बडनेरा : अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील शहर. लोकसंख्या २७,४७७ (१९७१). हे अमरावतीच्या दक्षिणेस ९.६ किमी. मुबई-नागपूर या मध्य लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. येथूनच अमरावतीकडे लोहमार्गाचा फाटा जातो. गाविल सरकारच्या परगण्याचे हे मुख्य ठिकाण होते, असा उल्लेख आईन-इ-अकबरीमध्ये आढळतो. यास ‘बडनेरा बीबी’ असेही म्हणतात. हे शहर दर्याइमाद शाहने आपली मुलगी दौलत शाह बेगम हिच्या लग्नात अहमदनगरच्या हसन निजामशाह यास आंदण म्हणून दिले होते. या मुलीच्या मृत्यूनंतर तिची सर्व जहागिरी मोगलांकडे गेली. १७४१ ते १७७२ पर्यंत हे शहर निजामाच्या ताब्यात होते. १७७२ मध्ये बडनेरा पेशव्यांना जहागिरी म्हणून निजामाकडून मिळाले व १८१७ मध्ये ते निजामास परत करण्यात आले. त्यानंतर १८२२ मध्ये राजाराम सुभावाने शहराची लूट केली.

येथे १९३६ पासून नगरपालिका असून कापडगिरणी, तेलगिरण्या, सरकी काढणे, कापसाचे गठे बांधणे इ. उद्योग आहेत. बडनेऱ्यात वैद्यकीय सेवा उपलब्ध असून प्राथिमिक व माध्यामिक शिक्षणाची सोय आहे. येथे कॅथलिकांचे एक चर्च तसेच अंबिकादेवीचे प्रेक्षणीय मंदिर असून तेथे नवरात्रात मोठी यात्रा भरते.

कुलकर्णी, गो. श्री.