अंबाला : हरियाणा राज्यामधील जिल्ह्याचे ठिकाण व भारतातील एक महत्त्वाचे लष्करी ठाणे. लोकसंख्या कँटोन्मेंट १,०२,५१९ व शहर ८३,६४९ (१९७१). दिल्ली-पठाणकोट रेल्वेमार्गांवर दिल्लीपासून उत्तरेस १९८ किमी. वर अंबाला कँटोन्मेंट असून २०५ किमी. वर अंबाला शहर आहे. कँटोन्मेंटपासून सिमला-काल्काकडे लोहमार्ग फुटतो. लाहोर-कलकत्ता हमरस्ता अंबल्यावरून जातो.   मध्ययुगात स्थापन झालेल्या ह्या लहान गावाला इंग्रज-शीख-युद्धात महत्त्व आले. अंबाल्याचे हवामान विषम असूनही, पूर्वेकडे शिवालिक टेकड्या व पश्चिमेस पंजाबचे मैदान ह्यांच्यामधील मोक्याचे ठाणे म्हणून १८२३ मध्ये इंग्लिश पोलिटिकल एजंटने ते आपले राहण्याचे ठिकाण बनविले. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी येथे लष्करी तळ उभारल्यावर त्याचे महत्त्व आणखी वाढले. १८४९ मध्ये ते जिल्ह्याचे ठिकाण झाले. १८६७ पासून येथे नगरपालिका आहे.हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून धान्य, कापूस, इमारती लाकूड, मसाले यांचा व्यापार येथून चालतो. यंत्राची हत्यारे, काचसामान, डिंक व लाकडी खेळणी यांचे कारखाने शहरात आहेत. धातुकामाची सरकारी संस्था येथे आहे. कँटोन्मेंटमध्ये रसायने, शास्त्रीय उपकरणे बनविली जातात. दुग्धोद्योग, हातमाग, बांबू-उद्योग व फळ-उद्योग इ. उद्योगधंदे येथे चालतात. गालिचे हे येथील वैशिष्ट्य होय.   

भारत—पाक सीमेपासून अंबाला दूर असले, तरी लष्करी दृष्ट्या ते महत्त्वाचे ठाणे असल्याने १९६५ मध्ये पाकिस्तानने त्यावर बाँबहल्ला केला. येथील सुसज्ज विमानतळ, सैनिकी रुग्णालय, मॉडेल टाऊन वसाहत व विमानतळाजवळील कॅथीड्रल यांवर अतिशय जोरदार बाँबहल्ला झाला. संरक्षणाची पूर्वयोजना असल्यामुळे मनुष्यहानी थोडी झाली. 

दातार, नीला