फुकुओका : जपानच्या उत्तर क्यूशू विभागातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व बंदर. लोकसंख्या १०,३९,२८६ (१९७७ अंदाज). हे डेल्टा नदीवर, हाकाटा उपसागराच्या उत्तर शिरोभागी नागासाकीच्या ईशान्येस सु. ११० किमी.वर आहे. हाकाटा हे मध्ययुगात जपानचे निर्यात व्यापाराचे प्रमुख बंदर होते. १२७४ ते १२८१ मध्ये कूब्‍लाईखानाने या शहरावर हल्ले केले होते. नाका नदीमुळे शहराचे हाकाटा आणि फुकुओका असे दोन भाग झाले असले, तरी १८७८ मध्ये दोहोंचे एकत्रीकरण होऊन १९४० च्या सुमारास हाकोझाकी हा विभागही यात समाविष्ट झाल्यापासून शहराचा विकास झपाट्याने होत गेला.

कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जहाजबांधणी, जड रसायने, साखर शुद्धीकरण, यंत्रसामग्री, लोखंड व पोलाद कारखाने तसेच काचसामान, मृत्पात्रे, कागद, सुती व रेशमी कापड इ. उद्योग चालतात. यांपैकी बरीचशी उत्पादने निर्यात होतात. जगप्रसिद्ध हाकाटा बाहुल्यांची निर्मितीही येथेच होते. येथे ठोक व किरकोळ व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर चालत असून बॅंकिंग, विमा इ. व्यवसायही प्रगत आहेत.

फुकुओका बंदर आधुनिक सोयींनी सुसज्‍ज असून ते मच्छीमारीचे केंद्र आहे. आग्‍नेय आशियाशी येथूनच दैनंदिन वाहतूक चालू असते. लोहमार्गांनी देशातील अनेक शहरांशी हे जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

दुसऱ्या महायुद्धातील बाँबवर्षावात (१९४५) शहराची खूप नासधूस झाली. त्यानंतर आधुनिक पद्धतीने त्याची पुनर्रचना करण्यात आली. क्यूशू (स्था. १९१०) आणि इतर चार विद्यापीठे हाकोझाकी विभागात आहेत. वेस्ट पार्क भागामध्ये शासकीय कार्यालये, फुकुओका किल्ल्याचे अवशेष व सैनिकी बराकी आहेत. शहरातील ऐतिहासिक वास्तूंत कन्नोन्‌जी बौद्ध मंदिर, डाझैफू तेम्मांगू मंदिर आणि सोळाव्या शतकातील शिंतो-मंदिर यांची प्रामुख्याने गणना केली जाते.

ओक, द. ह.