फ्रेंच सत्ता ,  भारतातील  :  भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच ,  पोर्तुगीज ,  ब्रिटिश  इ .  यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली .  व्यापारा बरोबरच भारतात सत्तासंपादन करण्याचीही स्पर्धा या यूरोपीयांत सुरू झाली [ ⇨ इंग्रजी अं मल ,  भारतातील ⇨ डच सत्ता भारतातील ⇨ पोर्तुगीज सत्ता ,  भारतातील ] .  भारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड इ .  स . १६६४  ते  १९५४  आहे .  या प्रदीर्घ काळातील फ्रेंच सत्तेच्या उदयास्ताचे विवेचन पुढे केलेला आहे .  

  

  पहिला कालखंड  (१६६४  ते  १७४२ ) :  भारता शी व्यापार करावयाच्या स्पर्धेत उतरलेल्या प्रमुख यूरोपीय सत्तांपैकी फ्रेंच शेवटचे .  चौदाव्या शतकात जॉ र्दे नस ,  फ्रायर ओडोरिक यांसारख्या धर्मोपदेशकांनी व सतराव्या शतकात ⇨ झां बातीस्त ताव्हेर्न्ये , ⇨ फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीच उत्सुकता निर्माण केली होती .  भारतात येऊन गेलेल्या या प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी ,  विशेषतः सुरतला आलेल्या काप्युशँ मिशनऱ्यांनी पूर्वेकडे व्यापार करू  इ च्छिणाऱ्यांचे काम सुलभ केले .  फ्रान्सचा राजा चौथा हेन्री  ( कार . १५८९ – १६१० ),  तेराव्या लूईचा मंत्री ⇨ आर्मो झां रीशल्य याच्या उत्तेजनाने पूर्वेकडे ,  विशेषतः भारताशी व्यापार करणाऱ्या कंपन्या स्थापनही झाल्या  (१६०१ ,  १६०४  व  १६४२  इ .)  परंतु ⇨ चौदाव्या लूई चा अर्थमंत्री ⇨ झां बातीस्त कॉलबेअर याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काँपान्यी देस इंडिजच्या स्थापनेपासून फ्रेंचां चा भारताशी पद्धतशीर व्यापार सुरू झाला  (१६६४ ).  बॅबॅर व लाबुलॉय ला गूझ या फ्रान्सच्या राजदूतांनी औरंगजेबाकडून सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली  (१६६६ ).  दोन वर्षांनी वखार सुरू झाली .  शिवाजींनी  १६६८  मध्ये राजापूरला वखार घालायची परवानगी दिली .  त्यानंतर मच्छलीप ट नम्‌लाही फ्रेंच वखार सुरू झाली  (१६६९ ).  नौदलाचे सामर्थ्य एतद्देशीयांना  दाखवून व्यापार वाढवावा ,  अशा उद्देशाने द लाहेच्या नेतृत्वाखाली एक नावि क दल भारतात आले  (१६७१ ).  त्याच्या जोरावर फ्रेंचांनी सँ थॉम ही मद्रासजवळील  ( मैलापूर )  व्यापारपेठ गोवळकोंड्या कडू न जिंकून घेतली  पण ती त्यांना फार काळ ताब्यात ठेवता आली नाही .  तेव्हा फ्रेंच अधिकारी फ्रान्स्वा मारतँ याने दूरदर्शीपणे पाँडीचेरी ठाणे मिळवले  (१६७३ – ७४ ).  त्याच्या कर्तृत्वाने शहर वाढले आणि काही वर्षांनी सुरत मागे पडून  ⇨ पाँडिचेरी हीच फ्रेंचांची भारतातील राजधानी झाली .  याखेरीज बंगालमध्ये चंद्रनगर ,  पाटणा , कासीमबझार ,  डाक्का ,  जगदिया व ओरीसातील बाले श्व र  ( बलसोर )  येथेही फ्रेंचांनी वखारी घातल्या .  सुरु वातीच्या काळात डच – इंग्रजांच्या कारवाया आणि भारतीय राजेरजवाड्यांच्या लढाया यांमुळे फ्रेंच वसाहतींना बराच उपद्रव झाला .  तरीही फ्रान्स्वा काराँ  ( कार . १६६८  –  १६७३ ),  फ्रान्स्वा बाराँ व मारतँ या कर्तबगार अधिकाऱ्यांनी फ्रेंचांचे व्यापारी व राजकीय महत्त्वही वाढीला लावले .  मारतँने मराठ्यांकडून पाँडिचेरीच्या तटबं दीची व करवसुलीची राजपत्रे मिळवली .  लहान प्रमाणावर फौजाही ठेवायला सुरुवात केली .  तरीही प्रथमतः व्यापाराचे संरक्षण व त्यापासून होणारे आर्थिक लाभ फ्रेंच धोरणाचे प्रमुख सूत्र होते .  

