फेनॅसाइट : खनिज. स्फटिक षट्‌कोणी त्रि-समांतर षट्‌फलकीय. सामान्यतः समांतर षट्‌फलकाकार, कित्येकदा फुगीर भिंगाकार व कधी कधी आखूड प्रचिनाकार स्फटिक आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन : (1120) स्पष्ट. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ७·५-८. वि. गु. २·९७-३. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी. रंगहीन वा फिकट पिवळ्या, गुलाबी किंवा उदी रंगाचे. रा. सं. Be2Sio4. हे खनिज विरळाच आढळते. काही पेग्मटाइटांच्या भित्तींमध्ये हे पुष्कराज (टोपॅझ), क्रिसोबेरील, वैदूर्य, ॲपेटाइट, कॉर्ट्‌झ, मायक्रोक्लीन इ. खनिजांबरोबर आढळते. उरल पर्वतातील (रशिया) पाचू व क्रिसोबेरील यांच्या खाणीत हे अभ्रकी सुभाजांत (सहज भंग पावणाऱ्या रूपांतरित खडकांत) आढळते. इल्मेन पर्वत (रशिया) आणि कोलोरॅडोमध्ये हे ग्रॅनाइटात आढळते. यांशिवाय नॉर्वे, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, स्वित्झर्लंड इ. देशांतही हे आढळते. यावर चांगले पैलुकाम करता येते. त्यामुळे कधी कधी याचा रत्‍न म्हणून वापर होतो. पुष्कराज व क्वॉर्ट्‌झ यांच्याशी याचे साम्य असल्याने ही तिन्ही खनिजे ओळखण्यात गोंधळ होतो. त्यामुळे फसविणे या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याला फेनॅसाइट हे नाव देण्यात आले आहे. (१८३३).

ठाकूर, अ. ना.