फ्यूमॅरिएसी : (पर्पट कुल) ⇨ पित्तपापडा (सं. पर्पट) ह्या परिचित औषधी वनस्पतीचाअंतर्भाव असणारे द्विदलिकित फुलझाडांचे [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक छोटे कुल.फुलझाडांच्यावर्गीकरणातयाच्यास्थानाबद्दलमतभेदआहेततथापि ऱ्हीडेलीझगणातत्याचासमावेशकरण्याबद्दलसर्वसाधारणएकमतआहे. तसेच ⇨ पॅपॅव्हरेसी (अहिफेन), ⇨ क्रुसीफेरी (मोहरी) व ⇨कॅपॅरिडेसी (वरुण) याकुलांशीत्याचेआप्तभावहीमान्यझालेआहेत. जे. ‌हचिन्सन यांनी हे स्वतंत्र कुल मानले आहे मात्र त्यात त्यांनी हायपेकॉइडी या उपकुलाचाही समावेश केला आहे. पूर्वीप्रमाणे हल्लीही काही शास्‍त्रज्ञ पॅपॅव्हरेसी कुलात या कुलाचा समावेश करतात.

ए. बी. रेंडेल यांनी मान्य केलेल्या पद्धतीत ऱ्हीडेलीझ या गणामध्ये पॅपॅव्हरेसी कुल,क्रुसीफेरी व कॅपॅरिडेसी या कुलांखेरीज रेझेडेसी कुलाचा [⟶मिग्‍नोनेट] अंतर्भाव केलेला आढळतो त्यांपैकी पॅपॅव्हरेसी कुलात त्यांनी तीन उपकुलांचा समावेश (पॅपॅव्हरॉइडी, हायपेकॉइडी व फ्यूमॅरिऑइडी) करून फ्यूमॅरिएसी कुलाला उपकुलाचा दर्जा दिला आहे. प्रारंभी उल्लेख केलेली विभागणी जे. एन्. मित्र यांनी मान्य केलेली असून त्या संदर्भात ऱ्हीडेलीझ गणाची सर्वसामन्य लक्षणे अशी : वनस्पती ओषधीय [⟶ओषधि], झुडपे किंवा वृक्ष असून त्यांची फुले अवकिंज, बहुधा संवर्त व पुष्पमुकुट (प्रदलमंडल) स्पष्ट परंतु क्वचित पाकळ्यांचा अभाव दिसतो तसेच फुले अरसमात्र, क्वचित एकसमात्र, चक्रीय व चतुर्भागी परंतु कधी‌ त्रिभागी किंजदले दोन किंवा तीनव जुळलेली आणि बीजके तटलग्‍न [⟶फूल] बिया बारीक व त्यांतील गर्भ वाकडा असतो. पॅपॅव्हरॉइडी व हायपेकॉइडी ही दोनच उपकुले मित्र यांनी पॅपॅव्हरेसी कुलात घातली आहेत. एल्‌.एफ्‌.चेलाकॉव्हस्की (व मित्र) यांच्या मते ऱ्‍हीडेलीझ गणाचा उगम रॅनेलीझमधील अनेक कुलांपासून झाला असून फ्यूमॅरिएसी कुलाचा क्रमविकास (उत्‌क्रांती) पॅपॅव्हरेसी कुलापासून झाला असावा.

 मित्र व जी. एच्. एम्. लॉरेन्स यांनी फ्यूमॅरिएसी कुलात १९ वंशी व सुमारे ४२५जातीसमाविष्टकेलेल्या आहेत. मात्र त्यांनी हायपेकॉइडी या उपकुलाचा समावेश फ्यूमॅरिएसीमध्ये केलेला नाही. (रेंडेल यांच्या मते ५वंश व सु. २००जाती आणि जे.सी. विलि‌स यांच्या मते १६वंशी व ४५०जाती ). हायपेकौम हा एकच वंश असलेल्या कुलात (हायपेकोएसीमध्ये ) फक्त१५जाती असून फ्यूमॅरिएसी व पॅपॅव्हरेसी या दोन्ही कुलांच्या मध्ये त्याचे स्थान आहे. फ्यूमॅरिएसी कुलातील जाती उत्तर समशीतोष्ण भाग, पू. आफ्रिकेतील पर्वत व द. आफ्रिका येथे आढळतात यूरोप व आशिया येथील समशीतोष्ण भाग, अमेरिका, हिमालय, भूमध्यसामुद्रिक प्रदेश येथे काही जातींचा प्रसार झालेला आहे. बहुतेक जातींत पाण्याचा अंश अधिक असून त्या ओषधीय आहेत काही ⇨महालता आहेत. त्यांची पाने साधी, बहुधा एकाआड एक, कमीजास्त प्रमाणात विभागलेली आणि वनस्पतीच्या तळाशी गुच्छाप्रमाणे किंवा उभ्या खोडावर नेहमीप्रमाणे येतात. फुले द्बिलिंगी, एकसमात्र व त्यांत परिदलांची तीन मंडले संवर्तात दोन लवकर गळून पडणारी लहान संदले सुटी अथवा अंशतः चिकटलेली चार किंवा अधिक प्रदले (पाकळ्या) व त्यांपैकी बाहेरील एक किंवा दोन शुंडिकायुक्तकिंवा कोशवंत आणि बाकीची आतील अरुंद आणि परागकोशावर जुळलेली केसरदले चार किंवा सहा व किंजमंडलाच्या प्रत्येक बाजूस तीन तीन प्रमाणे त्यांच्या तळाशी दोन किंवा एक मधुप्रपिंड किंजदले दोन व जुळलेली किंजपुट ऊर्ध्‍वस्थ व त्यातील भिंतीवर दोन वा अधिक बीजके असतात [⟶फूल]. बोंडात आडवा पडदा असून ते झडपांनी उघडते किंवा फळ रुक्ष व एकबीजी कपाली (कवचयुक्त) बीजात रसाळ पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) व क‌चित एक पण बहुधा दोन दलिका असतात [⟶फळ].

भारतात फ्यूमॅरिया इंडिका (हिं. शातेरा व म. पित्तपापडा), कॉरिडॅलिस गोवॅनियाना (भूतकेशी) व कॉ. रॅमोसा (मामिरान) या औषधोपयोगी जाती आढळतात. मामिरानचा उपयोग डोळ्याच्याविकारांवर करतात. भूतकेशीची मुळे उपदंश, गंडमाळा, त्वचारोग व मुत्ररोग इत्यादींवर उपयुक्तअसल्याचे आढळले आहे.

पहा : पॅपॅव्हरेसी पित्तपापडा.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of Indian, Raw Materials, Vols II and IV, New Delhi, 1950 and 1956.

            2. Mitra, J. N. An Introduction to Systematic botany and Ecology, Calcutta, 1964.

चिन्‍मुळगुंद, वासंती रा. परांडेकर, शं. आ.