फॉर्समन, व्हेर्नर टेओडोर ओटो : (२९ ऑगस्ट १९०४ – १ जून १९७९). जर्मन शस्त्रक्रियाविशारद. हृदय-शलाका तंत्र आणि रक्ताभिसरण तंत्राच्या (संस्थेच्या) विकृतिविज्ञानविषयक संशोधनाबद्दल १९५६ चे शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨ आंद्रे फ्रीदरिक कूरनांद व ⇨ डिकिन्सन वुड्रफ रिचर्ड्स या दोन शास्त्रज्ञांच्या समवेत फॉर्समन यांना विभागून देण्यात आले.
त्यांचा जन्म बर्लिन येथे झाला. १९२२ मध्ये ते वैद्यकाच्या अभ्यासाकरिता बर्लिन विद्यापीठात दाखल झाले. १९२९ मध्ये वैद्यकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते शस्त्रक्रियाविज्ञानाच्या रुग्णालयीन शिक्षणाकरिता बर्लिनजवळील एबर्स्वाल्ड येथील ऑगस्ट व्हिक्टोरिया होम या संस्थेत दाखल झाले.
या संस्थेत असतानाच त्यांनी हृदय-शलाका तंत्र स्वतःवर प्रयोग करून शोधून काढले. त्यांनी स्वतःच्या कोपराच्या अग्रभागी असलेल्या नीलेत प्रवेशिका (न मुडपणारी नलिका) बसवली आणि तीमधून हळूहळू एक सुषिरी (पोकळ नलिकाकार उपकरण) नीलेतूनच जाईल अशा बेताने वर सरकवली. सुषिरी ६५ सेंमी. लांबीपर्यंत शिरल्यानंतर ते तसेच क्ष-किरण विभागात चालत गेले. तेथे त्यांनी आपल्या छातीचे क्ष-किरण चित्र घ्यावयास लावले, त्या चित्रात सुषिरीचे टोक उजव्या अलिंदात (हृदयाच्या उजव्या बाजूच्या वरच्या कप्प्यात) असल्याचे स्पष्ट दिसले. या तंत्रामुळे हृदयातील रक्ताचे नमुने घेणे व तेथील रक्ताचा दाब मोजणे शक्य झाले आणि त्यामुळे हृदयविकारांच्या अभ्यासास मोठी मदत झाली. रक्तवाहिनी हृद-चित्रण (क्ष-किरणांना अपारदर्शी असलेल्या द्रव्याचे नीलेतून अंतःक्षेपण-इंजेक्शन-करून क्ष-किरण चित्र घेण्याचे) तंत्र वापरण्यात येऊ लागल्यानंतर फॉर्समन यांनी स्वतःच्या हृदयाचे व संबंधित मोठ्या रक्तवाहिन्यांचे क्ष-किरण चित्रण हे तंत्र वापरून दोन वेळा करून घेतले होते.
त्यांच्या मूळ प्रयोगाशी त्यांचे वरिष्ठ सहमत नव्हते व त्यांच्या धाडशी प्रयोगांना मान्यता मिळावयास काही वर्षांचा काळ जावा लागला, कारण कित्येक वर्षे हृद-सुषिरी प्रयोग अत्यंत धोकादायक असल्याची हाकाटी वैद्यकीय वर्तुळात चालू होती. या कारणामुळे त्यांनी आपले लक्ष मूत्रविकारांच्या अभ्यासावर केंद्रित केले.
काही काळ बर्लिन येथील चॅरिटी रुग्णालयात व माइन्त्स (मेंझ) येथील सिटी रुग्णालयात काम केल्यानंतर त्यांनी बर्लिनमधील रूडोल्फ फिरखो रूग्णालयात मूत्रविकारांचा अभ्यास केला. त्यानंतर ड्रेझ्ड्रेन-फ्रीड्रिखश्टाट येथील सिटी रूग्णालयात व बर्लिन येथील रॉबर्ट कॉख रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेममूक झाली. दुसऱ्या महायुद्धात ते लष्करी नोकरीत होते व त्यांनी सर्जन मेजर हा हुद्दा मिळविला परंतु नंतर १९४५ सालापर्यंत ते युद्धकैदी होते. युद्ध समाप्तीनंतर त्यांनी पत्नीसह वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. १९५० नंतर बाट क्रॉइट्सनाख येथे मूत्रविकार विशेषज्ञ म्हणून व्यवसाय केला. ते १९५८ पासून ड्युसेलडॉर्फमधील इव्हँजेलिकल रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख झाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज फॉर्समन यांना जर्मन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लायप्निट्स पदक (१९५४), माइन्त्स येथील योहानेस गूटेनबेर्क विद्यापीठात मानसेवी प्राध्यापक पद (१९५६), अर्जेंटिनातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉर्दोव्हा या विद्यापीठात मानसेवी प्राध्यापक पद (१९६१), ड्युसेलडॉर्फ विद्यापीठात मानसेवी प्राध्यापक (१९६४), ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे परदेशी सदस्य (१९६७), बंगलोर येथील इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय फेलो (१९६७), इटालियन मेडिको चिरुर्जिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९६८) इ. बहुमान मिळाले.
त्यांनी जर्मन वैद्यकीय नियतकालिकांतून पुष्कळ संशोधनपर लेख लिहिले. ते पश्चिम जर्मनीतील चॉप्सहाइम येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.