  

 कॉलबेअरच्या मृत्यूनंतर  (१६८३ )  अंतर्गत व्यापाराला संरक्षण म्हणून भारतीय कापडाच्या आयातीला फ्रान्समध्ये घातलेली बंदी आणि जबसदस्त सरकारी नियंत्रण यांमुळे हा व्यापार कंपनीला फारसा फलदायी झाला नाही .  झां लॉने कंपनीच्या अर्थरचनेची  १७१९  मध्ये पुनर्घटना केली ,  तरीही काही वर्षातच कंपनीचे दिवाळे वाजण्याची वेळ आली .  त्यामुळे  १७२३  मध्ये फ्रेंच सरकारने काँपान्यी देस  ….  या नावाखाली तिची पुनर्रचना केली .  त्यात सरकारी नियं त्र णे आणखी कडक झाली ,  कंपनीच्या संचालकांना अधिकार उरले नाहीत  तथापि  १७२५ – ४०  या काळात कंपनीने बराच फायदा मिळविला .  मलबार किनाऱ्यावर माहे  (१७२१ )  व मद्रास किनाऱ्यावर यानाम (१७२३ )  येथे वससाहती प्रस्थापित झाल्या .  बन्वा द्यूमा पाँडिचेरीचा गव्हर्नर झाला .  त्याच्या कारकीर्दीत  (१७३५ – ४२ )  फ्रेंच सत्तेची भरभराट झाली .  त्याने पाँडीचेरीला नाणी पाडण्याचा मिळविलेला परवाना फ्रेंच व्यापाराला किफायतशीर ठरला .  अर्काटचा नवाब दोस्त अलीच्या मृत्यू नंतर माजलेल्या वारसांच्या भांडणात त्याने दोस्त अलीचे कुटुं ब ,  सफदर अली ,  चंद्रासाहेब या सर्वांना पाँडिचेरीत आश्रय दिला आणि चंदासाहेबांच्या मदतीने तंजावर राज्यातील कारिकलचा प्रदेश मिळविला  (१७३९ ).  पाँडिचेरीवर चालून आलेल्या रघुजी भोसल्याला वश करून घेतले .  याबाबत रघुजीने केलेला पराक्रम फ्रेंचांनी दिलेल् या उंची दारूने निष्फळ ठरविला ,  अशा अर्थाचे उद्‌गार पुढे छत्रपती शाहूने काढले .

