ‘भीमपूर’ याचा अपभ्रंश असावा. येथे हातमाग उद्योगाचा विकास झालेला असून आसमंतातील कृषिमालाची ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथे दर शुक्रवारी भरणारा आठवड्याचा गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची सोय असून आरोग्य केंद्र व गुरांचा दवाखानाही आहे. देवगडच्या गोंड राजाच्या पूर्वजांनी सु. ३५० वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष येथे आढळतात.

गाडे, ना. स.