जेम्स बर्जेसबर्जेस, जेम्स :(१४ ऑगस्ट १८३२-३ ऑक्टोबर १९१६). भारतीय इतिहास, पुरातत्त्वविद्या आणि स्थापत्यशास्त्र यांत संशोधन करणारा एक स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ व लिपिज्ञ. स्कॉटलंडच्या डमफ्रीसशिर मधील कर्कमहू येथे जन्म. ग्लासगो व एडिंबर येथे शिक्षण घेऊन भारतीय सनदी सेवेत तो रुजू झाला (१८५५). सुरूवातीस कलकत्ता येथील एका महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून त्याने काम केले (१८५५-६१). पुढे १८६१ साली तो मुंबईस सर जमशेटजी जिजिभाई पारशी बिनेव्होलेन्ट संस्थेत प्रमुख म्हणून कामावर रुजू झाला. त्याने टेंपल्स ऑफ शत्रुंजय (१८६९) व रॉक-कट टेंपल्स ऑफ एलेफंटा (१८७१)ही महत्वाची संशोधनपर पुस्तके लिहिली. इंडियन अँटिकरी या नियतकालिकाचा तो दीर्घकाल (१८७२-८४) संपादक होता. १८६८ ते १८७३ यादरम्यानच्या काळात मुंबईच्या जिऑग्रफिकल सोसायटीचा तो चिटणीस होता. भारत सरकारने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ वेस्टर्न इंडिया या पश्चिम विभागाचा सर्वेक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली (१८७४). या काळात (१८७४-८१) त्याने विविध प्राचीन स्थळांना भेटी दिल्या आणि चिकित्सक दृष्टिकोनातून तेथील अवशेषांची नोंद केली व अनेक वास्तूंचे आलेख स्वहस्ते तयार केले. काठेवाड, कच्छ, बेळगाव, बीदर, औरंगाबाद,वेरूळ, अमरावती, जग्गयपेट, डभई, अहमदाबाद, इ. ठिकाणच्या प्राचीन वास्तू, शिलालेख व इतर अवशेष यांवर विविध नियतकालिकांतून त्याने संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. भारत सरकारने त्याच्या कामाची योग्य ती दखल घेऊन दक्षिण भारताचा सर्वेक्षक म्हणून नियुक्ती केली आणि पुढे अलेक्झांडर कनिंगहॅमनंतर आर्किऑलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या खात्यात महानिदेशकपदी त्याची नेमणूक केली (१८८६). निवृत्त होईपर्यंत (१८८९) तो या पदावर होता. उर्वरीत जीवन त्याने एडिंबर येथे आपल्या घरी लेखन-संशोधनात व्यतीत केले. त्याने पुरातत्त्वीय संशोधन विभागात महानिदेशक असताना आमूलाग्र बदल केले. एपिग्राफिक इंडिका हे प्राचीन अभिलेख प्रसिद्ध करणारे नियतकालिक त्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आणि अलेक्झांडर कनिंगहॅमने सुरू केलेली वार्षिक नियतकालिके बंद करून त्यांऐवजी इम्पीअरिअल सीअरीज ही लेखमालिका त्याने सुरू केली. हेन्री कझीन्स, अर्न्स्ट हूल्ट्श, राइस, जेम्स फर्ग्युसन आदी विद्वानांना त्याने सहकार्य देऊन संशोधनास वाव दिला. ही लेखमालिका सुरू करण्यामागे प्रत्येक स्थळाची वा वास्तुची स्वतंत्र रीत्या माहिती प्रसिद्ध व्हावी, असा त्याचा हेतू होता. त्याप्रमाणे त्याच्या कारकीर्दीतच इम्पीअरिअल सीअरीजचे सात खंड प्रसिद्ध झाले. जिनीव्हा येथे भरलेल्या प्राच्यविद्या परिषदेस भारताचा प्रतिनिधी म्हणून तो हजर होता (१८८४). एडिंबर विद्यापीठाने त्याला डी.लीट्. ही सन्मान्य पदवी दिली (१८८१). यांशिवाय कँपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (१८८५), कीथ पदक (१८९८) इ. बहुमान त्यास मिळाले.

त्याचे बहुतेक लेखन पुरातत्तवविद्याविषयक आहे. याशिवाय त्याने भारतीय कालनिर्णयपद्धती, शिलालेख, ज्योतिष या विषयांवरही लेखन केले. त्याचे स्फूट लेखन ऑर्किऑलॉजिकल सर्व्हे रिपोर्ट्स, फिलॉसॉफिकल मँगेझीन, इंडियन अँटिकरी, एफिग्राफिया इंडिका इ. नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. यांशिवाय द रॉक टेंपल्स ऑफ एलेफंटा १८७१), टेंपल्स ऑफ सोमनाथ, जुनागढ अँड गिरनार (१८७०),द रॉक टेंपल्स ऑफ अजिंठा  (१८७९), बुद्विस्ट आर्ट इन इंडिया (१९०१), एन्शंट टेंपल्स अँड स्कल्प्‌चर्स ऑफ इंडिया (१८१७-१९१०) ही काही मौलिक पुस्तके त्याने लिहीली. केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया (१८८०) हे पुस्तक त्याने जेम्स फर्ग्युसनच्या सहकार्याने लिहिले. यात भारतातील बहुतेक गुहांची संक्षिप्त पण महत्त्वाची माहिती आढळते. त्याच्या संशोधन-लेखनकार्यामुळे भारतविद्येच्या आधुनिक अभ्यासकांना मोठीच प्रेरणा लाभली.

देव, शां. भा.