फॅरेनहाईट, गाब्रिएल डानिएल: (२४ मे १६८६ – १६ सप्टेंबर १७३६). जर्मन भौतिकीविज्ञ. त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या प्रमाणभूत तापक्रमाकरिता [→ तापमापन] विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म डॅन्झिग येथे झाला. त्यांनी नेदर्लंड्स , जर्मनी व इंग्लंड येथे भौतिकीचे शिक्षण घेतले. १७०१ मध्ये त्यांचे वडील अकस्मात निधन पावल्यामुळे ते ॲम्स्टरडॅम येथे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी गेले. १७०७ नंतर त्यांनी वैज्ञानिक उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या इतर कारखानदारांच्या तंत्रांचे व शास्त्रज्ञांच्या कार्याचे अवलोकन करण्याच्या दृष्टीने बराच प्रवास केला. १७१७ मध्ये त्यांनी ॲम्स्टरडॅम येथे वातावरणवैज्ञानिक उपकरणे तयार करण्याचा स्वतःचा कारखाना स्थापन केला.
फॅरेनहाइट यांनी १७०९ मध्ये अल्कोहॉलयुक्त तापमापक तयार केला. तापमापकामध्ये पारा वापरण्याची कल्पना मूलतः त्यांची नव्हती पण तापमापकासाठी पाऱ्याची असलेली उपयुक्तता त्यांनीच प्रयोगाद्वारे प्रस्थापित केली. त्यांनी योजिलेल्या तापक्रमात सुरुवातीचा बिंदू वितळणाऱ्या बर्फाचा घेतला होता व दुसरा बिंदू निरोगी मानवी शरीराचे तापमान हा होता. या दोन बिंदूंतील अंतराचे निरनिराळ्या पद्धतींनी अंशांत विभाजन करण्याचा प्रयत्न करून शेवटी त्यांनी निवडलेल्या पद्धतीनुसार शरीराचे तापमान ९६° व पाण्याचा गोठणबिंदू ३२° होता. यात नंतर थोडासा बदल करण्यात येऊन निरोगी शरीराचे तापमान ९८°·६ ठरविण्यात आले. हा तापक्रम सेल्सिअस (सेंटिग्रेड) तापक्रमाइतका सोयीचा नसला, तरी इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या सर्व देशांत पूर्वी वापरीत असत आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व कॅनडात अद्यापही (विशेषतः वातावरणवैज्ञानिक व अभियांत्रिकीय कार्यात) वापरला जातो. पाणी त्याच्या गोठणबिंदूखाली द्रव अवस्थेत राहू शकते आणि पाण्याचा उकळबिंदू वातावरणीय दाबानुसार बदलतो हे महत्त्वाचे शोध फॅरेनहाइट यांनी लावले. पाण्याचा उकळबिंदू मोजून एखाद्या स्थळाची उंची मोजण्याचे उपकरण त्यांनी तयार केले होते. त्यांनी एका सुधारित आर्द्रतामापक तयार केला आणि त्यासंबंधीचे वर्णन व त्याच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांची माहिती त्यांनी इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्समध्ये १७२४ साली प्रसिद्ध केली. त्याच वर्षी रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते हेग येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
“