मठ : अमरकोशातील व्याख्येनुसार मठ म्हणजे छात्र वगैरेंचे निवासस्थान. सामान्यतः ब्रह्मचारी, साधू, संन्यांसी, बैरागी, भिक्षू इ. प्रकारच्या स्त्रिया वा पुरूष यांच्या निवासस्थानास मठ म्हटले जाते.संस्कृतमधील ‘मठ्’ (वास्तव्य करणे) या धातूपासून हे नाम बनले आहे. याउलट या नामापासूनच तो धातू बनविण्यात आला, असेही एक मत आहे. धर्म, संप्रदाय, कालखंड, उद्देश इ. मधील भिन्नतेनुसार मठवासी व्यक्तींचा तेथील निवास तात्पुरता व स्थायी असा दोन्ही प्रकारचा असल्याचे आढळते. धार्मिक उपासनेत जीवन व्यतीत करणे, गूढवाद आणि संन्यास यांच्याकडे वळण्याची मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती मठसंस्थेला जन्म देते, असे म्हटले जाते. लौकिक समाजात राहून आपले अंतिम कल्याण साधणार नाही असे ज्यांना वाटते, ते लोक मठजीवनाकडे आकृष्ट होतात. भारतीय लोकांना ⇨ मोक्षाचे आकर्षण वाटत असल्यामुळे फार प्राचीन काळापासूनच त्यांनी मठसंस्थेला साजेसे आश्रमजीवन स्वीकारले होते [→ आश्रमव्यवस्था]. मठवासी व्यक्तींकडून ⇨ ब्रह्मचर्य, अपरिग्रह, वैराग्य, एका ठिकाणी स्थिर वास्तव्याचा अभाव, भिक्षेवर उपजीविका, पारलौकिक जीवनाचे चिंतन, अध्ययन, मोक्षप्राप्ती इ. बाबतींतील विविध व्रतांची अपेक्षा केली जाते.

मठसंस्था पारलौकिक जीवनाशी निगडित अशा कामांबरोबरच ऐहिक स्वरूपाची अनेक कामेही पार पाडत असते. उदा., काही ठिकाणी ती आरोग्यविषयक कामे करते तसेच काही धर्मांमध्ये राजकीय सैनिकी स्वरूपाची कामेही करते. धार्मिक व धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणसंस्थांची निर्मिती व जपणूक हे तिचे एक महत्त्वाचे काम होय. शिवाय, संस्कृतीची अनेक वैशिष्टये भावी पिढ्यांकडे संक्रांत करण्याचे कामही ती पार पाडते. यूरोपमध्ये रोमन साम्राज्याच्या पतनानंतर सु. एक हजार वर्षे संस्कृतीच्या संरक्षणाचे काम मठसंस्थेने केले, असे मानले जाते. तेथील गॉथिक कालखंडापर्यंतची मध्ययुगीन कला हे मठसंस्थेच्या कलेपासून अलग करता येत नाही, असे म्हणता येईल.[⟶ धार्मिक कला मध्ययुग, यूरोपीय].

हिंदू मठ : बौद्ध संघांची निर्मिती होण्यापूर्वीपासूनच हिंदू धर्मात आश्रमव्यवस्था होती परंतु प्रत्यक्ष मठसंस्था होती, असे मात्र दिसत नाही. शेवटच्या वानप्रस्थ व ⇨ संन्यास ह्या दोन आश्रमांमध्ये एके ठिकाणी स्थिर न राहता विरक्त वृत्तीने हिंडत रहावे अशी अपेक्षा होती आणि त्यामुळे त्या कालखंडातील जीवन मठजीवनासारखेच होते, असे मात्र म्हणता येईल. बौद्ध धर्माच्या उदयानंतर मात्र ⇨ हिंदूधर्मातही मठसंस्थेचा विकास झाला.

