बेलिंग्सहाउझेन फेबिअन, गॉटलीब फॉन : ( ९ सप्टें. १७७८-१३ जाने. १८५२). रशियन नौसेना अधिकारी व ⇨ अंटार्क्टिकाचा  एक समन्वेषक. जन्म एस्टोनियातील अझेल या गावी. क्रोनस्टॅट येथील रशियन नौसेना अकादमीतून पदवीधर. १८०३-०६ दरम्यान क्रूझेन्श्टेर्नच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या रशियन जगपर्यटनाच्या मोहिमेत तो होता.

रशियाचा झार अलेक्झांडर पहिला याच्या आज्ञेवरून वयाच्या ४१व्या वर्षी त्याने दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेची सूत्रे हाती घेतली. जुलै १८१९ मध्ये निघालेली ‘व्हीस्तोक’ व ‘मिर्न्यी’ ही त्याची जहाजे लंडन, रीओ दे जानेरोवरून २८ जाने. १८२० ला ६९२१’ द. अक्षांशावर व २१४’ प. रेखांशावर पोहोचली. त्यावेळी ती अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापासून फक्त ३२ किमी. अंतरावर होती. वाईट हवामानामुळे पुढचा प्रवास रोखला गेल्यावर त्याने प्रवासाची दिशा बदलली. पश्चिमेकडे जात जात १ जाने. १९२१ रोजी ६९५२’ द. अक्षांश व ९२०’ प. रेखांशावर तो पोहोचला. तीन आठवड्यानंतर त्याला जमीन दिसली या काळापर्यंत ज्ञात असलेल्या जगाचा तो सर्वात दक्षिणेकडील भूभाग होय. त्यास त्याने ‘पीटर-१’ वेट असे नाव दिले, अधिक ईशान्येला गेल्यावर त्याला एक भूखंड दिसला. त्याने त्याने ‘अलेक्झांडर-१ लॅंड’ असे नाव दिले. पुढे हा भूखंड बेट असल्याचा शोध लागला. त्यानंतर वेलिंग्सहाउझेनची पामर या दुसऱ्या समन्वेषकाशी गाठ पडली. नंतर आणखी पुढे जाऊन त्याने द. जॉर्जिया, द. शेटलंड इ. बेटांचे नकाशे काढले व जुल १८२१ मध्ये तो रशियाला परतला. पॅसिफिकमधील अनेक छोट्या बेटांचा शोध लावून त्याने त्यांचे नकाशे काढले. १८२८-२९ मध्ये झालेल्या रशियन-तुर्की युद्धात त्याने भाग घेतला आणि त्यानंतर त्याला ॲडमिरल म्हणून बढती मिळाली. द. ध्रुवाच्या मोहिमेच्या वेळी त्याने कानेरी बेटांजवळील व सारगॅसो समुद्राजवळील प्रवाहाविषयी माहिती मिळविली. ध्रुव प्रदेशातील एका समुद्राला त्याचे नाव देऊन त्याचा गौरव करण्यात आला. द. पॅसिफिक महासागराचा भाग असलेला हा समुद्र अंटार्क्टिक द्वीपकल्पाजवळील अलेक्झांडर बेटापासून यर्स्टन द्वीपकल्पापर्यंत पसरलेला आहे.

शाह, र. रु पंडित अविनाश