बोर, ऑगे नील्स : (१९ जून १९२२ – ). डॅनिश भौतिकीविज्ञ. अणूकेंद्राची संरचना व परिभ्रमण अवस्था यांविषयी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. अणूकेद्रांची संरचना स्पष्ट करण्यांकरिता केलेल्या मूलभूत कार्याबद्दल त्यांना ⇨ बेन आर्. मॉटेलसन आणि ⇨ लीओ जेम्स रेनवॉटर यांच्याबरोबर १९७५ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले. या तिघांनी मांडलेले अणूकेंद्रीय प्रतिमान आधुनिक अणूकेंद्रीय भौतिकीच्या प्रगतीत पायाभूत ठरले आहे. काही अणुकेंद्रे का व कशा प्रकारे विविध असममित आकार धारण करतात, हेही त्यांनी दाखविले. बोर यांनी न्युयार्कमधील कोलंबिया विद्यापीठात रेनवॉटर यांच्याबरोबर १९४९-५० मध्ये आणि कोपनहेगन येथील नील्स बोर इन्स्टिट्यूटमध्ये मॉटेसलन यांच्याबरोबर संशोधन केले आहे.

बोर यांचा जन्म कोपनहेगन येथे झाला (त्याच वर्षी त्यांचे वडील नील्स बोर यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला). त्यांचे शिक्षण कोपनहेगन विद्यापीठात झाले. तेथे त्यांनी एम्.एस्सी. (१९४६) व डॉक्टरेट (१९५४) या पदव्या मिळविल्या. लंडन येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन खात्यात त्यांनी सहयोगी म्हणून १९४३-४५ मध्ये काम केले. त्याचबरोबर त्यांनी लॉस ॲलॅमॉस येथील अणुबाँब प्रकल्पाच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत वडिलांच्या समवेत १९४४-४५ मध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम केले. १९४६ मध्ये डेन्मार्कला परतल्यावर कोपनहेगन येथील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल फिजिक्स (१९६२ साली नील्स बोर मृत्यू पावल्यावर याच संस्थेला नील्स बोर इन्स्टिट्यूट असे नाव दिले गेले) या संस्थेत संशोधन साहाय्यक म्हणून दाखल झाले. याच संस्थेचे १९६२-७० या काळात ते संचालक होते. १९५६ साली कोपनहेगन विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. कोपनहेगन येथील नॉर्डिक इन्स्टिट्यूट फॉर थिऑरेटिकल ॲटॉमिक फिजिक्स (नॉर्डिटा) या संस्थेचे संचालक म्हणून १९७५ पासून ते काम करीत आहेत.

अणुकेंद्राच्या प्रतिमानात सुधारणा करण्याकरिता त्यांनी कवच प्रतिमानाशी [⟶ अणुकेंद्रीय भौतिकी] न जुळणाऱ्या आविष्कारांचा अभ्यास सुरु केला. विषम द्रव्यमानांकाच्या (अणूकेंद्रातील न्यूट्रॉन व प्रोट्रॉन यांची एकूण संख्या विषम असलेल्या) अणूकेंद्रांच्या चतुर्ध्रवी परिबलाच्या [⟶ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] संदर्भात विषम न्यूक्लिऑनामुळे (अणूकेंद्रातील न्यूट्रॉनामुळे वा प्रोट्रॉनामुळे) अणुकेंद्राचा गाभा विकृत होतो, या रेनवॉटर यांच्या मूळ गृहीतावर आधारलेले अणुकेंद्राचे प्रतिमान बोर व मॉटेलसन यांनी १९५२ मध्ये मांडले. न्यूक्लिऑनांच्या संकलित क्रियेमुळे अणुकेंद्राचे पृष्ठ द्रवबिंदूच्या पृष्ठासारखे वागते, हे या प्रतिमानातील गृहीत तत्त्व आहे. नंतर मॉटेलसन व इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने त्यांनी या प्रतिमानाचा विकास व व्यापकीकरण केले. १९५५ साली त्यांनी या प्रतिमानाची संकल्पना भंजनक्षम (तुकडे होऊ शकणाऱ्या) व अतिविरूपित अणुकेंद्राला लावली. शेवटी १९६० मध्ये अणुकेंद्राचे तपशीलवार असे एकीकृत वा संकलित प्रतिमान या संशोधनातून तयार झाले. अणुकेंद्राच्या भंजनाविषयीच्या सिद्धांतातील हा महत्त्वाचा टप्पा असून अणुकेंद्रातील बंधन ऊर्जा व भंजन यांसंबंधीची सध्याची माहिती या प्रतिमानाच्या द्वारे मिळाली आहे. या प्रतिमानात कवच प्रतिमानाची वैशिष्ट्ये तर आहेतच शिवाय द्रवबिंदूच्या व अणुकेंद्राच्या पृष्ठांमध्ये समरूपता असल्याचे गृहीत धरल्याने त्यात द्रवबिंदू प्रतिमानाची वैशिष्ट्येही आहेत. द्रवबिंदू व कवच प्रतिमानांमधील वैशिष्ट्ये यात एकत्रित आल्यामुळे याला एकीकृत प्रतिमान असे नाव दिले गेले आहे. या प्रतिमानावरून बोर व मॉटेलसन यांनी काढलेले निष्कर्ष प्रायोगिक पुराव्याशी चांगल्या प्रकारे जुळतात, असे दिसून आले आहे. बोर यांनी वरील कार्याखेरीज ⇨अतिसंवाहकता व मूलकण यांविषयीही संशोधन केले आहे.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अमेरिकन फिजिकल सोसायटीचे डॅनी हाइनमान पारितोषिक (१९६०), फोर्ड मोटार कंपनी फंडाचा ‘शांततेसाठी अणू’ हा पुरस्कार (१९६९), इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे रदरफर्ड पदक (१९७२), फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे वेदरील पदक (१९७४) इ. अनेक सन्मान मिळालेले आहेत. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन इ. देशांतील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे, अमेरिकेतील नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस वगैरे संस्थांचे ते सदस्य आहेत. त्यांनी संशोधनपर अनेक लेख लिहिलेले असून मॉटेलसन यांच्या सहकार्याने कलेक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल आस्पेक्टस ऑफ न्यूक्लिअर स्ट्रक्चर (१९५३) आणि न्यूक्लिअर स्ट्रक्चर (पहिला खंड १९६९, दुसरा खंड १९७५) हे ग्रंथ लिहिले आहेत.

ठाकूर, अ. ना.