नियंत्रण ठेवणाऱ्या एका केंद्रीय सत्तेचा अभाव, हे हिंदू मठसंस्थेचे वैशिष्ट्य होय. या बाबतीत ती ख्रिस्ती व बौद्ध धर्मांहून वेगळी आहे. मठ हे कायमचे निवासस्थान असण्यापेक्षा ⇨ धर्मशाळेप्रमाणे प्रवासातील मुक्कामाचे एक ठिकाण म्हणूनच उपयोगी पडत होते, असे दिसते. महंत वगैरेंचे मात्र मठात कायम वास्तव्य असे आणि ते प्रवाशांची व्यवस्था ठेवीत असत. मठप्रमुखाला मठाधिपती, मठाध्यक्ष वगैरे म्हटले जाई. वेगवेगळ्या संप्रदायांचे वेगवेगळे मठ असतात व अनुयायी आपापल्या संप्रदायाच्या मठात वास्तव्य करतात. मठवास पतकरण्यामागे धार्मिक उद्देश असतात परंतु विनासायास उपजीविका चालते, म्हणून मठवास पतकरणारे लोकही आढळतात. काही वेळा मंदिरांना जोडून मठ, तर काही वेळा मठांना जोडून मंदिरे, अशी स्थिती आढळते. उदा., गुजरातमधील येवूरचा मठ सोमनाथच्या मंदिराला जोडलेला आहे, तर कदंबेश्वराचे मंदिर बंकापूरच्या मठाला जोडलेले आहे.[⟶ देवालय मंदिर – वास्तुकला]. मठवासी व्यक्ती संन्यस्त वृत्तीच्या असाव्या, अशी अपेक्षा असते. परंतु अनेक मठांकडे मात्र संपत्ती व जमीनजुमला भरपूर असल्याचे आढळते. कारण राजेरजवाड्यांपासून सामान्य माणसांपर्यंत विविध थरांतील लोक मठांना अनेक प्रकारच्या देणग्या देत असतात. अशा देणग्यांमुळे पुण्य प्राप्त होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. पुण्यप्राप्तीच्या इच्छेनेच मठ बांधून त्याचे ⇨ दान देण्याची प्रथा आढळते. देशाच्या कानाकोपऱ्यांतून ⇨ शैव, वैष्णव, महानुभाव इ. संप्रदायांचे विविध मठ आढळतात. ⇨ वीरशैवांचेही मठ आढळतात. आद्य ⇨ शंकराचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी व कांची कामकोटी या ठिकाणी स्थापन केलेले मठ विख्यात आहेत. ⇨ रामानुजाचार्य,वल्लभाचार्य, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू इ. आचार्यांनी प्रवर्तित केलेल्या संप्रदायांचेही विविध मठ आढळतात. ⇨ गोसावी – बैरागी यांचेही अनेक मठ भारतात आढळतात. गोसाव्यांचे निरंजनी, निर्वाणी, अटल, सनातनी, अग्नी, अभान व आनंद हे सात सांप्रदायिक संघटनेचे प्रसिद्ध ’आखाडे’ वा मठ आहेत. समर्थ ⇨ रामदासांनी पुष्कळ मठ स्थापन केल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या त्यांपैकी फक्त ११० मठांचीच माहिती मिळते. विद्यादान, उत्सव, अन्नछत्रे, हस्तलिखितांचे अस्तित्व, धार्मिक कर्मकांड, बलोपासना इ. मुळे मठ हे एक सांस्कृतिक केंद्र ठरत असे. हिंदूंचे मठ बौद्ध बिहारांइतके भव्य मात्र नव्हते. बंगालमध्ये बौद्ध धर्मांची पीछेहाट झाल्यानंतर काही बौद्ध विहारांचे हिंदू मठांत रूपांतर झाले.