  दुसरा कालखंड  (१७४२  –  ६३ )  :  भारतीय फ्रेंच वसाहतीचा गव्हर्नर जनरल म्हणून  १७४२  मध्ये ⇨ जोझेफ फ्रान्स्वा द्यूप्लेक्स आला .  त्याने फ्रेंच धोरणाला नवी दिशा दिली .  भारतात यूरोपीय वसाहतवाद आणण्याचे श्रेय त्याचे .  त्यासाठी बन्वा द्यूमाच्या मनसबदारीचा द्यूप्लेक्सने गाजावाजा केला आणि कर्नाटकच्या गादीसाठी चाललेल्या कलहात प्रामुख्याने भाग घेऊन फ्रेंचां चे महत्त्व  वाढवायला सुरु वात केली .  मद्रासच्या इंग्रजांना हे सहन होणे शक्य नव्हते .  त्यांनी अर्काटच्या गादीसाठी सुरु वातीस अन्वरु द्दीन व तो मारला गेल्यावर मुहम्मद अली यांचा पक्ष घेतला. द्यूप्लेक्सने चंदासाहेबाला उचलून धरले .  यूरोपात ऑस्ट्रियाच्या वारसावरून इंग्रज – फ्रेंच युद्ध पेटले (१७४४ )  आणि भारतातील त्यांच्या प्रतिनिधींनी दक्षिण भारताची रणभूमी बनवली .  ला बरदॉनेने मद्रास जिंकले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही द्यूप्लेक्सने ते आपल्या ताब्यात ठेवले .  या युद्धात फ्रेंच लष्करी सामर्थ्याचा प्रत्यय आला .  तसेच यूरोपीय शिस्तीने लढणाऱ्या फौजांचे महत्त्व  सिद्ध झाले .  यूरोपात एक्स – ला – शपेलचा तह झाला  (१७४८ )  तरी भारतातील इंग्रज – फ्रेंचां नी दक्षिण भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन अप्रत्यक्ष युद्ध चालूच ठेवले . १७४८  मध्ये हैदराबादचा निजामुल्मुल्क मरण पावला .  त्याच्या सुभेदारीसाठी सुरू झालेल्या वारसांच्या भांडणात इंग्रजांनी नासिर जंगला तर द्यूप्लेक्सने प्रथम मुजफर जंग आणि त्याचा खून झाल्यावर सलाबत जंग यांना पाठिंबा दिला .  काँत द रोजर बुसी या पराक्रमी व तितक्याच मुत्सद्देगिरीने वागणाऱ्या वी राने हैदराबादेत लहानशा फौजेच्या जोरावर फ्रेंचां चे वर्चस्व स्थापन केले .  मुस्तफानगर ,  एल्लोरे ,  चिकॅ कोल आणि राजमहेंद्री या चार प्रांतांचा महसूलहक्क फ्रेंचांना या वेळी मिळाला .  हैदराबाद प्रकरणात फ्रेंचांनी मराठ्यांचे शत्रुत्व ओढावून घेतले ,  तरीही बुसीची हैदराबादेतील आठ वर्षांची कामगिरी फ्रेंचाच्या इतिहासात मोलाची ठरली ⇨ रॉबर्ट क्लाईव्ह आदींच्या पराक्रमाने द्यूप्लेक्सला मात्र अर्काटमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही .  फ्रेंच सरकारलाही त्याचे या युद्धावर पैसा खर्चणे पसंत पडले नाही . १७६४  मध्ये द्यूप्लेक्सच्या जागी शार्ल रॉबेअर गोदहूला तहाच्या सुचना देऊन फ्रेंच सरकारने पाठविले .  दोनच वर्षांत इंग्लंड – फ्रान्समध्ये कॅनडाच्या प्रश्नावरून पुन्हा युद्ध सुरू झाले  ( सप्तवार्षिक युद्ध  १७५६  –  ६३ )  आणि भारतातील इंग्रज – फ्रेंचां च्या पुन्हा लढाया सुरू झाल्या .  फ्रेंच सरकारने काँत द लाली याला सर्वाधिकार देऊन भारतात सैन्य पाठविले  परंतु शूर ,  उद्दाम ,  चिडखोर लालीला इतर फ्रेंच अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले नाही .  नाविक बळ व पैसाही अपु रा पडला .  वाँदीवॉशच्या लढाईत लाली हरला व बुसीला कैद झाली .  या युद्धात पाँडिचेरीसह सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांनी जिंकून घे तल्या .  येथून फ्रेंच सत्तेच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला .


