फ्लॅक्स : अळशीच्या झाडातील परिरंभीय तंतूंना [⟶ परिरंभ] फ्लॅक्स असे म्हणतात. झाडाचाही उल्लेख फ्लॅक्स या नावाने करतात. सर्वसामान्य फ्लॅक्स लायनमयुसिटॅटीसिमम या जातीचे असून ते वनस्पतींच्या लिनेसी कुलात मोडते. त्याला संस्कृतमध्ये उमा अशी संज्ञा आहे. फ्लॅक्सच्या झाडापासून ज्या तेलबिया मिळतात त्यांना उमा-बीजे असे म्हणतात, तर ह्या झाडाच्या तंतूंपासून तयार करण्यात येणाऱ्या कापडाला क्षुमा किंवा क्षौमवस्त्र वा लिनन असे म्हणतात.
इतिहास : मानवाच्या वापरण्यात आलेला फ्लॅक्स हा आद्य तंतू होय. ह्या तंतूच्या उपयोगाविषयीचे पुरावे व त्याविषयीचा उल्लेख फार पुरातन काळातील आहेत आणि म्हणूनच त्याचा इतिहास निःसंदिग्धपणे लिहिणे कठीण जाते. काही पाश्चात्त्य लेखक फ्लॅक्सचे मूळ भारतात होते असे मानतात, तर काही अन्य लेखक फ्लॅक्सचे जन्मस्थान यूरोपात किंवा मध्य आशियात आहे असे सांगतात. सर जॉर्ज वॉट यांच्या मते प्राचीन भारतीय वाङ्मयात फ्लॅक्सचा उल्लेख आहे. त्याला अतसी, उमा, क्षुमा इ. नावांनी संबोधले आहे. त्याकाळी उमाचा तेलासाठी व कपड्यांसाठीही उपयोग होत असे. मनू यांनी क्षुमा वस्त्राचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांच्या पाठशाळेत अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी (शिष्यांनी) नेसावयाचे धोतर (वल्कले) इ. (निम्न) क्षुमा, लोकर किंवा शण (सन) यांचे असावे असा नियम होता. जर ब्राह्मणाला काही अपरिहार्य कारणामुळे व्यापार करावा लागला, तर त्याने रंगीत कापड किंवा सन, क्षुमा आणि लोकर यांपासून तयार केलेले कपडे विकू नयेत. कालिदास यांनीही शुभ्र उमाचा उल्लेख केलेला आहे. वरील सर्व पुराव्यांवरून असे स्पष्ट होते की, फ्लॅक्सचा स्पष्ट व निःसंदिग्ध उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्मयात अनेक वेळा आलेला आहे. एवढेच नव्हे, तर त्यावर विरंजन क्रिया (रंग काढून टाकण्याची क्रिया) करून त्यापासून कपडे तयार करून भारतीय लोक वापरत असत, असेही दिसून येते.
चौदाव्या शतकापर्यंत इजिप्तमधून फ्लॅक्सची निर्यात होत होती परंतु कापूस, लोकर व रेशीम यांच्या शोधामुळे फ्लॅक्स मागे पडला. अठराव्या शतकाअखेर फ्लॅक्सला जगातील एक महत्त्वाचा तंतू म्हणून मानण्यात येत असे पण फ्लॅक्सचा संपूर्ण उद्योग घरगुती स्वरूपाचा होता. यूरोपातील औद्यागिक क्रांती व कापड उद्योगातील शोध यांमुळे त्याची जागा कापसाने घेतली कारण कापूस पिकविण्याच्या व कापडनिर्मितीच्या दृष्टीने स्वस्त व सुटसुटीत होता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत रशिया फ्लॅक्स उद्योगात अग्रेसर होता.
अमेरिकेत वसाहत करण्याकरिता सुरुवातीला गेलेल्या लोकांनी (पिल्ग्रीम फादर्सनी) तेथील जेम्सटाऊन व प्लिमथ येथे फ्लॅक्सची पहिली लागवड केली. वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक अमेरिकन कुटुंबात फ्लॅक्सचे तंतू व लोकर यांच्यापासून सूत कातण्यासाठी एक चरखा असणे हे अनिर्वाय गणले जात असे. यांत्रिक युगाच्या प्रचंड प्रगतीमुळे व दुसरे अनेक चांगले तंतू उपलब्ध झाल्यामुळे फ्लॅक्सचा उद्योग मागे पडला असला, तरी आजमितीलासुद्धा श्रीमंत लोकांत लिननचे टेबलक्लॉथ, गाद्यावरील पलंगपोस, टॉवेल इ. रूपांत त्याचा उपयोग चालू असून लिनन वापरणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. अजूनही ह्या कापडाचा वापर होण्यामागे बाष्पशोषकता, प्रत्येक धुण्याबरोबर वाढत जाणारी आकर्षकता व इस्त्री टिकून राहणे हे त्याचे गुण मुख्यतः कारणीभूत आहेत. नव्या कृत्रिम धाग्यात फ्लॅक्सचे तंतू सहजासहजी मिसळता येतात व या मिश्रणात दोन्ही तंतूंचे गुणधर्म एकत्रित करता येत असल्यामुळे फ्लॅक्सला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. १८४० सालापर्यंत फ्लॅक्सची लागवड फक्त तंतू व कापडनिर्मितीसाठीच करीत असत पण पुढे जसजसे भिंतींना लावण्याच्या तैलरंगाचे उत्पादन वाढू लागले तसतशी फ्लॅक्सची लागवड तेल काढण्यासाठीही वाढू लागली आहे. पुढेपुढे तर तेलासाठी योग्य व लिनननिर्मितीसाठी योग्य अशा वेगवेगळ्या स्वतंत्र बियाण्यांचा विकास झाला.