बौद्ध मठ : जगातील इतर कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्मामध्ये मठसंस्थेला अधिक महत्त्व आहे. किंबहुना बौद्ध धर्म हा प्रामुख्याने मठसंस्थेवरच आधारलेला आहे, असेही म्हणता येईल. बौद्ध धर्मात, मठसंस्था या अर्थाने ‘संघ’ हा शब्द वापरला जातो. बौद्ध धर्मातील ही मठसंस्था स्वतः गौतम बुद्धाच्या काळातच अस्तित्वात आली होती. बौद्ध मठांना ⇨  विहार म्हटले जाते. ‘आराम’,‘संघाराम’ असे शब्दही मठ या अर्थाने वापरले जातात. मूळच्या व्यवस्थेप्रमाणे विहार ही भिक्षूंची घरे वा निवासस्थाने नव्हती. कारण त्यांनी सतत हिंडावे आणि पर्णशाला, झाडे इ. च्या आश्रयाने रहावे, असा नियम होता. पावसाळ्यात मात्र त्यांनी विहारामध्ये वास्तव्य करावे, अशी अपेक्षा होती. परंतु क्रमाक्रमाने भिक्षू स्थिरावू लागले आणि विहार ही त्यांची निवासस्थाने बनली.

सर्व जातींच्या लोकांना विहारात प्रवेश मिळत असे आणि बौद्ध धर्माचे हे एक खास वैशिष्ट्य होते. बौद्ध धर्माच्या व्यापक प्रसारामागचे हे एक महत्त्वाचे कारण होते. अर्थात, जातीचे बंधन नसले, तरी चारित्र्य, अज्ञान मुलाच्या पालकांची संमती इ. सारखी अन्य बंधने मात्र होती. गौतम बुद्ध स्त्रियांना बौद्ध संघात प्रवेश देण्यास प्रारंभी तयार नव्हते परंतु आपली मावशी तसेच शिष्य ⇨ आनंद यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्त्रियांनाही भिक्षुणी बनून मठात राहण्याची परवानगी दिली. भिक्षूंना मठातील वास्तव्यामध्ये अध्ययन, आचरण, वेष, भिक्षा इ. बाबतीत विविध प्रकारच्या नियमांचे पालन करावे लागत असे.⇨ तक्षशिलानालंदा इ.ठिकाणचे विहार विख्यात असून विद्याकेंद्रे म्हणूनही त्यांची कीर्ती झाली होती. चिनी प्रवाशांनी भारतातील बौद्ध विहारांची वर्णने करून ठेवली आहेत. भारताच्या विविध प्रांतांतून असंख्य विहार होते. बिहार प्रांतात असलेल्या असंख्य विहारांमुळेच त्या प्रांताला ‘विहार’ म्हणजे ‘बिहार’ असे नाव मिळाले आहे.


