फेबिअस मॅक्सिमस व्हेऱ्युकोसस : (इ. स. पू. २७५ ते २०३). रोमन सेनानी. रोम व कार्थेज यांच्यातील दुसऱ्या ⇨ प्यूनिक युद्धात (इ.स.पू. २१८-२०१) इ.स.पू. २१७ मध्ये त्याला रोमन सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. फेबिअस घराणे हे प्राचीन रोममधील एक जुने आणि अत्यंत कर्तबगार व्यक्तींचे घराणे होते. इ.स.पू. पाचव्या शतकापासून या घराण्यातील काही व्यक्तींनी उच्च सैनिकी-शासकीय पदे भूषविली होती. मॅक्सिमस फेबिअसला अशा कर्तबगार घराण्याचा वारसा लाभला होता. दुसऱ्या प्यूनिक युद्धात सेनाप्रमुखपद मिळण्यापूर्वी पाच वेळा (इ.स.पू. २३३, २२८, २१५, २१४ व २०९) त्याची ‘कॉन्सल’ या उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

कार्थेजचा सेनापती ⇨ हॅनिबल हा आल्प्स पर्वतराजी ओलांडून इटलीत उतरला. इ.स.पू. २१८-२१६ या काळातील तीन युद्धांत त्याने रोमन सेनेची भयंकर हानी केली. रोमवर सरळ धडक देण्याची शक्ती नसल्यामुळे तो दक्षिण इटलीत आप्यूल्या या मैदानी प्रदेशात उतरला. या राष्ट्रीय संकटकाळातच इ.स.पू. २१७ मध्ये मॅक्सिमस फेबिअसकडे रोमन सिनेटने सहा महिन्यांपुरते सर्वाधिकार दिले. युद्धातील हानी भरून काढण्यासाठी रोमनांना उसंत मिळणे आवश्यक होते, तसेच हॅनिबलच्या सेनेशी मैदानी युद्ध करण्याची कुवत रोमन सेनेत नव्हती. ही वस्तुस्थिती ओळखून त्याने गनिमी युद्धतंत्रावर भर दिला. रोमच्या दक्षिणेकडील प्रदेशांत त्याने जमीन व पिके जाळणे, पूल उडविणे इ. ⇨ घातापाताचे धोरण अवलंबिले. ॲपेनाइन्स डोंगरदऱ्या व त्यांवरील किल्ले यांच्या आश्रयाने त्याने कार्थेजच्या घोडदळाची आक्रमक क्षमता कमी केली. त्याचप्रमाणे शत्रूच्या सेनेचा रसदपुरवठा विस्कळीत करणे व तीवर आकस्मिक हल्ले करणे, हे तंत्र वापरले. हॅनिबलच्या डावपेचाला बळी न पडता फेबिअसने खड्या मैदानी लढाया टाळल्या. युद्धातील या दीर्घसूत्री तंत्रामुळे फेबिअसला ‘कन्केक्टर’ ही लॅटिन उपाधी लावण्यात येते. तिचा अर्थ ‘वेळकाढू’ असा होता. हे गनिमी तंत्र ‘फेबिअन डावपेच’ म्हणून प्रसिद्ध आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी धीराने योग्य समयाची वाट पाहण्याचे प्रतिक्षेचे धोरण या अर्थाने ‘फेबिअन’ ही संज्ञा त्यामुळेच रूढ झाली. ⇨ फेबिअन समाजवाद यातील ‘फेबिअन’ शब्दाचा अर्थही असाच आहे. वेळकाढू तंत्रामुळे रोमन सेनेचे बळ वाढले परंतु रोमन लोक हे मुळातच आक्रमणशील असल्यामुळे फेबिअसच्या तंत्राप्रमाणे युद्धाचा निर्णय लवकर लागत नाही, म्हणून फेबिअसच्या जागी ⇨ सिपिओ ॲफ्रिकॅनस हा दुसरा सेनापती नेमण्यात आला. त्याच्या आधिपत्याखाली रोमनांनी खुद्द कार्थेजवर स्वारी केली व झामाच्या लढाईत (इ.स.पू. २०२) [→ झामाची लढाई] हॅनिबलचा पराभव केला. फेबिअस इ.स.पू. २०३ साली मरण पावला.

संदर्भ : 1. Beer, Gavin, Hannibal, London, 1969.

2. Bury, J. B. and Others, Cambridge Ancient History Vol. VIII, Cambridge, 1960.

3. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western World : Plutarch Chicago, 1952.

4. Montgomery, B. L. A History of Warfare, London, 1968.

दीक्षित, हे. वि.