संग्रामसिंह : (? १४८२-३० जानेवारी १५२८). गुहिलोत वंशातील एक पराकमी व उदार राजा. महाराणा संग ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. तो आपल्या राजमल्ल ह्या पित्याच्या मृत्यूनंतर १५०९ साली मेवाडच्या गादीवर बसला. त्यावेळी मेवाड सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेले होते. ईडरच्या रायमल्ल ह्या तरूण राजपुत्रावर गादी गमावण्याचे मोठे संकट आले, तेव्हा संगाने त्यास मदत केली व त्यास आपली मुलगीही दिली. त्यानंतरच्या लढायांत संगाने रायमल्लस सर्वतोपरी साहाय्य करून गुजरातच्या सुलतानाचा पराभव केला. यानंतर संगाने चढाईचे धोरण स्वीकारले व उत्तरेत आक्रमण केले. दिल्लीचा इबाहीम लोदी त्याच्यावर चालून आला असता, खातोलीच्या लढाईत (१५१७) संगाने त्याचा पराभव केला व त्याच्या मुलास पकडून जबर दंड घेऊन सोडून दिले मात्र या लढाईत संगाचा डावा हात तुटला व गुडघ्यात बाण लागल्यामुळे तो लंगडा झाला. गुजरातच्या मुजफ्फरशाह या सुलतानाने माळव्याचा सुलतान दुसरा महम्मूद याची मदत घेऊन संगावर संयुक्तपणे स्वारी केली. राणाने त्याचाही पराभव केला. त्याने महम्मूदास पकडून सहा महिने कैदीत ठेवले मात्र मांडलिकत्व मान्य केल्यावर त्यास माळव्याचे राज्य परत देऊन मुक्त केले तथापि कृतघ्नपणे त्याने गुजरातच्या सुलतानाच्या मदतीने पुन्हा संगावर स्वारी केली. या स्वारीमध्येही महम्मूदचा पराभव झाला.

अशा प्रकारे संगाने दिल्ली, माळवा व गुजरात येथील सुलतानांशी संघर्ष करून सर्व राजस्थान आपल्या आधिपत्याखाली आणला. यावेळी त्याच्या सेनेत एक लाख स्वार, पाचशे हत्ती व अनेक लहानमोठे सरदार होते. त्याचे उत्पन्न दहा कोटी रूपये होते व नऊ राजे त्याचे मांडलिक होते. सततच्या युद्धांमुळे त्याच्या अंगावर ऐंशी जखमा झाल्या होत्या. एक डोळा गेला होता आणि पायही लंगडा झाला होता मात्र अखेर बाबराबरोबरच्या युद्धात त्याचा पराभव झाला. यावेळी त्याने मारवाड, अंबर, ग्वाल्हेर, अजमेर आणि चंदेरी येथील राजांना मदतीकरिता आव्हान केले. हे राजे तसेच शिकंदर लोदीचा मुलगा महम्मूद लोदी त्याच्या साहाय्यास आले होते. संगाने सीकीजवळ खानुवा येथे १७ मार्च १५२७ रोजी बाबराशी मुकाबला केला. सर्व राजपूत अव्दितीय शौर्याने लढले परंतु त्यांचा टिकाव लागला नाही. या युद्धात त्याचा पराजय झाला, तरीही संग निराश झाला नाही. त्याने बाबराशी पुन्हा युद्ध करण्याची तयारी चालविली पण ती करीत असतानाच त्याला मृत्यू आला आणि मेवाडच्या सार्वभौम सत्तेचा शेवट झाला.

महाराणा संगाविषयी गौरीशंकर ओझा म्हणतात, ‘‘महाराणा संग थोर, उदार, कृतज्ञ, बुद्धीमान व न्यायपरायण शासक होता. त्यामुळेच त्याने मेवाड हे एक साम्राज्य बनविले. ज्याच्या निशाणाखाली अनेक हिंदू राजे युद्धासाठी जमा झाले होते’’. परंतु एवढे मोठे राज्य असूनही तो राजनीतिशास्त्रात निपुण नव्हता, शत्रूला पकडल्यानंतर सोडून देण्यात औदार्याचे मोठे प्रदर्शन असते पण राजकारणाच्या दृष्टीने ती चूकच होय . बाबराने तर, ‘ स्वतंत्रपणे संगाशी युद्ध करणे हे अत्यंत कठीण काम होय’, असे म्हटले आहे.

पहा : गुहिलोत घराणे राजपुतांचा इतिहास.

संदर्भ : १. गहलोत, जगदीशसिंह, राजपूतानेका इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.

२. देशपांडे, ह. वा. राजपूत राज्यांचा उदय व ऱ्हास, पुणे, १९३८.

देशपांडे, सु. र.