तिबेटमध्ये फार मोठे बौद्ध मठ आढळतात. त्यांपैकी काही तर दहा – दहा हजार बौद्ध भिक्षूंना वास्तव्य करता येईल, इतके प्रचंड आहेत. त्यांचे उत्पन्न व वैभवही मोठे होते. तेथे मठ हे फक्त एक आध्यात्मिक केंद्रच होते असे नाही, तर न्यायालय, विद्यालय, बँक, आणि सर्वसामान्य लोकांचे गप्पागोष्टींचे ठिकाण असेही त्याचे स्वरूप होते. मंगोलियातही मोठमोठे मठ होते. चीनमधील मठ उपेक्षित असून बऱ्याच काळापासून विद्यालय वगैरेंसारख्या इतर कामांसाठीच त्यांचा उपयोग करण्याची पद्धत रूढ झाली आहे. तेथील ताओ धर्मामध्ये [⟶ ताओ मत] बौद्ध धर्माप्रमाणे मठांना प्राधान्यही नाही आणि ⇨ कन्फ्यूशसच्या संप्रदायाप्रमाणे मठांचा अगदी अभावही नाही. काही ताओ अनुयायी मठांतून ध्यानधारणा करीत. जपानमधील बौद्ध मठ भव्य असून त्यांचे शिल्पसौंदर्य आकर्षक आहे. तेथे वेगवेगळ्या पंथांचे मठ बघताना वास्तुशिल्पही वेगवेगळे वापरल्याचे आढळते. जपानमधील ⇨ शिंतो धर्मात मठ नाहीत. कोरियामधील बौद्ध मठ लहान असून २५ – ३० भिक्षूंना राहता येईल एवढाच त्यांचा विस्तार असतो. तेथील मठांच्या भिंतींवर बुद्धाच्या जीवनावरील चित्रे आढळतात, हे या मठांचे एक खास वैशिष्ट्य होय. श्रीलंकेत दहा – वीस भिक्षूंना राहता येईल, असे लहान मठ आढळतात. इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून इ.स. च्या दहाव्या शतकापर्यंतचा काळ हा तेथील मठांच्या दृष्टीने उत्कर्षाचा होता. ब्रह्मदेशातील मठ ही अध्ययनाची केंद्रे बनली होती. तेथील प्रत्येक मुलाला मठामध्ये शिक्षण घ्यावे लागत असे. त्यामुळे ब्रह्मदेशातील सर्व पुरूषवर्गाला मठजीवनाचा परिचय झालेला असे. तेथे साक्षरता आणि राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही घटना खूपच उपकारक ठरली होती. सयाममध्येही प्रत्येक मुलाला केव्हा ना केव्हा मठात वास्तव्य करावे लागत असे. वास्तव्याचा काळ किमान तीन महिन्यांचा असे. लौकिक जीवनात प्रवेश केल्यावरही लोकांना आपापल्या मठाविषयी आत्मीयता वाटे व ते त्या मठाला देणग्या वगैरे देत असत. तेथील मठसंस्थेवर राजाचाच अधिकार चालतो, हे तिचे एक खास वैशिष्ट्य होय. मध्य आशियातही मोठमोठे बौद्ध मठ होते, असे चिनी प्रवाशांच्या वर्णनांवरून व अलीकडच्या उत्खननांवरून स्पष्ट झाले आहे.[ ⟶ बौद्ध धर्म बौद्ध धर्मपंथ].

साळुंखे, आ. ह.

जैन मठ : बौद्ध धर्माप्रमाणेच जैन धर्मामध्येही मठसंस्थेला बरेच प्राधान्य आहे. जैन धर्मातील धनवान असा व्यापारी वर्ग मठसंस्थेला मोठ्या प्रमाणात धर्मश्रद्धेने आर्थिक साहाय्य करीत असतो.

जैनांचे श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन संप्रदाय निर्माण झाले. श्वेतांबरांमधील ’जती’ म्हणजेच ’श्रीपूज्य’ हे चैत्यवासी शाखेचे अनुयायी मानले जातात. चैत्यवासी म्हणजे मठवासी. दिगंबरांमधील भट्टारक किंवा गच्छनायक हे मठवासी बनले.भट्टारक हे कालांतराने आपल्या मठात राहून एखाद्या राजाप्रमाणे धार्मिक व सामिजिक अधिकार गाजवू लागले. ऐतिहासिक दृष्टीने पाहता मठसंस्था ही एक सामाजिक गरज मानावी लागेल. दक्षिण भारतामध्ये कारंजा, लातूर, मालखेड, कोल्हापूर, मूदबिद्री, कारकल, हुमच इ. ठिकाणी प्रसिद्ध जैन मठ आहेत तसेच उत्तरेत गिरनार, शत्रुंजय, पावापुरी, कुंथलगिरी (कुंथुगिरी) इ. तीर्थस्थळी त्यांचे हे प्रमुख मठ आहेत.

