फोर्ट पेक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसूरी नदीवरील जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण. हे माँटॅना राज्यात ग्‍लासगोच्या आग्‍नेयीस २७ किमी. आहे. या धरणाची लांबी ६,४०९ मी. आणि उंची ७६ मी. असून त्याने ९६,०३४ हजार घ. मी. क्षेत्र व्यापले आहे. या धरणाचे काम १९३३ ते १९४० या कालावधीत पूर्ण करण्यात आले. धरणातील पाण्याच्या साठ्याचे क्षेत्र २१७ किमी. लांब व २६ किमी. रुंद असून धरणाची एकूण पाणी साठविण्याची क्षमता २,३९० कोटी घ. मी. आहे. या धरणामुळे पूरनियंत्रण, जलसिंचन, विद्युत्‌निर्मिती इ. उद्देश सफल झाले आहेत. येथील विद्युत्‌निर्मीतीची क्षमता १६५ मेवॉ. असून दरवर्षी सु. १०० कोटी किवॉ. ता. वीजनिर्मिती होते.

लिमये, दि. ह.