बहाउल्ला : (१२ नोव्हेंबर १८१७-२९ मे १८९२). बहाई धर्माचे संस्थापक. बहाउल्ला वा बहाअल्लाह ही इराणमधील मिर्झा हुसेन अली नूरी यांनी धारण केलेली एक उपाधी होय. ‘वहा’ या फार्सी शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज वा ऐश्र्वर्य असा आहे. म्हणून ‘बहाउल्ला’ म्हणजे ‘ईश्र्वरी तेज’ असा अर्थ होतो. त्यांनी आपण ईश्र्वरी आविष्कार आहोत अशी घोषणा केलेली असल्यामुळे ‘बहाउल्ला’ ही उपाधी धारण केली.
इराणच्या एका खानदानी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इराणी शहाच्या मंत्रिमंडळात होते. बहाउल्ला यांना मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. ते लहानपणापासूनच धार्मिक होते आणि दैवी चमत्कार करून लोकांना प्रभावित करीत होते. ते कधीही शाळेत गेले नव्हते. १८४७ च्या सुमारास त्यांनी ⇨ बाबचे शिष्यत्व पतकरले. बाब व बहाउल्ला यांची प्रत्यक्ष भेट मात्र झाली नव्हती. पुढे बाबच्या हत्येनंतर त्यांच्या दोन अनुयायांनी इराणच्या शहाचा वध करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. बहाउल्लांना या कटाची माहिती नव्हती, तरीही त्यांना अटक करण्यात आली, त्यांचा छळ करण्यात आला. याच काळात त्यांना काही दृष्टांत झाले आणि आपल्या हातून ईश्र्वरी कार्य होणार असल्याची जाणीव त्यांना झाली. सुटकेनंतर ते बगदादला (इराक) आले. बाबने आपला आध्यात्मिक वारस म्हणून बहाउल्लांचा सावत्र भाऊ मिर्झा यह्या ऊर्फ सुबह-इ- अझल याची नेमणूक केली होती परंतु तो वयाने लहान व एकांतप्रिय असल्यामुळे बाबी पंथाच्या नेतृत्वाची जबाबदारी अप्रत्यक्ष रीत्या बहाउल्लांवरच येऊन पडली. बगदादला आल्यावर त्यांनी दोन वर्षे (१९५४ — ५६) कुर्दिस्तानमध्ये एकांतात व्यतीत केली. हा त्यांच्या आध्यात्मिक तयारीचा काळ मानला जातो. त्यानंतर बगदादमध्ये त्यांचा प्रभाव वाढू लागला. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनुयायांसह तेथूनही हद्दपार करावे, असे इराणी सरकारने तुर्की सरकारला सुचविले.
बगदादहून जाण्यापूर्वी बारा दिवसपर्यंत ते बगदादच्या वेशी- बाहेरील रिजव्हान नावाच्या बागेत राहिले. बाबने ज्याच्या आगमनाची पूर्वसूचना दिली होती, तो ईश्र्वरी आविष्कार मीच होय, असे तेथे त्यांनी आपल्या काही अनुयायांपुढे घोषित केले (२१ एप्रिल १८६३). त्यानंतर त्यांना कॉन्स्टँटिनोपल येथे आणि तेथूनही एड्रिअँनोपल येथे हद्दपार करण्यात आले. तेथेच त्यांनी आपण ईश्र्वरी आविष्कार असल्याचे जाहीर रीत्या घोषित केले (१८६७) आणि तशा अर्थाची पत्रे त्यांनी पोप व इस्लामी धर्मगुरू यांना लिहिली. तसेच इराण, रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रिया इ. राष्ट्रांच्या प्रमुखांनाही त्यांनी पत्रे लिहिली आणि आपल्या कार्यास पाठिंबा देण्याची विनंती केली.
यानंतर बहुसंख्य ‘बाबीं’ नी बहाउल्लांचे अनुयायित्व स्वीकराले. ते अनुयायी आता स्वतःला ‘बाबी’ म्हणून घेण्याऐवजी ‘बहाई’ म्हणवू लागले. बहाउल्लांनी स्वतःच्या धर्मविषयक स्वतंत्र कल्पना मांडण्यास सुरूवात केली. अशा रीतीने बाबी पंथातूनच बहाई धर्माचा उदय झाला. काही थोड्या बाबींनी मात्र सुबह-इ-अझलचे नेतृत्व मान्य करून बाबी पंथाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविले. परंतु या वेळी या दोन गटांत बराच संघर्ष सुरू झाला. तेव्हा तुर्की सरकारने बहाउल्लांना पॅलेस्टाइनमधील अक्का वा एकर या ठिकाणी आणि सुबह-इ अझल याला सायप्रसमधील फामागूस्टा येथे हद्दपार केले. बहाउल्ला अखेरपर्यंत अक्का येथेच होते. त्यांच्या हयातीतच बहाई धर्म जगातील अनेक देशांतून पसरला.
आपल्या विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी शंभरांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी अल्-किताब अल् अक्-दस (पवित्रतम ग्रंथ), किताब-इ-ईकान (द बुक ऑफ सर्टिट्यूड), कलामत-ए-माक्नून (हिड्न वर्डस) इ. प्रसिद्ध होत. त्यांशिवाय त्यांच्या अनेक प्रार्थना, उपदेशपर वचने इ. प्रसिद्ध आहेत. त्यांचे ग्रंथ हे बहाई धर्माचे धर्मग्रंथ असून सध्याच्या युगासाठी ते ईश्र्वरानेच आविष्कृत केले आहेत, असे बहाई लोक मानतात. बहाउल्लांनी सर्व मानवजातीचे ऐक्य, विश्र्वशांती, परस्परांवरील प्रेम इ. तत्त्वांचा प्रसार केला. कर्मकांड, पुरोहित इत्यादींना स्थान ठेवले नाही. सर्व धर्मांचे सार एकच आहे, विश्र्वनिर्माता ईश्र्वर अज्ञेय आहे, सर्व ईश्र्वरी दूत एकच आहेत, ईश्र्वरी दूत सर्व कालांत अवतरत असल्यामुळे कोणीही शेवटचा प्रेषित नव्हे इ. सिद्धांत त्यांनी मांडले. [→ बहाई धर्म]. मानवजातीला संकुचितपणापासून व्यापकतेकडे व कलहापासून सहकार्याकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी आपला ज्येष्ठ पुत्र अब्बास एफेंडी ऊर्फ अब्दुल-बहा (तेजाचा सेवक) याला आपला आध्यात्मिक वारस नेमले आणि आपल्या तत्त्वांचे स्पष्टीकरण करण्याचा अधिकार त्याला दिला.
बहाई लोकांच्या मते बहाउल्ला हा हिंदूंकरिता कृष्णाचा वा कल्कीचा अवतार आहे. तसेच, बौद्धांकरिता पाचवा बुद्ध, यदुही लोकांकरिता सनातन पिता, मुसलमानांकरिता पुन्हा प्रकट झालेला इमाम आणि ख्रिस्ती लोकांकरिता पुनरागत ख्रिस्त आहे.
संदर्भ : Esslemont, J. E. Bahaullah and the New Era, Delhi, 1969.
बेही, एच्. साळुंखे, आ. इ.
“