फादूत्स : व्हादूत्स. पश्चिम-मध्य यूरोपातील ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड यांदरम्यान वसलेल्या लिख्टेनश्टाइन या छोट्या देशाची राजधानी. लोकसंख्या ४,७०४ (१९७७). स्वित्झर्लंड आणि लिख्टेनश्टाइन यांच्या सीमेवर ⇨ झुरिक शहराच्या आग्‍नेयीस सु. ८१ किमी.वर ऱ्हाईन नदीखोऱ्यात हे वसले आहे. लोहमार्ग व सडका यांच्या उत्तम सोयी येथे आहेत.

मध्ययुगाच्या सुरुवातीस या शहराची स्थापना झाली. १४९९ सालच्या पवित्र रोमन साम्राज्य व स्विस लोक यांच्यातील स्वेबीयन युद्धात त्याची अपरिमित हानी झाली. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी या शहराची पुनर्रचना करण्यात आली. शेलनबेर्ख आणि फादूत्स या दोन मध्ययुगीन जहागिऱ्या एकत्र येऊनच १७१९ मध्ये लिख्टेनश्टाइन राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून फादूत्स हीच त्याची राजधानी राहिली.

या शहरात कापडउद्योग हाच प्रमुख व्यवसाय आहे. येथील ‘प्रिन्स लिख्टेनश्टाइन आर्ट गॅलरी’त फ्लेमिश चित्रकार रूबेन्स, व्हॅनडाइक, ब्रगेल आणि डच चित्रकार रेम्ब्रॅंट, रॉइसडाल इत्यादींच्या उत्कृष्ट कलाकृती संगृहीत केलेल्या आहेत. येथील लिख्टेनश्टाइन पोस्टल म्यूझीयम (स्था. १९३०), लिख्टेनश्टाइन नॅशनल लायब्ररी (१९६१) आणि नॅशनल म्यूझीयम ही उल्लेखनीय आहेत. येथील ऐतिहासिक किल्ल्याचे मध्ययुगीन वास्तुशैलीतच १९०५ ते १९१६ दरम्यान पुनरुज्जीवन करण्यात आले. हा किल्ला पर्यटकांचे मोठेच आकर्षण ठरला आहे.

गाडे, ना. स.