   तिसरा कालखंड  (१७६३ – ८५ )  :  पॅरिसच्या तहाने  (१७६३ )  युद्ध संपले आणि फ्रेंचांना त्यांच्या वसाहती परत मिळाल्या. तरी पुढे फ्रेंच भारतीय सत्तेला जी उतरती कळा लागली ती अखेरपर्यंत .  एव्हाना बंगाल इंग्रजांच्या पूर्ण कब्जा त गेला होता ,  इतरत्रही इंग्रजां चे वर्चस्व वाढले होते .  हैदराबादच्या सलाबत जंगने इंग्रजांशी सलोखा केला होता  पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठेही पुन्हा सावरले गेले होते .  या वेगवेगळ्या सत्तांशी संधान साधून इंग्रजांना पायबंद घालायचा असे   प्रयत्न अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचांनी चालू ठेवले .  त्यांच्या कारस्थानापासून इंग्रजांनीही सावधगिरी बाळगली .  फ्रेंच कंपनीचे मात्र दिवस भरले होते . १७६९  मध्ये फ्रेंच सरकारने कंपनी बरखास्त करून सर्व फ्रेंच भारतीय वसाहती आपल्या प्रत्यक्ष अंमलाखाली घेतल्या  पण सुखविलांसात दंग असलेल्या पंधराव्या लूईने त्यांच्या पुनरूज्जीवनाकडे मात्र लक्ष दिले नाही .  त्यामुळे पाँडिचेरीचे गव्हर्नर लॉ द लॉरिस्ताँ  ( कार . १७६५ – ७६ )  आणि बेलकाँब  ( कार . १७७७ –  ७८ )  यांच्या इंग्रजांना श ह देण्याच्या योजना कागदावरच राहिल्या .  चंद्रनगरचा गव्हर्नर झां बातीस्त शव्हाल्ये  ( कार . १७६५ – ७६ )  याने मोगल बादशाह शाह आलमच्या साह्याने सिंध प्रांतात फ्रेंच बस्तान बसवायचा घाट घतला ,  त्याचीही त च गत झाली .  अमेरिकन स्वातंत्र्यानिमित्त इंग्लंड – फ्रान्स युद्ध सुरू झाले  (१७७६ ) . तेव्हा मात्र फ्रेंच सरकारने युद्धातील डावपेच म्हणून मराठ्यांशी मैत्री करण्यासाठी सँ ल्यूबँ आणि नंतर माँतिन्यी यांना पुण्याला पाठविले .  द स्युफ्राँ या पराक्रमी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हिंदी महासागरात नाविक दल आणले .  त्याने पाच लढायांत इंग्रज आरमारा ला नामोहरम केले .  बुसी ला सर्वाधिकार देऊन सैन्य पाठवायचे ठरले  पण त्याला इतका उशीर झाला की ,  तोपर्यंत इंग्लंडने फ्रान्सशी तह केला होता  (१७८३ ).  इंग्रजांविरुद्ध लढाईत गुंतलेल्या हैदर – टिपूला किंवा मराठ्यांना फ्रेंचांचा उपयोग झाला नाही . इंग्रजांनी जिंकलेल्या फ्रेंच भारतीय वसाहती तहाने पुन्हा एकदा फ्रेंचांना परत मिळाल्या .  यानंतर मात्र फ्रेंच सत्तेच्या पुनरुज्जीवनाची आशा संपली . १७८५  मध्ये बुसीही मरण पावला .  फ्रेंच सत्तेच्या उत्कर्षात आणि इतिहासात द्यूप्लेक्सच्या खालोखाल बुसीच्या मुत्सेद्देगिरीला व शौर्याला महत्त्व  आहे .

  

   चौथा कालखंड  (१७८५ – १८०२ )  :  या काळात मराठे व विशेषतः   टिपू यांच्याशी संबंध वाढविण्याचे प्रयत्न फ्रेंचांनी केले खरे  परंतु   फ्रेंच सरकार ने मुख्य लक्ष व्यापाराकडे दिले .  बंगालातील इंग्रजांशी याबाबत नेहमी कटकटी होत. त्या दूर करण्यासाठी १७८७ मध्ये इंग्लंडशी करारनामा केला .  शार्ल कालॉन या काट्रोलर – जनरलच्या पुढाकाराने एक नवी कंपनी  १७८५  मध्ये स्थापन झाली .  तिने चार वर्षांत चांगली प्रगतीही केली  पण  १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्याने सगळी परिस्थितीच पालटली .  क्रांतीचे पडसाद फ्रेंच भारतीय वसाहतींतही उठले . त्यांत एतद्देशीयांचा काही संबंध नव्हता .  फ्रेंच राज्यक्रांतीतूनच यूरोपात  १७९३  मध्ये युद्ध उद्‌भवले ,  तेव्हा इग्रंजानी पुनश्च भारतीय फ्रेंच वसाहती ताब्यात घेतल्या .  या युद्धात ऑइल ऑफ फ्रान्स  ( मॉरिशस )  आणि बूँ र्बा  ( रेयून्याँ ) या हिंदी महासागरातील बेटांच्या तळावरून फ्रेंचांनी बरीच चाचे गिरी केली आणि इंग्रज व्यापाराला चांगलेच अड थळे आणले .  यांखेरीज म्हैसूरशी असलेली फ्रेंचांची मैत्री ही सुद्धा इंग्रजांना डोकेदुखी झालीच .