यूरोप खंडातील बहुतेक सर्व देशांत फ्लॅक्सची लागवड पूर्वापार होत असून फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नेदर्लंड्स, रशिया या सर्व देशांत चांगले व वैशिष्ट्यपूर्ण लिननचे कापड तयार होते. ब्रिटन व बेल्जियमखेरीज यूरोपातील सर्व देशांत स्वतःपुरते फ्लॅक्सचे उत्पादन होते. उत्तर आयर्लंडमधून फ्लॅक्सच्या तयार मालाची सर्वांत जास्त निर्यात होते. अमेरिकेत फ्लॅक्सचे अगदी थोडे उत्पादन व तेथे अग्निशामक दलाकरिता लागणारे नळ (होज), शिवण्याचा धागा व मासेमारीकरिता जाळी तयार करण्यासाठी लागणारा फ्लॅक्स मुख्यतः बेल्जियम आणि लक्झेंबर्ग येथून आयात केला जातो.
फ्लॅक्सची लागवड व त्यापासून धागा तयार करण्याची रीत इतर धाग्यांच्या मानाने खर्चाची असल्याने फ्लॅक्सच्या कपड्यांचे उत्पादन हल्ली थोड्याच प्रमाणात करतात परंतु अठराव्या शतकापर्यंत यूरोपात व अमेरिकेत फ्लॅक्सचा सर्वांत जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यापासून नरम धागा तयार करून सुती कापडाच्या मागावर त्यापासून कापड तयार करण्याच्या पद्धतींचा शोधही त्या काळात लावण्यात आला. तथापि या सर्व पद्धतींनी धागा कमजोर होई व त्यामुळे त्या मागे पडल्या.
पिकाचीलागवड : फ्लॅक्स हे वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारे) झुडूप असून त्याची उंची २५ सेंमी. ते १ मी. असते. धाग्याकरिता लागवड केलेल्या झाडांचे खोड सरळ बारीक काठीसारखे, हिरवट असते. ही झाडे जवळजवळ लावण्यात येत असल्याने त्यांच्या शेंड्यांनाच फांद्या येतात. त्यांच्या अशा खोडाचा व्यास सु. २·५-४·५ मिमी. असतो. धाग्याकरिता लागवड केलेल्या झाडांची उंची जास्त असते व त्यांपासून जास्त लांबीचा व मऊ धागा मिळतो. भारतात बियांकरिताच प्रामुख्याने फ्लॅक्सची लागवड करण्यात येते. (फ्लॅक्सचे वनस्पति – वर्णन आणि भारतातील पिकासंबंधीची माहिती याकरिता ‘अळशी’ ही नोंद पहावी.)
फ्लॅक्सचे पीक घेणे फार कठीण असते कारण जमिनीची योग्य तऱ्हेने मशागत करणे व फ्लॅक्सच्या आधी घेण्यात येणाऱ्या पिकांचा एक विशिष्ट क्रम ठेवणे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. यांशिवाय उत्पादन वाढविण्यासाठी नियमितपणे खते घालणे अनिवार्य असते. योग्य वेळी पीक काढणे, तंतू मोकळे करण्यासाठी ताटे कुजविणे व इतर प्रक्रिया करणे इत्यादींसाठी अनुभव व कसब यांची आवश्यकता असते. याशिवाय निरनिराळ्या रोगांचा व कीटकांचा फ्लॅक्सवर प्रतिकूल परिणाम त्वरित होतो. पोषक वातावरणात अर्थातच हे पीक फायदेशीर रीत्या काढता येते. फ्लॅक्सच्या बाबतीत पिकांची फेरपालट अतिशय महत्त्वाचे असते. दरवर्षी फ्लॅक्सचे पीक त्याच जमिनीत पेरण्याने उत्पादनावर व फ्लॅक्सच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम होतो, शिवाय जमिनीची प्रतही खालावते. बेल्जियममध्ये चांगला शेतकरी फ्लॅक्सच्या दोन पीकांमधील अंतर कमीत कमी सात वर्षे ठेवतो. काही वेळा हे अंतर अकरा वर्षांचे असते. तसेच ज्या जमिनीतून घेवडा, वाटाणा, बटाटा व क्लोव्हर जातीच्या चाऱ्याच्या गवताचे पीक काढलेले असेल, अशा जमिनीत फ्लॅक्सची लागवड करीत नाहीत. तसेच सलगमचे पीक घेतलेल्या जमिनीतही लगेच फ्लॅक्स लावीत नाहीत. बीट किंवा धान्याच्या पिकावर (उदा., ओट किंवा गहू) फ्लॅक्स लावणे सगळ्यांत उत्तम असते, असे म्हणतात.
प्रकार : फ्लॅक्सची लागवड एकतर तंतूसाठी करतात किंवा बियांसाठी करतात. त्या त्या कामासाठी योग्य प्रकारच्या झाडाची लागवड करतात. धाग्यांच्या उत्पादनासाठी जास्तीत जास्त पीक देणाऱ्या वा अधिक रोगप्रतिकारक्षम अशा फ्लॅक्स प्रकाराची लागवड करतात.