मठ हे राजवाड्याप्रमाणे असत, मठाधिपाच्या ताब्यात जमीनजुमला, नोकरचाकर, गाडीघोडे आणि बरीच संपत्ती असे. आपल्या अखत्यारीतील ठिकाणी दौरा करून वार्षिक कर वसूल करणे, मंदिरे बांधणे, मूर्तींची स्थापना करणे, यात्रा, पूजामहोत्सव करणे, धार्मिक व लौकिक शिक्षणाची व्यवस्था करणे, पीठाची गादी चालविण्यासाठी शिष्य तयार करणे व आपापल्या पोटजातीच्या धार्मिक आणि सामाजिक व्यवहारांवर देखरेख ठेवून संघटन करणे ही कार्ये मठाकडून केली जात. अजूनही काही प्रमाणात ही कार्ये केली जातात. अनेक मठांतर्फे हल्ली धार्मिक, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाची विद्यालये – महाविद्यालये चालविली जातात. मठांमध्ये जतन केलेल्या जैन व जैनेतर विषयांवरील दुर्मिळ हस्तलिखितांचेही संशोधन – संपादन होत आहे.[⟶ जैन धर्म जैन मंदिर जैन संघ जैनांचे धर्मपंथ].

पाटील, भ. दे.

ख्रिस्ती मठ : ‘मोनाथेइन’ ह्या ग्रीक शब्दापासून ‘मोनॅस्टरी’ हा शब्द आला. त्याचा अर्थ एकाकी असणे, एकांतवासात जगापासून अलिप्त रहाणे. ॲ्बे, प्रॉयॉरी, ननरी कॉन्व्हेंट्स ह्यांचा ह्यात समावेश होतो.‘कॉन्व्हेंट’ हा शब्द भारतात विशेष परिचयाचा आहे. लॅटिन Convenire म्हणजे एकत्र येणे, या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. त्यात मठात मते देण्याचा पूर्णाधिकार असलेले मठवासी, मठातील सर्व मठवासी आणि मठ यांचा समावेश होतो. हा शब्द धर्मभगिनींच्या (नन्सच्या) गटासाठी आणि त्या जेथे राहतात त्या इमारतीसाठीही वापरला जातो. ख्रिस्ती मठांची स्थापना होण्याअगोदर हिंदू व बौद्ध धर्मीयांत मठांची स्थापना झाली होती.

ख्रिस्ती संन्याशांचा कुलपती (पेट्रिआर्क) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ईजिप्तमध्ये राहणाऱ्या सेंट अँटोनीच्या (अंतोनी : २५१/२ – ३५६/७) काळापर्यंत हे संन्यासी वाळवंटात एकटे राहात असत. संत अँटोनीने अशा विखुरलेल्या संन्याशांना एकत्र आणले तथापि त्यांचे वास्तव्य मात्र वेगवेगळेच असे. पाखोमिओस (२८७? – ३४७) याने ३२० – २५ च्या दरम्यान ईजिप्तमधील ताबेन्नीस येथे पहिला मठ बांधला आणि तेथे ते सर्व एकत्र राहिले. याच शतकाच्या मध्यावर स्त्रियांसाठी मठ स्थापन करण्यात आले. सहाव्या शतकात पश्चिम यूरोपात मठांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. मठाचा कारभार विस्कळित झाला होता. त्याची पुनर्रचना करून सुव्यवस्था लावण्यात आली. सेंट बेनेडिक्टने (४८०? – ५५०) इटलीतील माँटी कासिनो येथे मठ स्थापन केला. सेंट बेनेडिक्टच्या सहकाऱ्यांच्या शुद्ध व सदाचरणी जीवनाचा प्रभाव पडल्यामुळे मठवास स्वीकारणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. पुरूषांसाठी आणि स्त्रियांसाठी असलेल्या मठांचीही संख्या झपाट्याने वाढू लागली.


