बडे महम्मदखाँ : (एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध). प्रसिध्द ख्यालगायक. लखनौचे ख्यालिये शक्करखाँ यांचे चिरंजीव. वडीलांकडेच गानविद्या शिकले. त्यांची पेचदार तानेच्या तयारीबद्दल अत्यंत प्रसिध्दी होती. त्यांचा आवाज पातळ असून पलटा, तेहरीर व झमझमा या प्रकारांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. त्यांची गायकी ‘कव्वाल-बच्चे’ ह्यांच्या घराण्याची मानतात. ख्यालगायकीतील त्यांच्या तयारीवरून ग्वाल्हेरचे महाराज दौलतराव शिंदे (सु . १७८०-१८२७) ह्यांनी त्यांची दरबार-गायक म्हणून गौरवपूर्वक नेमणूक केली. परंतु पुढे फार प्रसिध्दी आलेल्या हददूखाँ व हस्सूखाँ ह्या ग्वाल्हेर तरुण गायकांना त्यांनी गाणे शिकवण्याचे नाकारले व ग्वाल्हेर सोडून ते रेवा संस्थानात नोकरीस गेले. तथापि ग्वाल्हेर घराण्याची गायकी घडविण्यात त्यांचा वाटा असल्याने त्यांना त्या गायकीचे प्रवर्तक मानतात. त्यांचे निधन रेवा संस्थानातच झाले. अल्लादियाखाँ ज्यांना गुरूस्थानी मानत, ते मुबारक अलीखाँ हे बडे महम्मदखाँ पुत्र होत.
मंगरूळकर, अरविंद