फ्लॅक्सच्या प्रकारांची वर्गवारी फुलांच्या रंगांच्या आधारे केली जाते. उदा., पांढरी, निळी व बैंगणी किंवा जांभळी फुले येणारे फ्लॅक्स प्रकार. पांढऱ्या फुलांचा फ्लॅक्स (ला. युसिटॅटीसिममआल्बम) निळ्या फुलांच्या फ्लॅक्सपेक्षा (ला. युसिटॅटीसिममव्हल्गेर) टणक असून बिया व तंतू यांचे जास्त उत्पादन देणारा असतो. अर्थात असे तंतू हे कताईच्या दृष्टिने हलक्या प्रतीचे असतात. जांभळ्या फुलांचा फ्लॅक्स व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत नाही परंतु त्याचा उपयोग इतर दोन प्रकारांच्या फ्लॅक्सशी संकरण करून नवीन प्रकार निर्माण करण्यात करतात. उंच व सडपातळ खोड असणारे प्रकार तंतु-उत्पादनासाठी वापरतात. ठेंगणे व जास्त फांद्या असणारे प्रकार बिया मिळविण्यासाठी लावतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ब्रिटनमधील फ्लॅक्स उद्योग मुख्यतः उत्तर आयर्लंडमध्ये केंद्रित होतो. त्यावेळी फ्लॅक्स लागवडीसाठी लागणारी सर्व बीजे रशिया किंवा हॉलंडमधून आयत केली जात असत. ‘रीगा’ किंवा ‘पेरनॉ क्राउन’ या वाणाची आयात केली जात असे. अर्थात त्यावेळी एवढे भिन्न प्रकार ज्ञात नव्हते. रशियातून आणलेल्या बीजांपासून फ्लॅक्स प्रजनन तेथे १९२० मध्ये सुरू झाले. त्यातून ‘लिरल’ व ‘स्टॉरमाँट’ श्रेणीचे विविध प्रकार उदयास आले. त्याच सुमारास इतर देशांत उदयास आलेले फ्लॅक्सचे प्रकार म्हणजे अतिशुभ्र फुलांचा फ्लॅक्स ‘कंकरंट’, तसेच ‘आर्क-एन-सीएल’, ‘फोरटेक्स’, ‘नोबलसी’, ‘डायना’, ‘सॉलिड’ इ. होत. १९५३ च्या सुमारास पांढऱ्या फुलांच्या ‘वीरा’ नावाच्या डच प्रकाराच्या फ्लॅक्सची उत्पत्ती झाली. ‘कंकरंट’ व ‘हर्क्युलस’ ह्या प्रकारांचे संकरण करून हा प्रकार निर्माण झाला आहे आणि अनेक देशांत त्याने इतर प्रकारांच्या फ्लॅक्सवर आघाडी मारली आहे. वीराचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात रोगप्रतिकारशक्ती जास्त असून तिच्यापासून चांगल्या रंगाचा फ्लॅक्स तंतू निघतो. शिवाय हा फ्लॅक्स प्रकार अधिक उत्पादन देणारा आहे. त्यामुळे वीरा हॉलंड व बेल्जियममध्ये खूप लोकप्रिय आहे. तिच्यापासून दर हेक्टरी सु. ९०० किग्रॅ. फ्लॅक्सची निर्मिती होते. सर्व फ्लॅक्स प्रकारांमध्ये ही सर्वाधिक निर्मिती होय. नोबेलसी हा अशाच प्रतीचा पण निळी फुले धारण करणारा प्रकार होय.
काढणी: पुष्कळदा फ्लॅक्सचे पीक शेतात उभे असतानाच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या ग्राहकाला विकण्यात येते. साधारणतः हिरवी खोडे संपूर्ण पिवळी व्हावयाच्या आधीच फ्लॅक्सची काढणी करतात. तसे केल्यामुळे फ्लॅक्सच्या तंतूतील नैसर्गिक ताणबल कायम राहते तसेच त्याचा मृदू व रेशमासारखा गुणधर्मही कायम राहतो. साधारणतः ज्या वेळी खालचा २/३ खोडाचा भाग पिवळा होतो व सर्व पाने झडून पडतात, त्यावेळी फ्लॅक्सची काढणी करतात. हे साधारणतः पहिले फूल उमलल्यावर एक महिन्यानंतर घडते.
फ्लॅक्सची काढणी करण्याचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. काढणीपूर्वी जर फ्लॅक्सची झाडे खूप वेळ जमिनीवर उभी राहू दिली, तर त्यांचे काष्ठिरीभवन (कोशिकांच्या-पेशींच्या-भित्तींच्या घटकांचे लाकडात रूपांतर होणे) होऊन तंतूंचे काही उपयुक्त गुणधर्म नाहीसे होतात व त्यांची प्रत खालावते. त्याउलट जर लवकर काढणी केली, तर तंतूचा उतारा कमी येतो. कोरड्या हवामानात काढणी करणे जास्त उपयुक्त ठरते कारण पावसाळी वातावरणात उपटलेली फ्लॅक्सची झाडे सम प्रमाणात वाळत नाहीत.
उपटणी: साधारणतः कापणी करून शेतातील पिके काढतात पण फ्लॅक्सचे पीक उपटून काढणे जास्त फायदेशीर असते. ऑस्ट्रेलियात मात्र कापणी करतात. पूर्वी उपटणी हाताने करीत असत परंतु आता यांत्रिक पद्धतीने ही क्रिया होते. कापणीपेक्षा उपटणी जास्त चांगली कारण कापणीत फ्लॅक्सचे कापलेले टोक खराब होते. तसेच फ्लॅक्सच्या झाडाबरोबर तणही कापले जाते. शिवाय सु. १५ सेंमी. खोड वाया जाते व त्याचा परिणाम तंतूची लांबी कमी होण्यात होतो. ज्वारीची ताटे जशी उपटतात त्याच पद्धतीने फ्लॅक्सची झाडे मुळासकट उपटतात. मुळे एकसारखी करून योग्य आकारमानाच्या पेंढ्या करून वाळायला ठेवतात. फ्लॅक्स उपटताना तण किंवा इतर अनिष्ट ताटे उपटली जाणार नाहीत याची काळजी घेतात. उंच झाडे आधी उपटून त्यांच्या पेंढ्या बांधतात व नंतर ठेंगणी ताटे उपटून त्यांच्या वेगळ्या पेंढ्या बांधतात. दोन माणसे एकाच वेळी हे काम करू शकतात. पहिला माणूस उंच ताटे उपटतो व त्याच्या मागून येणारा दुसरा माणूस उरलेली ठेंगणी ताटे उपटून वेगळी ठेवतो. अशी वर्गवारी केल्याने ताटे कुजविणे, बडविणे या क्रिया सुलभ होतात.
हाताने उपटण्याची क्रिया सावकाश होणारी व महाग असते, तरीसुद्धा चांगल्या प्रतीचा फ्लॅक्स ह्याच पद्धतीने काढतात. कमी प्रतीचा फ्लॅक्स मात्र यांत्रिक पद्धतीने उपटतात. अमेरिकेत व बेल्जियममध्ये फ्लॅक्स उपटण्याची विविध प्रकारची यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरतात. फ्लॅक्सची लागवड मोठ्या शेतात केली असेल तेथेच यांत्रिक पद्धतीची उपटणी आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखी असते.