ख्रिस्ती मठवासियांचे जीवन तीन मूलभूत ध्येये किंवा प्रतिज्ञांवर आधारलेले आहे. त्यांना सुवार्तासंमत (इव्हॅन्जेलिकल) प्रतिज्ञा म्हणतात कारण सुवार्तेतील वचनांप्रमाणे अधिक चांगल्या रीतीने जीवन जगता यावे म्हणून या प्रतिज्ञांचा स्वीकार होतो. मठवासियाने आजन्म ब्रह्मचारी रहावे, नेहमी आर्थिक दारिद्र्यात रहावे (अपरिग्रह) व आज्ञापालन (सेवा) करावे अशा या तीन प्रतिज्ञा आहेत. मठवासियांना परिव्रज्येपासून परावृत्त करण्यासाठी सेंट बेनेडिक्टने एकाच ठिकाणी राहण्याचा आणखी एक नियम केला.“प्रार्थना करा व काम करा” (ओरा अेत लाबोरा), हे सेंट बेनेडिक्टचे ब्रीदवाक्य होते म्हणूनच मठ हे धार्मिक नूतनीकरणाचे आणि शेती व संस्कृतीचे केंद्र बनले. अशा रीतीने मध्ययुगीन यूरोपीय संस्कृतीचा पाया घातला गेला.

मध्ययुगात मठांनी आणखी एक अमोल सेवा केली. लढाया व इतर आपत्तींनी ग्रासलेल्या स्त्री – पुरूषांना आश्रय दिला. अभ्यासासाठी – विशेषतः लॅटिन भाषेच्या – लहान मुले मठवासियांकडे जाऊ लागली. मठ ही शिक्षणाची उत्तम केंद्रे झाली. विद्यार्थ्यासाठी व पंडितांसाठी लॅटिन हस्तलिखिते मठवासियांनी तयार केली. त्यामुळे प्राचीन ग्रंथांचेही आपोआप जतन झाले. गणित, विज्ञान, ज्योतिषशास्त्र, कृषी इ. विषयांत काही मठवासी प्रवीण असल्याची उदाहरणे आहेत. तसेच ह्या मठांतून ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास होऊ लागला, धर्मतत्त्वांची छाननी करून त्यांत कालानुसार मूळ प्रेरणा राखून आवश्यक बदल करण्याचे व त्यांची तर्कसंगत मांडणी करण्याचे कार्यही होऊ लागले. लॅटिन पंडित म्हणून मठवासियांची ख्याती झाली. हस्तलिखितांच्या प्रतींत आकर्षक चित्रे व रेखाकृती ह्यांचा समावेश करण्यात येऊन त्या अधिक आकर्षक करण्यात येऊ लागल्या. शोभित हस्तलिखितांची कला उदयास आली. १२०० वर्षापूर्वीचे द बुक ऑफ केल्ब्ज नावाने जगप्रसिद्ध हस्तलिखित ट्रिनिटी कॉलेज, डब्लिान येथे प्रदर्शनार्थ ठेवले आहे. आज यूरोपमध्ये जे प्राचीन वाङ्मपय व अभिजात वाङ्मसय उपलब्ध आहे, ते बहुतांश मठांनी त्यांचे काळजीपूर्वक जतन केल्यामुळेच आहे. 

पाश्चिमात्य देशांत बाराव्या शतकापासून पुढे ॲतसिसीचा सेंट फ्रान्सिस (११८२ ? – १२२६) आणि सेंट डॉमिनिक (११७० ? – १२२१) यांच्या भिक्षुसंघांचा मठवासी जीवनाच्या इतिहासावर फार मोठा परिणाम झाला. ज्या काळात व्यापाराच्या वाढीमुळे व पौर्वात्य देशांच्या संपर्काद्वारे संपत्ती व ऐश्वर्य मिळाले, त्या काळात त्यांनी स्वेच्छेने अतिशय दारिद्र्याचा स्वीकार केला. त्यांनी तत्त्वज्ञानाचा व ईश्वरविद्येचा सांगोपांग अभ्यास केला. कोलोनच्या सेंट ब्रूनोने (१०३० – ११०१) ‘कर्थूशन’ संघ स्थापन केला व विशेषतः पंधराव्या शतकात तो भरभराटीस आला. या भिक्षूंनी जवळजवळ आयुष्यभर एकांतात मौन पाळून चिंतन – मनन करण्यात आपले आयुष्य घालविले. ते एकांतात राहत व फक्त सामुदायिक प्रार्थनेसाठीच एकत्र येत.

