बर्टन, रिचर्ड फ्रान्सिस :(१९ मार्च १८२१-२० ऑक्टोबर १८९०). प्रसिद्ध इंग्लिश समन्वेषक, चतुरस्त्र  विद्यावंत, बहुभाषाविद, अरेबियन नाइट्सचा श्रेष्ठ इंग्रजी भाषांतरकार तसेच बहुप्रसू लेखक. इंग्लंडमधील टॉर्की शहरी एका सधन कुटुंबात जन्म. त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल होते. बालपणातील त्याचा बराच काळ इटली आणि फ्रान्समध्येच गेला. ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना (१८४०-४२) त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे त्याला शिक्षणास मुकावे लागले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी पतकरून तो हिंदुस्थानात आला. सर चार्ल्‌स जेम्स नेपिअरला सिंधच्या स्वारीत त्याने मदत केली(१९४२). येथील त्याच्या वास्तव्यात त्याने अरबी, फार्सी, हिंदी (हिंदुस्थानी), मराठी वगैरे भाषा आणि अनेक बोली आत्मसात केल्या. (आयुष्याच्या अखेरीस त्याला २५ भाषा व १५ बोली अवगत होत्या, असे म्हटले जाते). कराचीत असताना त्याने समलिंगी कुंटनखान्यावर लिहिले. त्यामुळे  त्याची सैनिकी कारकीर्द संपुष्टात आली. लवकरच तो बूलोन (फ्रान्स) येथे आपल्या कुटुंबात परत आला आणि हिंदुस्थानावर त्याने चार ग्रंथ लिहिले. त्यांपैकी सिंध अँड द रेसिस दॅट इन्‌हॅबिट द व्हॅली ऑफ द इंडस हा ग्रंथ विशेष गाजला.

मुस्लिम यात्रेकरूच्या वेषात बर्टनने मक्का व मदिना या दोन पवित्र स्थळांची यात्रा करून प्रवासातील आपले अनुभव पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ पिल्‌ग्रिमेज टू एल् मदिना अँड मक्का या सुरेख प्रवासवर्णनात ग्रथित केले आहेत. (१८५५-५६). इंग्लंडला परतल्याबरोबर लगेचच तो क्रिमियन युद्धात सहभागी झाल (१८५५). यानंतर तो पूर्व आफ्रिकेतील हारर येथे गेला. येथे पाऊल ठेवणारा तो पहिलाच यूरोपीय. या सफरीबद्दल भौगोलिक माहिती देणारे त्याचे फर्स्ट फुटस्टेप्स इन ईस्ट आफ्रिका हे पुस्तक प्रसिद्ध झाले (१८५६). यानंतर जॉन स्पीक आणि त्याचे सहकारी यांच्यासमवेत त्याने श्वेत नाईलच्या शोधार्थ एक अयशस्वी सफर केली.

स्पीक व त्याचे सहकारी यांच्याबरोबर बर्टन १८५६ मध्ये पुन्हा आफ्रिकेच्या सफरीवर निघाला. यावेळी त्यांनी झांझिबारमधून प्रवास करून टांगानिका सरोवराचा शोध लावला. या प्रवासात बर्टन आजारी पडल्यामुळे स्पीकने एकट्यानेच आपली मोहीम तशीच पुढे चालू ठेवून व्हिक्टोरिया सरोवराचा शोध लावला. नाईल नदीचे उगमस्थान या सरोवरातच आहे, असे स्पीकचे मत होते. स्पीकचे हे मत बर्टनला मान्य नव्हते यामुळे दोघांमधील परस्पर सहकार्य संपुष्टात आले. बर्टनने स्पीकच्या सिद्धांतावर टीका करणारे लेक रीजन्स ऑफ सेंट्रल आफ्रिका हे पुस्तक लिहिले (१८६०). त्याने अमेरिकेला भेट देऊन सॉल्ट लेक सिटी येथील वास्तव्यात मॉर्मन चर्चचा अभ्यास करून सिटी ऑफ द सेंट्स हा ग्रंथ लिहिला इझाबेल ॲरंडेल हिच्याशी तो विवाहबद्ध झाला (१८६१). त्याच वर्षी पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरून पर्वतशिखरावर (४,०७० मी.) पाऊल ठेवणारा ते पहिला यूरोपीय ठरला.

विवाहानंतर बर्टनने ब्रिटिश परराष्ट्र खात्यात प्रवेश केला व फर्नांदो पो बेटावर तो वाणिज्यदूत म्हणून काम पाहू लागला. येथील तीन वर्षांच्या वास्तव्यात त्याने पश्चिम आफ्रिकेच्या सफरी करून विपुल लेखनही केले. यानंतर ब्राझीलमधील सँतुस येथे त्याने चार वर्षे अशाच पदावर काम पाहिले. याच काळात त्याने टेल्स ऑफ हिंदू डेव्हिल्री (१८७०) हे पुस्तक लिहिले. येथून त्याने आपली बदली दमास्कसला करून घेतली. मध्य-पूर्व हे त्याचे आवडीचे कार्यक्षेत्र होते. परंतु राजनैतिक कामगिरीत तो अपेशी ठरला. १८७१ मध्ये त्याला कामावरून कमी करण्यात आले. असे असूनही त्याची ट्रीएस्ट येथे नियुक्ती करण्यात आली व अखेर तो तेथेच मरण पावला.

बर्टनच्या आयुष्यातील बराचसा काळ सफरी व लेखन-वाचनांतच गेला. त्याचे विविध विषयांवरील पन्नासांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. एक्स्प्लोरेशन्स ऑफ द हायलँड्स ऑफ ब्राझील (१८६९), झांझिबार : सिटी, आयलंड अँड कोस्ट (द्विखंडीय) (१८७२), सिंध रीव्हिझिटेड (१८७७), टू द गोल्ड कोस्ट फॉर गोल्ड (१८८३) हे भौगोलिक माहिती देणारे ग्रंथ असून त्याने अनेक ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. त्यांपैकी लुझीअड्स (१८८०) या पोर्तुगीज महाकाव्याचा तसेच अरेबियन नाइट्सचे १६ खंड (१८८५-८८) व कामसूत्र ऑफ वात्स्यायन (१८८३) हे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत.

आयुष्याच्या अखेरीस त्यास सर हा किताब मिळाला (१८८६). त्याच्या पत्नीने त्याचे चरित्र लिहिले आहे तथापि व्हिक्टोरियन काळातील सामाजिक-नैतिक संकेतांनुसार आपल्या पतीवर दुर्वर्तनाचा आक्षेप येईल, या भीतीने बर्टनचा द परफ्यूम्‌ड गार्डन हा ग्रंथ, काही दैनंदिन्या, टिपणवह्या इ. तिने नष्ट केल्या. बर्टनच्या स्मृतिप्रीत्यर्थ इझाबेलने लंडनपासून ११ किमी. वरील मॉर्टलेक दफनभूमीत  अरब तंबूची प्रतिकृती उभारली.

संदर्भ : 1. Burton, Isabel, The Life of Captain Sir Richard Francis Burton. 2. Vols., Newsbury, 1973.

            2. Brodie, F. M. The Devil Drives a Life of Sir Richard Burton, New York, 1967.

            3. Stisted, G. M. The True Life of Capt. Sir Richard F. Burton, Westport, 1970

 

देशपांडे, सु. र.