फ्लॅक्सची उपटणी तीन अवस्थांत करतात. यांपैकी प्रथम अवस्थेत झाडाला नुकतेच फुले येणे संपलेले असते व खोडाची कांडी अजूनही हिरवी असते. या अवस्थेला हिरवी पक्व अवस्था म्हणतात. दुसऱ्या अवस्थेत कांड्या पिवळ्या पडलेल्या असतात. या अवस्थेला पिवळी पक्व अवस्था म्हणतात आणि तीत फांद्यांवर बिया तयार झालेल्या असतात. तिसरी अवस्था म्हणजे तपकिरी पक्व अवस्था होय. या अवस्थेत बियांचे कोश पक्व झालेले असतात. पहिल्या अवस्थेतील उपटणीपासून तयार झालेला धागा बारीक, मऊ पण थोडा कमजोर असतो व त्याचे उत्पादनही थोडे मिळते. तपकिरी पक्व अवस्थेतील उपटणीपासून मिळणारा धागा जाडाभरडा व विणण्यास अवघड पण जास्त बळकट व वजनदार असतो.
वाळविणे: उपटणीनंतर फ्लॅक्सच्या पेंढ्या १-२ दिवस वाळवण्यासाठी जमिनीवर तशाच पडू देतात यामुळे कांड्या वाकत नाहीत. नंतर त्यांची रास (गंज) करून १० ते १५ दिवस वाळवतात. कधी कधी रास घालण्याऐवजी पेंढ्या एका विशिष्ट रीतीने रचून त्यात मुबलक हवा खेळत राहील, याची काळजी घेतात. वाळल्यानंतर फ्लॅक्स पुढील प्रक्रियेसाठी गिरणीत नेतात. पूर्णपणे वाळलेली ताटे सरळ, लांब व गडद पिवळ्या रंगांची असतात. प्रक्रिया करण्यासाठी साधारणतः १ मी. लांब व १·५ मिमी. व्यासाची ताटे जास्त सोयीची मानतात. फ्लॅक्सचे हेक्टरी उत्पादन जमिनीची प्रत, हवामान, फ्लॅक्सचा प्रकार व ॠतू यांवर अवलंबून असते. साधारणतः हेक्टरी ५०० ते ९०० किग्रॅ. उत्पादन मिळते.
बियाकाढण्याचीप्रक्रिया: (रिप्लिंग). जसे सरकी व कापसाचे तंतू वेगळे करण्याच्या क्रियेला ‘जिनींग’ असे म्हणतात, तसेच फ्लॅक्सच्या झाडांपासून बिया वेगळ्या करण्याच्या क्रियेला ‘रिप्लिंग’ असे म्हणतात. फ्लॅक्स वाळवून झाल्यावर आणि त्यावर कुजविण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रिप्लिंग ही प्रक्रिया करतात. याकरिता एका लोखंडी फणीतून फ्लॅक्सची ताटे ओढून काढतात. त्यामुळे बिया तुटून खाली पडतात. या प्रक्रियेकरिता यंत्रेही वापरण्यात येतात. अशा यंत्रात असणाऱ्या फिरत्या नखीमुळे बियांची बोंडे तुटून पडतात. एक टन तंतूमय फ्लॅक्स सु. १०० किग्रॅ. बिया देतो. या बिया साधारणपणे तेल काढण्यासाठी वापरतात. या बियांचा पेरण्यासाठी वापर करीत नाहीत. बिया काढल्यानंतर ताटांची हाताने वर्गवारी करतात. एकाच प्रतीची व सारख्या लांबीची ताटे एकत्र बांधून त्यांच्या पेंढ्या करतात. अशा तऱ्हेने फ्लॅक्स कुजविण्याच्या प्रक्रियेसाठी तयार होतो.
कुजविण्याचीप्रक्रिया: फ्लॅक्स ताटाच्या सालीतील काष्ठमय भाग कुजवून तंतू मोकळे करण्याच्या प्रक्रियेला ‘कुजविणे’ असे म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया जर व्यवस्थित झाली नाही, तर तंतूंची खराबी होऊन कमी प्रतीचे तंतू मिळतात. ह्या प्रक्रियेमुळे फ्लॅक्स तंतू त्यांच्या सभोवतालच्या सालीपासून व इतर कोशिकांपासून सूक्ष्मजंतू, कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व पाणी यांच्या संयुक्त क्रियेमुळे मोकळे होतात. कुजविण्याची प्रक्रिया माफक (कमी तीव्रतेची) होण्यावर तंतूंची प्रत अवलंबून असते. कारण ती जास्त जीव्र झाल्यास तंतू कमजोर होतात आणि याउलट जर ती अपुरी राहिली, तर तंतू वेगळे करणे अवघड जाते व ते तुटण्याचा संभव असतो. कुजविणे क्रिया जास्त काळ सुरू राहिल्यास तंतूंना जोडणारे बंध अलग होतात. असे होऊ नये म्हणून कुजविण्याची प्रक्रिया योग्य वेळी थांबवावी लागते. हे अनुभवानेच साधते. पाण्याचे तापमान, पाण्याचे स्वरूप, फ्लॅक्सच्या ताटांचे स्वरूप इ. गोष्टींवर कुजविण्याच्या प्रक्रियेचा काळ अवलंबून असतो.
