भिवपुरी : महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध वीजनिर्मिती केंद्र. टाटांच्या ‘आंध्र व्हॅली पॉवर सप्लाय कंपनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील विद्युत्निर्मिती केंद्रामुळे यास महत्त्व प्राप्त झाले आहे. पश्चिम घाटातील प्रचंड जलप्रपातांपासून वीजनिर्मिती करण्याची योजना सर जमशेटजी टाटा यांनी आखली. या प्रकल्पाची पायाभरणी १९११ साली झाली. १९१५ पासून भिवपुरीबरोबरच खोपोली येथील केंद्रातून वीजउत्पादनास सुरुवात झाली. या कंपनीमार्फत आंध्र नदीवर धरण बांधण्यात येऊन तेथील पाणी २,६५२ मी. लांबीच्या बोगद्यातून नळद्वारे भिवपुरी येथील ७२,००० किवॉ. क्षमतेच्या विद्युत्निर्मिती केंद्रात आणले जाते. येथून मुंबई शहरास वीजपुरवठा केला जातो.
गाडे, ना. स.