बंदोपाध्याय, कृष्णमोहन : (२४ मे १८१३–११मे १८८५). बंगालच्या प्रबोधनकालातील एक प्रमुख लोकनेते, निबंधकार व पत्रकार. कलकत्ता येथे आजोळी जन्म. कलकत्ता येथे पटलडांगा भागातील ‘हेयर स्कूल’ मध्ये प्राथमिक व माध्यामिक शिक्षण. नंतर कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये त्यांनी सहा वर्षे शिष्यवृत्ती मिळवून अध्ययन केले. संस्कृतचेही स्वतंत्रपणे अध्ययन केले. शिक्षण संपल्यावर प्रथम काही काळ त्यांनी हेयर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. १८३१ मध्ये फादर अलेक्झांडर डफ यांच्या सहवासामुळे ख्रिस्ती धर्माबद्दल त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले आणि १८३२ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यामुळे हेयर स्कूलमधील नोकरी त्यांना सोडावी लागली. पुढे १८३६ पर्यंत कलकत्त्यातील चर्च मिशनरी सोसायटीच्या शाळेचे अधीक्षक नंतर बिशप्स कॉलेजमध्ये प्राध्यापक १८३९ ते ५२ ख्राईस्ट चर्चचे आचार्य ही मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यामुळेच रेव्हरंड के. एम्. बॅनर्जी या नावाने ते ओळखले जाऊ लागले.

कृष्णमोहन बंदोपाध्याय यांच्या विचारसरणीवर हिंदू कॉलेजमधील एक शिक्षक हेन्री लुई व्हिव्हिअन डेरोझिओ यांच्या मतप्रणालीचा व त्यांनी स्थापिलेल्या ‘ॲकेडेमिक असोसिएशन’ मधील धर्मविषयक चर्चांचा सखोल परिणाम झाला. घरात गोमांस सापडल्याच्या आळावरून त्यांना सामाजिक बहिष्कारास तोंड द्यावे लागले. या अनुभवामुळे धर्मविषयक पुनर्जागृतीची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवली व त्यांनी लोकशिक्षण, समाजजागृती व मानवतावादी धर्मसंस्थापन ही ब्रीदे समोर ठेवून आपले लेखन केले.

द पर्सिक्यूटेड (१८३२) हे त्यांचे पहिले पुस्तक इंग्रजीत लिहिलेले नाटक आहे. डेरोझिओसंपादित हेस्परस ह्या इंग्रजी पत्रकास ते नियमित लेखन करीत. रामगोपाल घोष यांच्या बेगॉल स्पेक्टेटरचेही ते लेखक होते. कृष्णमोहनांनी हिंदू यूथ (१८३१) व संवाद सुधांशु (१८५०) ही अनुक्रमे इंग्रजी व बंगाली पत्रके स्वतः सुरू करून चालविली तसेच इन्क्वायरर आणि गव्हर्न्मेंट गॅझेट या इंग्रजी पत्रकांचे बराच काळ यशस्वीपणे संपादनही केले. ख्राईस्ट चर्चचे आचार्य असताना ते बंगालीतून प्रार्थना-प्रवचने करीत या धर्मप्रचारक प्रार्थना प्रवचनांचा उपदेश कथा (१८४९) हा संग्रह होय. याशिवाय सत्यस्थापन ओ मिथ्यानाशन (१८४१) षड्दर्शनसंवाद (१८६७) हे त्यांचे महत्त्वाचे तात्विक धार्मिक ग्रंथ आहेत. शैक्षणिक भूमिकेतून संकलित व संपादित ग्रंथ निर्माण करण्यासाठी झटणारे कृष्णमोहन हे एक प्रमुख कार्यकर्ते होते. विद्याकल्पद्रुम (१८४६−५१, एकूण १७ खंडांत प्रकाशित) हा विश्वकोश पुराणसंग्रह (१८५१) श्रीनारद पंचराणम् (इंग्रजी अनुवादासह, १८६५) इ. ग्रंथ त्यांनी संपादित केलेले असून ऋग्-वेद-संहिता ,रघुवंश, कुमारसंभव इ. विदग्ध इंग्रजीत व बंगालीत भाषांतरे करून क्रमिक पाठ्यपुस्तकेही तयार केली. एक कणखर व कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून त्यांचा सर्त्र दबदबा असे. कलकत्ता येथे ते निधन पावले.

संदर्भ : Ghosh ,R.C.A. Blographical Sketch of the Rev.K.M. Banerjee, Calcutta, 1983.

आलासे वीणा.