पाणी, सूक्ष्मजंतू व कवक यांच्या संयुक्त क्रियेने ताटातील काष्ठमय भाग कुजतो. मात्र तंतुमय भाग तसाच राहतो. ताटे पाण्यात भिजविल्याने कांड मऊ होऊन वेगळे होते. त्यातील हवा बाहेर फेकली जाते व विद्राव्य (विरघळणारा) भाग पाण्यात विरघळतो. ह्या प्रक्रियेसाठी लागणारे सूक्ष्मजंतू पाण्यात असतात. तसेच ते ताटातही असू शकतात किंवा हवेतूनही पाण्यात प्रवेश करू शकतात. अशा अत्यल्प प्रमाणात असलेल्या सूक्ष्मजंतूची वाढ अनकूल परिस्थितीत अत्यंत झपाट्याने होते व कांडाचे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते. कुजविण्याच्या पाण्यात ऑक्सिजीवी (ज्यांच्या शरीरक्रियेसाठी मुक्त ऑक्सिजनची आवश्यकता असते असे) आणि अनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतू, यीस्ट (एक प्रकारचे कवक), बुरशी, कॉलिफॉर्म सूक्ष्मजंतू, स्ट्रेप्टोकोकाय इ. सूक्ष्मजंतू आढळतात पण त्यांपैकी क्लॉस्ट्रिडियमब्युटिरिकम नावाचे सूक्ष्मजंतूच कुजविण्याच्या प्रक्रियेला मुख्यत्वेकरून काणीभूत होतात. कुजविण्याच्या प्रक्रियेत प्रथम मध्यपटलातील पेप्टिक पदार्थाचे अपघटन होते. त्यानंतर ⇨ ऊतककर, काष्ठस्तर, परिकाष्ठ [ अन्नरसाची ने – आण करणारे ऊतक तंत्र ⟶ परिकाष्ठ] आणि शेवटी तंतुगठ्ठे व घनभित्तीयुक्त बाह्य त्वचा यांना जोडणारे ⇨ मृदूतक यांचे अपघटन होते.
कुजविण्याची प्रक्रिया खालील विविध पद्धतींनी करतात.
(१) दवकुजवणपद्धती : भरड, हिरवा, पट्टेदार, रोगट, मोडलेला वा इतर कारणांनी निरूपयोगी ठरलेला फ्लॅक्स ह्या सोप्या व बिनखर्चाच्या पद्धतीने कुजवितात.
ह्या पद्धतीत फ्लॅक्सच्या कांड्या गवतावर नीट आंथरतात. सूक्ष्मजंतू, दव व हवा ह्यांच्या क्रियेमुळे तंतूंच्या पेंढ्याभोवती असणारे चिकट पदार्थ व इतर कोशिका पाण्यात विरघळतात व तंतू पूर्णपणे सुटे होतात. ही क्रिया पूर्ण होण्यास हवामानाच्या परिस्थितीनुसार २-३ आठवडे लागतात. वसंत ॠतूत या पद्धतीने कुजविण्याची प्रक्रिया चांगली होते. ह्या पद्धतीने मिळणारे तंतू काळसर व कमी प्रतीचे असतात. म्हणून ही पद्धत पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल अशा ठिकाणी वापरतात. जेथे रात्री पुष्कळ दव व दुपारी कडक ऊन पडते तेथे ह्या पद्धतीचा अवलंब करून उत्तम प्रतीचे तंतू काढता येतात (उदा., फ्रान्स, जर्मनी, अमेरिका व रशियाचा काही भाग) तथापि ह्या पद्धतीत वेळ जास्त लागतो तसेच ह्या पद्धतीचे यशापयश हवामानावर अवलंबून असते आणि म्हणून तिच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.
(२)मुबलकपाण्याच्यासहाय्यानेकुजविणे: उच्च प्रतीचा फ्लॅक्स कुजविण्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग करतात. फ्लॅक्सच्या पेंढ्या नदीच्या वा डबक्याच्या पाण्यात तसेच कारखान्यातील टाकीत किंवा कुंडात कुजवितात. पाणी कोणतेही असले, तरी प्रक्रियेची तत्त्वे सामान्यतः सारखीच असतात. पाणी जितके स्वच्छ व लवणरहित असेल तितक्या अधिक प्रमाणात तंतू स्वच्छ व मऊ होतात. काहीवेळा फ्लॅक्सची वर्गवारी करून वेगवेगळे कुजवितात. जल कुजवण पद्धती गार पाण्याने (सु. ३०° से.) व दुसरी गरम पाण्याने (सु. ८०° से.) अशा दोन तऱ्हांनी करता येते.
थंड पाण्याने कुजविण्याच्या पद्धतीत भरपूर पाणी असलेले तलाव, नदी, डबकी इत्यादींचा उपयोग करतात. फ्लॅक्स ताटांचे गठ्ठे पडावात व मचव्यावर ठेवून त्यावर दगड ठेवून बुडवितात. ह्या पद्धतीत कुजण्यासाठी ३-५ दिवस लागतात. वाहत्या पाण्यमुळे तयार होणारे अम्ल नदीच्या प्रवाहात वाहून जात असते. त्यामुळे असा फ्लॅक्स उच्च प्रतीचा असतो. बेल्जियममध्ये ह्याच पद्धतीने फ्लॅक्स कुजवितात. डबक्यात कुजविण्याची क्रिया २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालते.
अलीकडे काँक्रीटचे हौद तयार करून त्यांमध्ये २५° ते ३२° से. तापमानाचे पाणी भरून त्यात फ्लॅक्सच्या पेंढ्या ठेवतात. कुजविणे पूर्ण होईपर्यंत पाण्याचे मूळचे तापमान कायम ठेवतात. पहिल्या ७-८ तासांत कांड्यांतील रंग, चिकट पदार्थ व इतर घाण धुतली जाते. ह्या क्रियेला निक्षालन असे म्हणतात. पाणी काढून पुन्हा स्वच्छ पाणी भरले म्हणजे ५-६ दिवसांनंतर कांड्यापासून तंतू वेगळे होतात व प्रक्रिया पूर्ण होते. संथ पाण्यात होणाऱ्या प्रक्रियेला त्यातील पाण्याच्या तापमानानुसार १५-२० दिवस लागतात.
