बरद्वान : पश्चिम बंगाल राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण, लोकसंख्या १,४४,९७० (१९७८ अंदाज). हे दामोदर नदीवर कलकत्त्याच्या वायव्येस सु. ११७ किमी. वसले आहे. जिल्ह्याची प्रमुख बाजारपेठ येथे आहे.
शहराचा इतिहास फारसा ज्ञात नसला, तरी १६२४ मध्ये खुर्रमने (शाहजहानने) बरद्वान जिंकल्याचा उल्लेख मिळतो. १७७०च्या पुरामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले होते. येथील एकूण हवामान रोगट आहे. १८६३ नंतर येथे ‘बरद्वान तापा’च्या [⟶ काळा आजार] अनेक साथी येऊन गेल्या. आता ही साथ आटोक्यात आली आहे. १८५४-७१ आणि १८८४-९६ या काळात येथे विभागीय आयुक्तांचे ठाणे होते. १८६५ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. येथील १०८ शिवमंदिरांचा समूह, राजबारी (महाराजांचा राजवाडा), गुलाब बाग तसेच राणी सागर व श्याम सागर हे तलाव प्रेक्षणीय आहेत. राजबारीमध्येच बरद्वान विद्यापीठ (स्था. १९६०) आहे. शहरातील उल्लेखनीय ऐतिहासिक वास्तूंमध्ये पीर बहराम शाह, खोजा अन्वर शाह, शेख अफगाण व कुत्बुद्दीन यांच्या वास्तूंचा अंतर्भाव होतो. कांचननगर या उपनगरात मोठी वार्षिक जत्रा भरते.
बरद्वानच्या आसमंतात मोठ्या प्रमाणावर भात पिकत असल्यामुळे शहरात भातगिरण्या तसेच तेलगिरण्या, अन्नप्रक्रिया, विणमाल, कटलरी, यांत्रिक अवजारे इ. निर्मितिउद्योग चालतात. दामोदर खोरे प्रकल्पामुळे शहराचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होत आहे.
सावंत, प्र. रा.