प्रॉटेस्टंट धर्मक्रांतीच्या लाटेत मठांची संख्या बऱ्याच अंशी कमी झाली. प्रॉटेस्टंट प्रदेशात मठांच्या जमिनी व मिळकती राजे लोकांनी आपल्या ताब्यात घेतल्या व मठांच्या शिक्षणसंस्था आणि विश्वविद्यालये दुसऱ्यांच्या हातात दिल्या तथापि प्रॉटेस्टंट धर्मक्रांतीमुळे कॅथलिक आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांमध्ये मठांची पंरपरा मात्र बंद पडली नाही.

लॉयोलाकर सेंट इग्नेाशिअसने (१४९१ – १५५६) स्थापन केलेला ‘जेझुइट संघ’ (येशू संघ) फारच परिणामकारक ठरला. हा संघ आणि यानंतर निर्माण झालेले अनेक संघ सुवार्तासंमत प्रतिज्ञा स्वीकारून मठवासी जीवनात किंवा मठातील सामुदायिक पूजा – अर्चेस बांधलेले राहिले नाहीत. ते ‘ज्ञाननिष्ठ कर्मयोगी’  ठरले.

‘स्तारेत्स’ (बहुवचन – ‘स्तार्स्ती’) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियातील संन्याशांनी बराच काळपर्यंत परिणामकारक कार्य केले. पावित्र्य, आध्यात्मिक जीवनातील सखोल अनुभव आणि इतरांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे त्यांचे विशेष कार्य होते.

माऊंट ॲकथॉस या ग्रीसमधील अर्धबेटावर ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांच्या मठाचे मोठे केंद्र आहे. हे मठवासी केंद्र राजकीय दृष्ट्या जवळजवळ स्वतंत्र आहे. नामस्मरणासारख्या ‘येशू प्रार्थने’ चेही माऊंट अँथॉस एक मोठे केंद्र आहे.

मठाची परंपरा भारतात पूर्वापार चालत आली असली, तरी भारतामधील ख्रिस्ती मठांची संख्या फारच थोडी आहे. शैक्षणिक व धार्मिक शिक्षणाच्या केंद्रांत रूग्णसेवा करणारे अनेक स्त्री – पुरूष धर्मसेवक आहेत परंतु ही केंद्रे काटेकोर अर्थाने मठ नाहीत. भारतात जे काही ख्रिस्ती मठ आहेत, त्यांत पुरूषांसाठी पुढील चार मठ प्रमुख आहेत : आशीरवनम् (१५ मठवासी), केंगेरी, बंगलोर (५,६२,११८), कुरीसुमाला आश्रम (२६), व्हागगोन, जि, कोट्टयम् (६,८५,५०३). याशिवाय ’द सिल्व्हेस्ट्रियन बेनेडिक्टाईन संघ’ यांचे दोन मठ (२६ मंक – भिक्षू वा जोगी) आहेत : म्हणजे वनाश्रम बंगलोर (५६,०३६) व सेंट जोसेफचा मठ, थौउडरनाद, जि. वायनाड (६,७०,७३५).


स्त्रियांसाठी भारतात असणाऱ्या ख्रिस्ती मठांची संख्या जास्त आहे. ‘द ऑर्डर ऑफ द डिस्काल्स्ट कार्मेलाइट्स’ (अनवाणी कार्मेलाइट्स – संघ) यांचे मठ पुढील ठिकाणी आहेत : कलकत्ता (२० जोगिणी), क्विलॉन (१८), कुंभकोणम् (२२), कोईमतूर (२१), कोट्टयम् (२०), गोवा (२१), तंजावर (२२), तिरव्हाला (१९), तिरूचिरापल्ली (१८), पाँडिचेरी (२५), पुणे (८), मंगलोर (२१), मदुराई (१६), मुंबई (२०), रांची (२२), सालेम (२०).