गरम पाण्याचा वापर करून कुजविण्याची प्रक्रिया त्यामानाने आधुनिक आहे. ह्या पद्धतीत कुजविण्याची प्रक्रिया सर्वात जलद (६ ते ८ दिवसांत) होते. ह्या पद्धतीत सामान्यतः काँक्रीटचे हौद वापरण्यात येतात आणि पाण्याचे तापमान व इतर गोष्टींवर योग्य नियंत्रण ठेवता येते. ह्या पद्धतीत उत्तम प्रतीचा फ्लॅक्स तंतू मिळतो. तंतूंवर डाग नसतात व रंगही चांगला असतो.
दुहेरीकुजवणप्रक्रिया : बेल्जियममध्ये उच्च प्रतीच्या फ्लॅक्सवर दोनदा कुजविण्याची प्रक्रिया करतात. कुजविण्याची प्रक्रिया जवळजवळ पहिल्याच खेपेस पूर्ण होते. दुसरी खेप ही फक्त पूरक असून पहिल्या प्रक्रियेत राहिलेल्या सूक्ष्मजंतूंमार्फत ती पूर्ण करतात. पहिल्या प्रक्रियेनंतर फ्लॅक्स काढून वाळवितात व काही महिन्यांनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणचे पण कमी काळ कुजविण्याची प्रक्रिया करतात.
वायवीयकुजवण : ज्या प्रदेशात फ्लॅक्सची पावसाळ्यात लागवड व उन्हाळ्यात काढणी करतात, त्या प्रदेशात पाण्याच्या कमतरतेमुळे कुजविण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होतात. उष्ण हवामानामुळे कुंडाजवळ डास, माश्या, यांची वाढ होते. शिवाय पाण्याच्या अभावी अपशिष्ट द्रव्यांचा निचरा करणे अवघड जाते. कुजवण कुंडातील पाण्याला असह्य असा घाण वास येतो. अशा वेळी कुजवण कुंडातील विद्रावात (पाण्यात) योग्य नियंत्रणात हवा सोडतात. मूळ विद्राव जर अम्लीय असेल, तर हवेच्या अंतर्भावाने तो क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असणारा) होतो व त्याचा वास कमी होतो. तसेच त्या द्रवाची प्रदूषणक्षमताही कमी होते. हवेच्या अंतर्भावाने विद्रावाचे तापमान मात्र वाढते. अशा कुजवण विद्रावात अनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतू असून ते मोठ्या प्रमाणात हवा विद्रावात सोडूनही जिवंत राहतात व वाढतात.
कुजवण कुंडातील विद्रावात पुष्कळ विषारी द्रव्ये असतात व हे पाणी माशांना फार अपायकारक असते म्हणून ते प्रवाहात सोडण्यापूर्वी त्यातून हवा खेळवून शुद्ध करावे लागते. त्यात पुष्कळ उपयुक्त लवणे व अम्ले असल्यामुळे त्यात चुनखडी मिसळून त्यापासून खतही तयार करतात.
रासायनिककुजवण : ह्या पद्धतीत कुजविण्याच्या प्रक्रियेसाठी मुख्यतः रसायनांचा वापर केला जातो. उदा., धुण्याचा सोडा, दाहक सोडा व ऑक्झॅलिक अम्ल. ह्यात होणाऱ्या रासायनिक विक्रियांवर नियंत्रण ठेवणे फार कठिण असते आणि म्हणून त्यांचे फार काळजीपूर्वक व सतत निरीक्षण करावे लागते. रासायनिक विक्रिया जरादेखील जास्त किंवा कमी झाली तरी त्याचा परिणाम कमजोर व कमी प्रतीचे तंतू मिळण्यात होतो. ही पद्धती सापेक्षतः जास्त खर्चाची परंतु जलद आहे. या पद्धतीस अजून तरी विशेष मान्यता मिळालेली नाही.
संकीर्णपद्धती : दव कुजवण पद्धतीप्रमाणेच रशिया व स्वीडनमध्ये हिम कुजवण पद्धती वापरात होती. ह्यात हिमतापाच्या संपूर्ण काळात कुजविण्याची प्रक्रिया चालू असते. जर्मनीत अत्युच्च प्रतीचा फ्लॅक्स गरम पातळ दुधात ४-५ दिवस कुजवत असत. काही देशांत झाडांच्या राखेच्या विद्रावात कुजविण्याची प्रक्रिया करीत असत.
निक्षालन : कुजविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ताटे धुतात. त्यांतील हवा बाहेर काढतात. त्यानंतर ताटापासून जलविद्राव्य घटक अलग करण्याच्या प्रक्रियेस निक्षालन असे म्हणतात. निक्षालन कुंडात ताटे ठेवल्यावर पाणी आत सोडून ती काही तास तशीच ठेवतात. नंतर पाणी काढून टाकतात. त्यामुळे पहिल्या दोन तासांत ८-१० % वजन कमी होते. हवेचे बुडबुडे येऊ लागतात. कुजवण प्रक्रियेच्या शेवटी कुंडातील विद्राव गडद करडा होतो व करड्या रंगाचा फेस येतो. फ्लॅक्सचा प्रकार व पाण्याचे तापमान यांवर निक्षालनाचा काळ अवलंबून असतो. सु. ३२° से. ला ३-४ तास, तर कमी तापमानास ८ ते १५ तास लागतात.
शेवटी काही वेळा फ्लॅक्सची ताटे लोखंडी रुळावरून नेतात. त्यामुळे पाणी व चिकट पदार्थ तंतूंपासून अलग होतात.
वरील कोणत्याही पद्धतीने कुजविण्याची प्रक्रिया झाल्यानंतर फ्लॅक्सच्या तंतूच्या लहान लहान जुड्या करून ताटे पूर्णपणे वाळवितात. वाळविण्यामुळे किण्वन (सूक्ष्मजंतूंमुळे होणारे अपघटन) थांबते. कुजविलेल्या ताटांचे पसरट पाया असलेले शंक्वाकृती गठ्ठे करून उघड्या जागी उभे करतात. त्यामुळे हवेचे चलन व्यवस्थित होते. दिवसाआड जुड्या फिरवून आतील भाग बाहेर आणतात. हवामानानुसार वाळविण्याचा काळ २-३ दिवस किंवा त्याहूनही अधिक असतो. काही वेळा ताटे जमिनीवर पसरवून उलट सुलट करून वाळवितात. यांत्रिक पद्धतीनेही वाळविण्याची क्रिया करतात. वाळलेल्या जुड्या पक्क होण्याकरिता त्या सावलीत एक-दोन महिने झाकून ठेवतात. असे केल्याने तंतू जास्त बळकट होतात आणि त्यांवर करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेत वाया जाणाऱ्या तंतूंचे प्रमाण कमी होते.
