बसु, मणींद्रलाल : (८ जून १८९७- ). बंगाली कथाकार व कादंबरीकार. कलकत्ता येथे जन्म व शिक्षण. प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२० साली ते एम्. ए. झाले व १९२३ साली त्यांनी बी. एल्. ही कायद्याची पदवी घेतली. १९२६ साली लंडन येथून बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण यूरोपचा प्रवास केला. १९३० पासून कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वकिली.
रमला (१९२३) या पहिल्याच कादंबरीने मणींद्रलाल हे एकदम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. जीवनायन (१९३६) या उल्लेखनीय कादंबरीतील यौवनासुलभ मनोवृत्तीचे चित्रण त्यांनी अत्यंत समरतेने केलेले आहे. सहयात्रिणी (१९४१) ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय कादंबरी. अजयकुमार (१९३२) आणि सोनार काठी (१९३७) या किशोरवाचकांसाठी लिहिलेल्या कादंबऱ्या त्यांच्या लेखनशैलीच्या द्योतक मानल्या जातात. समकालीन तरूण लेखकांना त्यांच्या या शैलीचे फार आकर्षण वाटले न अनेकांनी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मायापुरी (१९२३), रक्तकमल (१९२४), सोनारहरिण (१९२४), कल्पलसा (१९३५), ऋतुपर्ण (१९३७) इ. त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत.
मणींद्रलालांच्या कथाकादंबऱ्यामध्ये नागरी संस्कृतीतील फॅशनेबल तरूणतरूणींचे जीवन चित्रित केलेले असते. त्यांच्या नायक-नायिका अभिरूचीसंपन्न, विलासी, सर्वगुणसंपन्न व भावनाप्रधान असतात आणि निवेदनातील भाषाशैलीही तशीच मुलायम व आकर्षक असते. व्कचित अशिष्ट (बोहीमियन) प्रवृत्तींचे व काही उच्चवर्गीय विकृतींचे चित्रण करणारे मणींद्रलाल हे बंगालीतील पहिले कादंबरीकार होत. यामुळे ते आधुनिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. विसाव्या शतकाच्या चौथ्या व पाचव्या दशकांमधील तरूण लेखकांवर मणींद्रलाल यांच्या लेखनाच्या प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.
आलासे, वीणा
“