  

  अखेरचा कालखंड  (१८०२ – १९५४ )  :  भारतावर फ्रेंच अंमल बसविण्याचा अखेरचा प्रयत्न नेपोलियनने केला . १८०२  मध्ये आमेन्यच्या तहान्वये फ्रेंच भारतीय वसाहती फ्रान्सला परत मि ळा यचे ठरले .  त्या ताब्यात घेण्यासाठी शार्ल मात्य इझिदॉर दकाँच्या नेतृत्वाखाली नेपोलियनने सैन्य व जहाजे पाठविली .  हेतू भारतीय सत्तांशी गुप्त संधान साधण्याचा होता  पण युरोपात पुन्हा युद्धाचा रंग दिसू लागल्याने इग्रंजांनी पाँडिचेरीला खडा पहारा ठेवला . दकाँ ला रातोरात मॉरिशसला परतावे लागले .  तेथूनच त्याने ब्रिटिश आरमाराला सतावण्याचे अयशस्वी प्रयत्न केले . १८०७ – ०८  मध्ये नेपोलियनने पुनश्च भारतावर मोहीम करण्याच्या यो ज ना आखल्या .  त्याला शह म्हणून इंग्रजांनी लाहोर ,  काबूल ,  तेहरान येथे वकिलाती पाठविल्या .  खुद्द नेपोलियन यूरोपात युद्धात गुं तून राहिल् याने तो संकल्प तसाच राहिला .  अखेर  १८१०  मध्ये इंग्रजांनी मॉरिशस व रेयून्याँ हे फ्रेंच तळही ताब्यात घेतले . १८१५  मध्ये तह झाला .  त्यानुसार  १८१६ – १७  मध्ये पाँ डिचेरी ,  चंद्रनगर ,  माहे ,  कारिकल व यानाम वसाहती फ्रान्सला परत मिळाल्या .  अशा प्रकारे फ्रेंचांनी इंग्रजांचे भारतातील स्वामित्व मान्य केले , ते भारत स्वतंत्र होईपर्यत . १९५४ मध्ये या वसाहती फ्रान्सने भारताच्या ताब्यात दिल्या.  १९५६  म ध्ये त्यांच्या विलीनीकरणाबाबत भारत – फ्रान्स तह झाला .  तो  १९६२  मध्ये पक्का झाला व भारतातील फ्रेंच सत्ता संपुष्टात आली .

  फ्रेंच सत्तेच्या ऱ्हासाची कारणे  :  द्यूप्लेक्सच्या कल्पना व पद्धती वापरून इंग्रजांनी भारतावर अंमल बसविला  पण फ्रेंच मात्र अपेशी ठरले .  याची अनेक कारणे आहेत .  भारतीय सत्तांच्या अंतः कलहां चा आणि स्वत च्या कवायती फौजांचा फायदा घेऊन राज्यविस्तार करावा ,  ही कल्पना द्यूप्लेक्सने फ्रेंच सरकारला नीटपणे कधीच समजावून दिली नाही .  त्यामुहे त्याला युद्धासाठी पैशाची नेहमीच वानवा राहिली .  हाताखालचे अधिकारी अकार्यक्षम , बुसी हैदराबादेत गुंतल्याने त्याचा कर्नाटकातील युद्धात फायदा होऊ शकला नाही .  हैदराबादेत मात्र नानासाहेब पेशव्यांचेच राजकारण प्रभावी ठरले .  आपसांतील ती व्र कलह व मत्सर फ्रेंच कंपनीला पहिल्यापासून भोवले .  ला बूरदॉने इंग्रजांना पैशासा ठी मद्रास देणार होता .  लाली ,  बुसी ,  द लेरी  ( पाँ डिचेरीचा मुख्य )  यांचे तीव्र मतभेद सप्तवार्षि क युद्धात न ड ले .  इंग्रजांशी झालेल्या युद्धात फ्रेंच आरमार व सेना यांच्या हालचालीत कधीच एकसूत्रीपण नव्हता .  याउलट इंग्रजांचे नाविक बळ चांगले ,  शिवाय बं गालातून पै सा ,  युद्धसाहित्य यांचा पुरव ठा होत राहिला .  इंग्रज कंपनीचे संचालक ब्रि टि श सरकारचे पाठबळ मिळवी त , तर फ्रान्सला अमेरिकेतील वसाहती जास्त महत्त्वाच्या वाटल्याने भारताकडे त्याचे नेहमीच दुर्लक्ष झाले .  अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात तर हे दुर्लक्ष आणखी वा ढ ले .  या काळात इंग्रजांना शह देण्यासाठी भारतीय सत्तांचे साहाय्य आवश्यक होते  परंतु फ्रेंचां ची आश्वासने पोकळ ठरल्याने मराठे व हैदर – टिपू यांपैकी कोणाचाच विश्वास ते संपादू शकले नाहीत .  त्यांची इंग्रजांशी लढाई चालू होती तेव्हा बुसी इतका उशिरा पोहोचला ,  की एकाकी लढणाऱ्या इंग्रजांना हरविण्याची अखेरची संधी गेली .  फ्रेंच कपंनी संपूर्ण सरकारी .  येथील परिस्थितीचा पूर्ण विचार न होताच निर्णय घेतले जात .  इंग्लंड विषयक धोरण यूरोपात ठरे .  त्यामुळेही येथील फ्रेंच वसाहतींवर अनेकदा अनवस्था प्रसंग ओढवत .  जी .  बी . मॅलिसन म्हणतो , ‘‘ द्यूप्लेक्सने फ्रेंच भारत कमावला ,  फ्रान्सने तो गमावला . ’’