भंजनवबडविण्याचीप्रक्रिया : फ्लॅक्सच्या जुड्या वाळविल्यानंतर कांडातील काष्ठमय भागापासून फ्लॅक्स तंतू मोकळे करणे जरूर असते.
फ्लॅक्स ताटांचे भंजन करण्यासाठी ताटे धातूच्या दोन पन्हळी रुळांतून नेतात. यामुळे काष्ठमय भागाचे भंजन होऊन त्याचे लहान लहान तुकडे होतात. त्यांना काष्ठखंड असे म्हणतात. ह्या प्रक्रियेने फ्लॅक्सच्या लवचिक तंतूंवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. बडविण्याच्या प्रक्रियेत यंत्राच्या साहाय्याने काष्ठखंड तंतूंपासून वेगळे केले जातात. लाकडी पाते किंवा मोगरा यांच्या साहाय्याने बडवूनही भंजन प्रक्रिया करतात. नंतर खाचा असणाऱ्या दोन लाकडी रुळांतून फ्लॅक्स नेतात आणि त्यानंतर लाकडी चौकटीवरील खाचेत बसवून घट्ट धरतात आणि रुंद सपाट व गुळगुळीत लाकडी पात्यांनी हाताने बडवितात. यावेळी कांड सर्व बाजूंनी बडविले जाईल अशा तऱ्हेने फिरवत ठेवतात. त्यावेळा त्यातून भेंड व तंतूंला जोडणारे इतर धारक भाग वेगळे होतात. बडविताना व भंजन प्रक्रियेत तंतू न तुटता फक्त भेंडाचा नाश होईल अशी काळजी घेतात. त्यामुळे फ्लॅक्सचा उतारा जास्त पडतो आणि त्याची गुणवत्ताही वाढते.
बडविण्याचे पहिले यंत्र म्हणजे फ्लेमिश चक्र होय. त्याच्या चक्राला १२ हलती लाकडी पाती असतात. हे यंत्र अद्यापही उत्तम प्रतीच्या फ्लॅक्सच्या अखेरच्या टप्प्यासाठी वारतात. १९३६ साली टरबाइन यंत्राचा शोध लागला. त्याच्या वापराने उत्पादन खर्च व कामगार कमी लागू लागले. हे यंत्र दोन भागांचे बनलेले असून पहिल्या भागात भेंडाचे तुकडे होतात व दुसऱ्या भागात बडवून तंतू अलग करतात. बडविण्याचे दोन प्रकार असतात. पहिल्यात कांड पसरट केले जाते व दुसऱ्यात साफ करतात. बडविताना लांब तंतू तुटतात व लहान तंतू तयार होतात. त्यांचे गठ्ठे बांधून दोर, जाडेभरडे कापड इ. वस्तू तयार करण्यासाठी पाठवतात.
नंतर तंतूंच्या जुड्या लोखंडी फणी यंत्राच्या दातांमधून विंचरल्याने तंतू अलग होतात. एकामागून एक व एक सेंमी. मधील दातांची वाढती संख्या असलेल्या अनेक फण्या मांडलेल्या असतात. त्यामुळे विंचरण क्रिया चांगल्या प्रकारे होऊन लहान तंतू किंवा बुरकुल रेखीय (तलम) तंतूंपासून अलग केले जातात. हल्ली हि क्रिया जरी यंत्राच्या साहाय्याने तिप्पट वेगाने होत असली, तरी अजूनही हाताने विंचरून तयार केलेल्या तंतूंची प्रत श्रेष्ठ समजण्यात येते. अर्थात असे धागे महाग असतात. विंचरल्यानंतर फ्लॅक्स तंतू कताईसाठी व नंतर लिनन कापडाच्या विणाईसाठी तयार होतात. हे तंतू नंतर कापड गिरण्यांकडे पाठविण्यात येतात [⟶ लिनन ].
हिरवाफ्लॅक्स: कुजविण्याच्या प्रक्रियेशिवाय फ्लॅक्सच्या ताटांपासून तंतू काढता येतात. अशा तऱ्हेने मिळविलेल्या फ्लॅक्स तंतूंना हिरवा फ्लॅक्स असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये हिरव्या फ्लॅक्सची निर्मिती होत असे. त्याच सुमारास न्यूझीलंडमध्येही फार थोडा काळ हिरव्या फ्लॅक्सची निर्मिती होत होती. हिरवा फ्लॅक्स काढण्याची क्रिया जास्त अवघड असल्याने त्याचे आता विशेष उत्पादन होत नाही. फ्लॅक्सची ताटे उपटून, बिया काढून त्यावर कुजविण्याची प्रक्रिया न करता सरळ भंजन यंत्रात व बडविण्याच्या यंत्रात नेतात. कुजविण्याची प्रक्रिया गाळल्यामुळे साहजिकच बऱ्याचशा प्रमाणात अनिष्ट द्रव्य तंतूंना लागलेले असते. ह्याच कारणामुळे कताई करण्यापूर्वी फ्लॅक्सवर त्यातील डिंक अलग करण्याची प्रक्रिया करावी लागते. चांगल्या प्रकारे तयार केलेला हिरवा फ्लॅक्स कुजविण्याच्या प्रक्रियेने मिळविलेल्या फ्लॅक्सपेक्षा जास्त बळकट असतो. हिरव्या फ्लॅक्सची कताई करून अतिसूक्ष्म सूत कातता येते व त्यापासून विणलेले कापडही तलम व जास्त चांगले असते. असे असले, तरी हिरवा फ्लॅक्स लोकप्रिय होऊ शकला नाही, त्याचे मुख्य कारण म्हणजे कताईपूर्वी डिंक काढण्याची करावी लागणारी प्रक्रिया होय. शिवाय हिरव्या फ्लॅक्ससाठी बडविण्याची प्रक्रिया जास्त तीव्र करावी लागत असल्यामुळे आखूड तंतू खूपच जास्त प्रमाणात तयार होतात.
