बस्ती : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४९,६३५ (१९७१). हे फजाबादच्या पूर्वेस कुवाना नदीकाठी, लखनौ-बराउनी या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. २८) फैजाबाद-गोरखपूर यांदरम्यान वसले आहे. ते गोंडा-गोरखपूर या वायव्य लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. बस्ती शहर कृषि उत्पादनांचे व्यापारकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

सतराव्या शतकात औद्योगिक दृष्टया या शहरास फारसे महत्त्व नव्हते. येथे अठराव्या शतकात काही काळ अफूचा साठा करण्यात आला होता. १८६५ मध्ये हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनले व तेव्हापासून शहराची प्रगती होऊ लागली.

शहराचे जुने बस्ती, पक्का बाजार (उपनगर) व नागरी विभाग (सिव्हिल स्टेशन) असे तीन भाग आहेत. शहरात व परिसरात भात सडणे, तूर, डाळ, मोहरी, साखर इ. तयार करण्याचे उद्योगधंदे चालतात. येथे गोरखपूर विद्यापीठाशी संलग्न असलेले एक महाविद्यालय आहे.

चौंडे. मा. ल.