  

 फ्रेंच –  म्हैसूर संबंध  :  हैदरच्या काळापासूनच फ्रेंचांचे म्हैसूरशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले होते .  हैदरने प्रथम ह्यूज्यॅल व नंतर ऱ्यु सॅल यांची फ्रेंच घोडदळाची छोटी पथके बाळगली होती . १७८०  मध्ये इंग्रजांशी युद्ध सुरू झाल्याबरोबर त्याने मॉरिशसचा गव्हर्नर सुयाककडून मदत मागविली .  त्याने पाठविलेला दॉर्व्ह हा अधिकारी तसाच परतला  तेव्हा द्युशमे याला पाठविले .  द्युशमेने हैदरशी औपचारि क तहाचा आग्रह धरला .  हैदर त्याला कबूल नसल्याने दोघांनाही परस्पर साह्य झाले नाही .  द स्युफ्राँच्या नाविक शौर्याबद्दल मात्र हैदरला कौतुक वाटले आणि त्याने पकडलेले इंग्रज युद्धकैदी द स्युफ्राँच्या हवाली केले .  हैदरच्या मृत्यू नंतर टिपू गादीवर आला  (१७८२ ).  त्याने इंग्रजांशी मंगलोरचा तह केला  (१७८४ ).  त्या वाटाघाटीत बुसीला भाग घेऊ दिला नाही  पण  १७८६  नंतर मात्र त्याने फ्रेंच मैत्रीवर विशेष जोर दिला .  फ्रान्सच्या सोळाव्या लूईला पत्रे ,  नजराणे पाठविले . १७८७ – ८८  मध्ये फ्रान्सला वकीलही पाठवले आणि फ्रेंचांनीही राजनैतिक संबंध वाढविले  पण तटस्थतेच्या धोरणामु ळे टिपूचे इंग्रज – निजाम – मराठे यांच्या संयुक्त सत्तांशी  १७९०  मध्ये युद्ध सुरू झाले .  त्यात फ्रेंचांनी कोणासच मदत केली नाही .  साहजिकच  १७९३  मधील इंग्रज – फ्रेंच युद्धात टिपूही स्वस्थच राहीला क्रांतीनंतर फ्रान्सच्या बदललेल्या परिस्थितीची टिपूला काहीच कल्पना नव्हती . १७९७  मध्ये रिपो या फ्रेंच धाडशी चाच्याच्या सल्याने पुन्हा एकवार वकीलात पाठविली ,  ती निष्फळ ठरली .  टिपूशी भांडण उकरून त्याचा निः पात करायला टपलेल्या लॉर्ड वेलस्लीला टिपू – फ्रेंच मैत्री हेच निमित्त पुरले .  श्रीरंगपटणच्या लढाईत टिपू मारला गेला  (१७९९ ).  या मैत्रीचा फ्रेंचांना प्रत्यक्षात उपयोग झाला नाहीच ,  उलट मराठे व निजाम यांच्या मनात फ्रेंचां विषयी अविश्वास निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरली .

  

  फ्रेंच साहसी अधिकारी  :  अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बळावत चाललेल्या इंग्रजी सत्तेला आणखी एक भय होते ,  ते निरनिराळ्या भारतीय संस्थानिकांच्या पदरी नशीब काढायला आलेल्या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्यांच्या कारवायांचे . १७६३  च्या तहानुसार फ्रेंचांना आपले सैन्य एकदम कमी करावे लागले .  नोकरीतून निघालेले अनेक अधिकारी भारतीय राजेरज वा ड्यां कडे आपल्या जवळच्या कवायती पलटणी आणि तोफखाना घेऊन नोकरीला राहिले .  रने मादॅक याने शुजाउद्दौला ,  गाझीउद्दीन व जाट यांच्याकडे नोकऱ्या केल्या .  नंतर शव्हाल्येच्या तो शाह आलमकडे आला आणि सिंधमध्ये बस्तान बसवायच्या योजनेत सामिल झाला  पण ती योजनाच बारगळली .  तथापि त्यासाठीच काँत द मोदाव्ह यानेही प्रथम शाह आलमकडे नोकरी धरली .  नंतर तो निजामाचा भाऊ सलाबत जंगच्या पदरी राहि ला. शुजाउद्दौलाकडे  १२  वर्षे असलेल्या ज्याँती या अधिकाऱ्याचे अयोध्येत चांगले व जन होते . फ्रान्सला परतल्यावर त्याची प्रशंसा झाली .  त्याने भारतावर पुस्तके लिहिली आणि जुनी हस्तलिखिते जमविली .  फ्रान्समधील भारतविषयक अभ्यासाचा तो प्रारंभक होय .  या काळात फ्रेंच साहसी लोकांचे पेवच फुटले होते . निजामाकडे प्रथम ओमाँ ,  द लाली आणि नंतर फ्रान्स्वा द रेमाँ  हे अधिकारी नोकरीस होते .  रेमाँने चौदा हजार सैन्य तयार केले होते .  एतद्देशीयांचे त्याच्यावर प्रेम होते .  त्याच्या मृत्यू नंतर  (१७९८ )  त्याची जागा पेरॉनने घेतली पण इंग्रजांच्या दडपणाने निजामाकडल्या फ्रेंच फौजा बरखास्त झाल्या आणि हैदराबादेतील फ्रेंच वर्चस्व संपले .  काँत द बुआन्य मुळचा साव्हुआचा .  इंग्रजांच्या शिफारशीने महादजी शिंदेकडे आला आणि त्याने  तीस हजार सैन्य तयार केले . १७९६  मध्ये तो यू रोपला परतला .  त्याची जागा   दौलतराव शिंद्याकडे पेरॉनने घेतली . १८०३  मध्ये युद्धावाचूनच तो इंग्रजांना शरण गेला .  तुकोजी होळकरकडला द्युद्रनेक आणि टिपूकडचा द लाली व नंतर  द व्हिजी हे फ्रेंचच .  यांपैकी बऱ्याच जणांना सैन्याच्या तैनातीसाठी मुलूख तोडून मिळाले होते .  स्वतंत्र संस्थानिकांच्या थाटात ते राहत व त्या त्या दरबारी त्यांचे चांगले वजनही असे  पण ते मुख्यतः पोटार्थी असल्याने त्यांची कारस्थाने फ्रेंच सत्तेच्या पुनरूज्जीवनाला उपयोगी पडली नाहीत .  उलट एतद्देशीयांना फ्रेंच साह्याची भरमसाठ आ श्वा सने देऊन अप्रत्यक्षरीत्या त्यांनी इंग्रजानांच मदत केली .


