बक्सारची लढाई : (२२ ऑक्टोबर १७६४). मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.
लढाईची पार्श्वभूमी व कारणे : प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा सुभेदार मीर जाफर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कुरकुर करू लागला. मीर जाफरनंतर त्यास कोणी वारस नसल्याने, त्याच्या जावयास-मीर कासिमला सुभेदारी द्यावी या कंपनीच्या बेताला मीर जाफरने संमती दिली नाही. ब्रिटिशांचे पारडे बंगालमध्ये जड होत असल्याचे पाहून मीर जाफरने डचांच्या स्वारीला फूस दिली. बंगाल मधून कंपनीला हुसकावून लावण्यासाठी शाह आलमने मीर जाफरशी मसलत सूरू केली. त्याने पाटणा व मुर्शिदाबाद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले (१७६०) वरील घटनांवरून मीर जाफरबद्दल कंपनीला संशय आला आणि त्यामुळे कंपनीने त्यास पदच्युत केले व मीर कासिमला सुभेदारपद दिले. सुभेदारीच्या बदल्यात मीर कासिम कंपनीच्या मर्जीप्रमाणे सुभ्याचा कारभार करील, अशी कंपनी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. कंपनी व कंपनीच्या इंग्रज नोकरांनी मीर कासिमला कर न देता व्यापार चालू केला. बंगाल सुभ्यातील (बंगाल, बिहार, व ओरिसा) प्रजेने व जमीनदारांनी कंपनीच्या व्यापाराबद्दल तक्रारी केल्या. यावरून मीर कासिमने कंपनीकडे तक्रार केली. त्याच्या कर वसुलीत मोठी घट येऊ लागली. कंपनीने या घटनांकडे दुर्लक्षच केले. मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली. कंपनीने अशा परिस्थितीत तैनाती फौजेच्या खर्चासाठी खंडणी वाढवून पैशाचा तगादा सुरू केला. वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते. मीर कासिमने कंपनीला एलिसबद्दल कळविले होते. मीर कासिम नमत नाही हे पाहून त्याऐवजी मीर जाफरला परत सुभेदार करण्याचे कंपनीने ठरविले. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासिमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. बंगालमधून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मीर कासिम तयार झाला. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मोंघीरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मोंघीर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. शाह आलमसुध्दा शुजाउद्ददौल्यापाशी होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला.
बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दीदैल्याकडे आले.
पाटण्याहून निघालेल्या कंपनी सैन्याला (सेनापती मेजर हेक्टर मन्रो) बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली. कंपनीचा जय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला.
मोगली सैन्याचा पराभव होण्याची कारणे : खंबीर नेतृत्वाची उणीव व भाडोत्री यूरोपीयांची दगाबाजी. मीर कासिमने यूरोपीय पध्दतीचे कवायती सैन्य प्रथमच हिंदुस्थानात तयार केले होते. संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या त्याच्या बंदुका कंपनी बंदुकापेक्षा परिणामकारक होत्या. असे असूनही राइनहार्टने दगा दिल्यामुळे मोगलांना पराभव पतकारावा लागला. पुढे २३ सप्टेंबर १८०३ रोजी झालेल्या असईची लढाई ही बसारच्याच लढाईची पुनरावृत्ती होती. बक्सारच्या विजयामुळे संपूर्ण बंगाल सुभ्याचा कारभार कंपनीच्या हातात आला मोगल सम्राट शाह आलम तिच्या आश्रयास आला कलकत्ता ते अयोध्या प्रांतांच्या पश्चिमी हद्दीपर्यंत वा अप्रत्यक्ष कंपनीची हुकूमत आल्यामुळे मराठ्यांच्या व पठाण -रोहिल्यांच्या कारवायांना पायबंद घालणे कंपनीला सुलभ झाले. रॉबर्ट क्लाईव्हच्या वक्तव्यावरून संपूर्ण मोगल साम्राज्य कंपनीच्या हातात आल्यासारखेच होते. ३ मे १७६५ रोजीकोरा येथे शेवटची लढाई होऊन शुजाउद्ददौलासुध्दा कंपनीचा मांडलिक झाला. मराठ्यांना किंवा एतद्देशीय राजसत्तांना या संघर्षाच्या दूरगामी परिणामाची जाणीव झाली नाही.
संदर्भ :
1. Edwards Michael, A History of India Bombaym 1961.
2. Lawford, J.P. Britains Army in India London, 1978.
3. Majumdar , R.C. Ed. The Maratha Supremaey Bombay, 1977.
4. Mukheyee, RamKrishna The Rise and Fall of the East India Company New York, London, 1974.
दीक्षित, हे. वि.