फाहियान : (इ. स. सु. ३४० –सु. ४२२ ?). भारतात इ. स. ४०० ते ४११ च्या दरम्यान आलेला एक चिनी प्रवासी. त्याची चरित्रात्मक माहिती फारशी मिळत नाही. तो उत्तर चीनमधील चांगानचा राहणारा. त्याचा जन्म शान्सी प्रांतातील वूयांग येथे झाला. ख्रिस्तोत्तर पहिल्या तीन शतकांत अनेक भारतीय धर्मोपदेशकांनी चीनमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. बौद्ध धर्माची तीर्थस्थाने भारतात असल्यामुळे त्यांची यात्रा करावी धर्मग्रंथांच्या शुद्ध प्रती कराव्यात आणि बौद्ध मूर्तींचा संग्रह करून ती सर्व सामग्री स्वदेशी न्यावी, या हेतूने अनेक चिनी यात्रिक भारतात आले. त्यांपैकी फाहियान हा पहिला होय.

फाहियान इ. स. ३९९ मध्ये आपल्याबरोबर पाच भिक्षू घेऊन भारतात येण्यास निघाला. चीनच्या सीमेवर आल्यावर त्याला आणखी पाच भिक्षू भेटले. त्यांचा प्रवास मोठा त्रासाचा झाला. गोबीच्या वाळवंटातून जाताना बहुतेक प्रवासी तेथे गतप्राण होत. अशा खडतर मार्गाने खोतान, काशगर, इ. स्थळांना भेटी देत तो उद्यान देशास (वायव्य प्रांतास) पोहोचला. नंतर पेशावर, तक्षशिला इ. स्थळांना भेटी देऊन तो सांकाश्य येथे आला. यावेळी गुप्त घराण्यातील प्रसिद्ध सम्राट दुसरा चंद्रगुप्त याचे आधिपत्य या प्रदेशावर होते. फाहियानने तेथील राजाचा नामनिर्देशही केला नाही पण चंद्रगुप्ताच्या राज्यातील शांतता, सौराज्य, धार्मिक स्थिती, लोककल्याणकारी व्यवस्था इत्यादींविषयी सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे.

फाहियानने नंतर सहा वर्षांत (इ. स. ४०४ ते ४१०) श्रावस्ती, कपिलवस्तू, वैशाली, पाटलिपुत्र, गया इ. पवित्र स्थळांची यात्रा केली आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला तसेच अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची हस्तलिखिते गोळा करून तो स्वदेशी परत जाण्याकरिता ताम्रलिप्ती (ताम्रलुक) येथे व्यापारी जहाजात बसला. तेथून तो सिंहलद्वीपात (श्रीलंकेत) गेला. तेथे त्याने दोन वर्षे राहून चीनमध्ये उपलब्ध नसलेल्या अनेक संस्कृत ग्रंथांच्या पोथ्या जमा केल्या आणि नंतर तो जावाच्या मार्गाने चीनला परतला (४१४). ह्या प्रवासातही त्याच्यावर अनेक बिकट प्रसंग आले. एकदा तर त्याच्या जहाजाला भोक पडून पाणी आत येऊ लागले, तेंव्हा त्याला हस्तलिखितांशिवाय इतर सर्व सामान फेकून द्यावे लागले. अशी अनेक संकटे त्याच्या परतीच्या प्रवासात उद्‍भवली पण अखेर तो चीनमध्ये चिंग-चौला सुखरूप पोहोचला.

फाहियानने एकूण तीस देशांचा प्रवास केला. यासाठी त्याला पंधरा वर्षे खर्च करावी लागली. चीनला परतल्यावर हिंदी भिक्षू बुद्धभद्र याच्या साहाय्याने त्याने काही धर्मग्रंथांची भाषांतरे केली. मृत्युसमयी  त्याचे वय ८८ (?) वर्षांचे होते. त्याने आपले प्रवासवृत्त बांबूचे तुकडे व रेशमी कापड यांवर लिहून ठेवले होते.

फाहियान हा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. अंधश्रद्धेवर त्याचा विश्वास होता. त्याने आपल्या प्रवासवृत्तात राजकीय वा सामाजिक परिस्थितीचा क्वचितच उल्‍लेख केला आहे तथापि त्याने प्रसंगोपात्त लिहून ठेवलेली माहिती थोडी असली, तरी बहुमोल आहे. त्याने तत्कालीन बौद्ध स्थळांची केलेली वर्णने मात्र विस्तृत आहेत. त्यांवरून तत्कालीन हीनयान व महायान पंथांच्या प्रसाराची कल्पना येते. त्याच्या वर्णनावरून असे दिसते, की मध्यप्रदेशात (सध्याच्या उत्तर प्रदेशात) आणि मावळ्यात बौद्ध धर्माचा चांगलाच प्रसार झाला होता मात्र कपिलवस्तू, कुशिनगर, गया इ. काही पवित्र स्थळी त्या धर्माला अवनत स्थिती प्राप्त झाली होती.

फाहियान अत्यंत धर्मभोळा असल्याने अनेकदा त्याने बौद्ध धर्मातील चमत्कारांचा उल्‍लेख केला आहे. उद्यान येथे बुद्धाच्या पादुका आहेत, त्या अद्यापि पाहणाऱ्यांच्या श्रद्धेप्रमाणे लहानमोठ्या होतात, असे तो सांगतो तथापि अनेक बौद्ध स्तूप, चैत्य, विहार यांविषयी त्याने दिलेली माहिती महत्त्वाची व यथातथ्य वाटते. तिची पुरातत्वीय उत्खननास पुढे मदत झाली.

संदर्भ : 1. Fa-hsien Trans, Legge, James, Record of Buddhistic Kingdoms, New York, 1965.

           2. Giles, H. A. Trans. The Travels of Fa-hsien (399-414 A. D.) or Record of the Buddhistic Kingdoms, London, 1959.

मिराशी, वा. वि.