‘द पूवर क्लेर्स कोल्लेटाईन्स’ (कोल्लेटाईन्स दीन क्लेर्स – १४) यांच्या संघाचे वेरापल्ली, डुमका (बिहार) आणि ऊटकमंड येथे मठ आहेत. ‘द पूवर क्लेर्स ऑफ पॅपेट्यूअल ॲ८डोरेशन’ (निरंतर आराधना करणाऱ्या दीन क्लेर्स) यांच्या संघाचे चानगाऊचेरी (१७), कोत्तार (१६), ऊटकमंड (२९) आणि क्विलॉन (३७) येथे मठ आहेत.

भारतामध्ये ख्रिस्ती मठांची संख्या कमी आहे असे नाही काही अंशी मठांचे कार्य आश्रमांमधूनही होत आहे. गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळीबरोबर ख्रिस्ती आश्रमचळवळ सुरू आहे. अशा काही प्रमुख आश्रमांची नावे, त्यांचे संस्थापक व स्थापना वर्षे खाली दिली आहेत :

अ.क्र. 

आश्रमाचे नाव 

संस्थापकाचे नाव 

स्थापना वर्ष 

१. 

क्रिस्तुकुलू आश्रम, तिरूपती, आंध्र प्रदेश. 

एस्. जेसुदासन आणि अर्नेस्ट फॅरेस्टर–पेटन 

१९२१ 

२. 

ख्रिस्तप्रेमसेवाश्रम, पुणे. 

जॅक विन्सलॉ 

१९२८ 

३. 

सात ताल आश्रम, पो. म्हेरागाव, उ. प्रदेश 

ई. स्टॅन्ली जोन्स 

१९३० 

४. 

शांतिवनम् आश्रम, कुलितलई, तमिळनाडू. 

जूल मॉशॅनॅः स्वामी अभिषिक्तानंद आणि बीड ग्रीफीथ 

१९५० 

५. 

जीवनधारा आश्रम, हृषीकेश, उत्तर प्रदेश. 

वंदना माताजी आणि ईशाप्रिया माताजी 

१९८० 

६. 

अंजली आश्रम, म्हैसूर. 

डी. एस्. अमलोएपवदास 

१९८३ 

गेल्या दोन महायुद्धांमुळे ग्रासलेल्या लाखो लोकांची सेवा मठवासी स्त्री – पुरूषांनी धर्मकृत्याच्या भावनेने केली. ख्रिस्ती मठांतून अनेक मिशनरी गांजलेल्या लोकांची सेवा करण्यास मानवतेच्या भावनेने जगभर गेले व त्यांनी मानवजातीवर अगणित उपकार केले. ‘ख्रिस्ती मठ’ ही आजही अर्थपूर्ण अशी संस्था आहे. हल्ली अनेक देशांमध्ये आध्यात्मिक विचार आणि ध्यानयोगाची केंद्रे म्हणून त्यांचा अनेकांकडून उपयोग केला जातो.

लेदर्ले, मॅथ्यू–रायनर

संदर्भ :  1. Bapat, P.V. Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

             2. Butler, C. Monasticism: Cambridge Medieval History, I. Cambridge, 1911.

             3. Delatte, Paul, A Commentary on the Rule of St. Benedict, London, 1921.

             4. Dutt. Nalinaksha, Early Monastic Buddhism, Calcutta, 1960.

             5. Ghurye, G.S. Indian Sadhus, Bombay, 1953.

             6. Hackmann, H. Eng. Trans. Buddhism as a Religion, London, 1910.

             7. Kitigawa, J.M. Religions of the East, Philadelphia, 1960.

             8. Oman, J.C. Mystics, Ascetics, and Saints of India, London, 1903.

             9. Rhys Davids, T.W. Buddhism, London, 1910.

             10. Stevenson, Sinclair, The Heart of Jainism, Oxford, 1915.

            ११. प्रेमी, नाथूराम, जैन साहित्य और इतिहास, मुंबई, १९५६.