सूक्ष्मदर्शकीयसंरचना: फ्लॅक्सच्या खोडातील तंतूंचे स्थान व तंतुप्रकृती ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. खोडाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण केल्यास त्यात विशिष्ट प्रकारचे स्तर आढळतात. बाह्यस्तरावर वसावरण (स्निग्ध पदार्थाचे आवरण) असते. त्याला लागून असलेला दुसऱ्या स्तराला अपित्वचा किंवा बाह्यत्वचा असे म्हणतात. ह्या स्तराला दर चौ मिमी. ला सु. ४० त्वग्रंध्रे (सूक्ष्म छिद्रे) असतात. कुजविण्याच्या प्रक्रियेत ह्याच त्वग्रंध्रांतून जंतूंचा खोडात प्रवेश होतो. अपित्वचेखालीच मध्यत्वचा असते आणि ह्या मध्यत्वचेच्या आत फ्लॅक्स तंतू असतात. हे तंतू गठ्ठ्यांच्या रूपात असतात. हे तंतुगठ्ठे परिरंभात सामावलेले असतात. प्रत्येक गठ्ठ्यात १० ते ४० तंतू वा तंतुकोशिका असतात. एक तंतुगठ्ठा एक तंतुपट्ट होय. औद्योगिक फ्लॅक्स म्हणजे हेच तंतुपट्ट होत. एका खोडात साधारणतः ३० तंतुगठ्ठे असतात. ते मध्यत्वचेच्या आत खोडाच्या परिघाशी मांडलेले असतात. त्यामुळे एक वर्तुळाकृती तयार होते. दोन गठ्ठ्यांमध्ये सूक्ष्म अंतर असते. त्यामुळे खोडाच्या छेदाचे निरीक्षण केले असता सु. १,००० च्यावर तंतुकोशिकांचे छेद दृष्टीस पडतील. परिरंभ व परिकाष्ठ यामधील जागेत ऊतककर असते. ऊतककर म्हणजे खोडाच्या आतील पृष्ठभागावर असणाऱ्या सूक्ष्मभित्तीयुक्त कोशिकांचा थर होय. काष्ठकोशिका जाड व लहान असतात व त्यांची झाडांची वाढ होण्यास मदत होते. ह्या कोशिका निकाष्ठाभोवती (भेंडाभोवती) असतात. निकाष्ठ म्हणजे खोडातील सर्वात आतील स्तर होय. निकाष्ठ पोकळसर असून त्यात हवा भरलेली असते. खोडाच्या छेदाचे सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण केल्यास तंतुगठ्ठ्यातील स्वतंत्र तंतूचा छेद दिसतो. त्या छेदाचा आकार वर्तुळाकार किंवा बहुभुजाकृती असतो. तंतूच्या मध्यभागी अवकोशिका किंवा पोकळी असते. ही अवकोशिका हवेने भरलेली असते. तंतूची रुंदी (व्यास) सु. ०·०२ – ०·१० मिमी. असते. तंतूंची रुंदी टोकांना कमी असते. तर मध्यभागी ती जास्त असते. तंतूंची लांबी ८ – ४० मिमी. (सरासरी २५ मिमी.) असते. तंतू दोन्ही टोकांकडे निमुळते होत जातात. यामुळे तंतुगठ्ठ्याची रुंदी ही त्यातील विविध तंतूच्या रुंदीवर अवलंबून असते. प्रत्येक तंतुकोशिका एकमेकींना आडव्या दिशेने तसेच उभ्या (लांबीच्या) दिशेनेही जोडलेल्या असतात. अर्थात प्रत्येक तंतुकोशिकेची दोन्ही टोके वर व खाली असणाऱ्या दुसऱ्या कोशिकांच्या निमुळत्या टोकांशी जोडलेली असतात. त्यामुळे तंतुगठ्ठ्याची लांबी एकेरी तंतूच्या लांबीपेक्षा बरीच अधिक असते. ती २५ – १०० सेंमी. असू शकते. अशा एक मी. लांबीच्या तंतुगठ्ठ्यात सरासरी २५ मिमी. लांबीच्या सु. १,२०० तंतुकोशिका सामावलेल्या असतात.
प्रत्यक्षात तंतुकोशिका सारख्या लांबीच्या नसतात. फ्लॅक्सच्या झाडात तंतू अंतरकोशिकी द्रव्याने सांधलेले असतात. तंतुकोशिकांना सांधणाऱ्या आंतरकोशिकी द्रव्याला मध्यपटल असे म्हणतात व ते इतर प्रकारच्या कोशिकांना जोडणाऱ्या द्रव्याहून वेगळे असते. मध्यपटलाचे वैशिष्ट्य म्हणजे जसजशी झाडाची वाढ होत जाते तसतसे मध्यपटल टणक होत जाते व त्यासोबतच काष्ठिरीभवनाची क्रिया घडत असते. मध्यपटलाच्या टणकपणामुळे रसायने व जंतू यांचा त्यावर परिणम होत नाही व म्हणून कुजविण्याच्या प्रक्रियेत तंतुगठ्ठे खोडापासून सुलभ रीतीने त्यांच्या नैसर्गिक अवस्थेतच वेगळे करता येतात.
पहा : अळशी तंतु, नैसर्गिक लिनन
संदर्भ : 1. Kirby, R. H. Vegetable Fibres : Botany, Cultivation and Ultilization, London, 1963.
2. Watt, Sir G.The Commercial Products of India, New Delhi,1966.
देव, स. ग. लोखंडे, हि. तु.
“