   

  फ्रेंच  –  मराठे संबंध  :  या दोन्ही सत्तांची वाढ  ( सतरावे शतक ) ,  पराजय  (१७६२ – ६३ )  व ऱ्हास  ( एकोणिसाव्या शतकाची सुरुवात )  यांत साम्य आढळते .  युद्धसाहित्य पुरवायला अनुकूल असलेल्या फ्रेंचांना शिवाजीने सुरतेला लुटले नाही  पाँडिचेरी  जिंकली ,  पण फ्रेंचांना व्यापाराचे फर्मान दिले .  पाँडिचेरीच्या मराठी कारभाऱ्यांनी फ्रेंचांना पैशासाठी बराच त्रास दिला  पण त्या बदल्यात मारतँने पाँडिचेरीच्या तटबंदीचे व करवसुलीचे अधिकार मिळविले .  पुढे राजारामाने पाँडिचेरी  डचांना विकली  (१६९३ ).  ती फ्रान्स – हॉलंड तह झाल्यावरच फ्रेंचांना परत मिळाली .  द्यूमाच्या धैर्याने स्तिमित झालेल्या रघुजी भोसल्याने बंगालवरच्या स्वाऱ्यांत चंद्रनगरला धक्का लावला नाही  तथापि फ्रेंच व्यापाराचे नुकसान व्हायचे ते झालेच .  चंदासाहेबाला सोडवून घेण्यासाठी सुरु वातीला द्यूप्लेक्सने मराठ्यांशी मैत्रीचे धोरण ठेवले  पण हैदराबादला वर्चस्व स्थाप ण्या च्या प्रयत्नात बुसी – सलाबत जंग यांचे नानासाहेब पेशव्यांशी युद्ध जुंपले .  अखेर मालकीचा तह झाला  (१७५२ ).  त्यात नानासाहेबाला मुलूख मिळाला .  सावनूरच्या मोहिमेत बुसीची मदत मिळाली .  कर्नाटकातील इंग्रज – फ्रेंच युद्धपासून मात्र तो अलिप्त राहिला . १७६३  नं तरच्या शव्हाल्ये ,  लॉ द लॉरिसताँ ,  बेलकाँब वगैरेंच्या योजनांत मराठ्यांच्या मैत्रीवर भर होता .  अखेर  १७७७  मध्ये सँ ल्यूबँ व  १७८१  नंतर माँ ति न्यी या फ्रेंच राजदूतांनी इंग्रजांविरुद्ध परस्पर साह्याच्या वाटाघाटी केल्या  पण त्यांना पॅरिसहून उत्तर न आल्याने नाना फडणीसाने माँतिन्यीचे नकळत सालबाईचा तह  (१७८२ )  पक्का केला .  मराठ्यांचा फ्रेंच मदतीवरील विश्वास उडाला .  भरीला फ्रेंच टिपूची मैत्री ,  माँतिन्यी व नंतर ज्याक कॉसिन्यी यांनी मराठे – टिपू सलोख्याचे अयशस्वी प्रयत्न केले . १७८८  मध्ये माँतिन्यी परतल्यावर फ्रेंच – मराठे संबंध संपले .  वेलस्लीने वसईच्या तहात दुसऱ्या बाजीरावला फ्रेंचांशी संबंध ठेवायला मनाई करून त्यावर शिक्कामोर्तब केले  (१८०२ ).  इंग्रजांच्या वर्चस्वाला शह देण्यात दोन्हीही सत्ता परस्परांचा नीट उपयोग करून घेण्यास असमर्थ ठरल्या .  

पहा  :  इंग्रज – फ्रेंच युद्धे   ईस्ट इंडिया कंपन्या   फ्रान्स  ( इतिहास ).

  

संदर्भ  : 1 . Besson, M. Les Aventuriers Francals oux Indes  1775 – 1820 , Paris,  1932 .

           2 . Castonnet Des Fosses, L’Inde Francaise avant Dupleix, Paris,  1887 .

           3 . Dodwell, H. H, Ed. The Combridge History of India, Vol. V, Delhi,  1958 .

           4 . Froidevaux, Henri et Martineau, Henry, A Histoire des Colonles Francaises et de La Expansion de La France dans Le Monde Tome V,

                Paris,  1932.

           5 . Hatalkar, V. G. Relations between the French and the Marathas  1668 – 1865 . London,  1960 .

           6 . Malleson, G. B. History of the French in India, Edinburgh,  1909 .

           7 . Weber, C. La Compagnie Francaise Des Indes ( 1604 – 1875 ), Paris,  1904 .

  

 गोखले ,  कमल