फोनोलाइट : (क्लिंक स्टोन, क्लिंकर स्टोन). फिकट रंगाच्या, नेफेलीन व पोटॅश फेल्स्पार ही खनिजे विपुल असलेल्या अदृश्यकणी (नुसत्या डोळ्यांनी स्फटिक न दिसणाऱ्या) ज्वालामुखी खडकांचा गट. अल्कली फेल्स्पार (मुख्यतः सॅनिडीन व ॲनॉर्थोक्लेज) हा यातील प्रमुख घटक असून आधारकाचा (ज्यात मोठे स्फटिक रुतलेले असतात अशा सूक्ष्मकणी भागाचा) मोठा भाग याचा बनलेला असतो व पृषयुक्त (ज्यात सूक्ष्मकणी आधारकात मोठे स्फटिक विखुरलेले असतात अशा वयनाच्या म्हणजे पोताच्या) प्रकारात बहुतेक मोठे स्फटिक याचेच असतात. नेफेलीन हे आधारकात व पूर्णाकृती सूक्ष्म स्फटिकरूपात असतेक्वचित त्याचे मोठे स्फटिक असतात. यांशिवाय सोडा विपुल असणारी गडद रंगाची (मॅफिक) खनिजेही थोड्या प्रमाणात फोनोलाइटात असतात. त्यांपैकी सोडा पायरोक्सिनाचे (उदा., एगिराइट, टिटॅनियमयुक्त ऑजाइट) मोठे व चांगले स्फटिक असतातआधारकात याचे बोथट सुयांसारखे स्फटिक विखुरलेले असून त्यांच्यामुळे कधीकधी खडकाला हिरवट रंग येतो. सोडा अँफिबोलांचे (बार्केव्हिकाइट, रीबेकाइट आर्फव्हेडसोनाइट) नेहमीच बहुधा मोठे स्फटिक आढळतात. नोसीयन, हॉयेन, ल्यूसाइट, सोडालाइट इ. फेल्स्पॅथॉइडेही थोड्या प्रमाणात व आधारकात क्वचित त्यांचे मोठे स्फटिक असतात. स्फीन, झिकॉर्न, मॅग्नेटाइट व ॲपेटाइट ही यांतील गौण खनिजे असून पुष्कळदा यात अल्प प्रमाणात काचही असते. यात कृष्णाभ्रक विरळाच आढळते व त्याचे मोठे स्फटिक असतात. याक्वॉर्ट्झबहुधा नसते. अशा तऱ्हेने फोनोलाइट हे नेफेलीन सायेनाइट व तत्सम खडकांशी समतुल्य खडक आहेत. यांतील जास्त प्रमाणात असलेल्या फेल्स्पॅथॉइडानुसार यांचे नोसीयन, हॉयेन, ल्यूसाइट (ल्यूसिटोफायर) -फोनोलाइट असे प्रकार ओळखले जातात. यांशिवाय अँफिबोल जास्त प्रमाणात असलेल्या खडकाला अँफिबोल फोनोलाइट व ऑलिव्हीन विपुल असलेल्या खडकाला केन्याइट म्हणतात. अल्कली फेल्स्पारापेक्षा प्लॅजिओक्लेज जास्त असल्यास खडकाला फेल्स्पॅथॉइडल लॅटाइट म्हणतात. यांशिवाय यांचे ॲपॅकाइट, ट्रॅकाइट इ. प्रकारही आहेत.
फोनोलाइट हे करडसर, हिरवट, पिवळसर, पांढरट, निळसर इ. फिकट रंगांचे असून फुटून त्यांच्या पातळ, चिवट चकत्या निघतात व त्यांच्यावर आघात केल्यास नाद निर्माण होतो आणि या गुणधर्मावरूनच ध्वनी व दगड अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून त्यांना फोनोलाइट हे नाव देण्यात आले आहे (१८१२). त्यांची संरचना व वयन ⇨ ट्रॅकाइटांप्रमाणे असून त्यांच्यातील प्रवाही संरचना नुसत्या डोळ्यांनी दिसू शकते. वातावरणक्रियेने यांचे सहज अपघटन (रासायनिक क्रियेने बारीक तुकडे होण्याची क्रिया) होते. फोनोलाइट विरळाच आढळतात. ज्वालामुखीचे प्रवाह व टफ यांच्या, तसेच भित्ती व शिलापट्ट या लहान अंतर्वेशित (घुसलेल्या) राशींच्या रूपांत आणि ट्रॅकाइट व फेल्स्पॅथॉइडयुक्त खडकांच्या जोडीने हे आढळतात. पृष्ठभागी आलेला लाव्हा जलद थंड होऊन असे अतिसूक्ष्मकणी खडक बनतात. बहुतेक फोनोलाइटी लाव्ह्यांबरोबर मोठे स्फटिकही वर आणले जाऊन पृषयुक्त वयन निर्माण होते व क्वॉर्ट्झाच्या अभावामुळे फेल्स्पॅथॉइडे निर्माण होतात. मात्र यांच्या संघटनाचा म्हणजे फोनोलाइटी शिलारस कसा निर्माण होतो, याबद्दल मतभेद आहेत. आधी तयार झालेले काही स्फटिक शिलारसाबाहेर घालविले जाऊन म्हणजे भिन्नीभवनाद्वारे अशा संघटनाचा शिलारस बनतो, असे एक मत आहे. तसेच सामान्य शिलारसात मोठ्या प्रमाणात चुनखडकाचे सात्मीकरण होऊनही (एकजीवपणे मिसळला जाऊनही) असा शिलारस निर्माण होत असावामात्र एकूण प्रक्रिया जटिल (गुंतागुंतीची) असावी व असा शिलारस बनण्याच्या विविध यंत्रणा असाव्यात.
बहुतेक फोनोलाइट तृतीय आणि आधुनिक काळातील (गेल्या सु.६·५ कोटी वर्षांतील ) असून ते जर्मनी, बोहीमिया, चेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, भूमध्यसागरी प्रदेश (उदा., इटली), अमेरिका इ. भागांत आढळतात. स्कॉटलंड आणि ब्राझील येथे कार्बॉनिफेरस (सु.३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील फोनोलाइट आढळले आहेत. कोठे कोठे यांचा बांधकामासाठी वापर केला जातो.
ठाकूर, अ. ना.