फणस : (हिं. कठल गु. वाणस क. हळसू सं. कंटफल, स्कंदफल इं. जॅक फ्रूट ट्री, जॅक (ऑरेंज) वुड लॅ. आर्टोकार्पस इंटेग्रा, आ. इंटेग्रिफोलिया, आ. हेटेरोफायलस कुल-मोरेसी). सु. २० मी. उंचीचा हा सदापर्णी मोठा वृक्ष पश्चिम घाट, कोकण व उत्तर कारवार येथे आढळतो. भारतात व पूर्व आशियातील उष्ण प्रदेशांत याची बरीच लागवड करतात. दक्षिण भारतातील लोकांना याचे फळ फार आवडते. उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी नसलेल्या भागातही याची झाडे आढळतात. पश्चिम बंगाल व बिहारमध्ये या फळझाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पश्चिम भारताच्या किनारपट्टीत घराभोवतालच्या जागेत आणि कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत कॉफी, सुपारी, वेलदोडे आणि मिरे यांच्या बागांमधून छायेकरिता याची झाडे लावतात. भारतात आठव्या शतकात येऊन गेलेल्या युआन च्वांग या चिनी प्रवाशांनी भारतात फणस लागवडीत असल्याचे नमूद केलेले आहे. बृहत्संहितेत (इ. स. सहावे शतक) फणसाचा उल्लेख वृक्षायुर्वेदात केलेला आहे.
या झाडाची साल जाड, काळसर व भेगाळ असते पाने साधी, वरून गर्द हिरवी, चकचकीत, खालून फिकट, लंबगोल, गुळगुळीत, १०–१२ सेंमी. लांब व एकाआड एक, उपपर्ण आवरक (तळाशी वेढून राहणारी) व मोठी फुलोरा नतकणिशासारखा [⟶ पुष्पबंध] फुले एकलिंगी, एकाच झाडावर, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), स्वतंत्र, जाड आणि गोलसर, पुष्पासनावर गर्दीने नोव्हेंबर–जानेवारीत येतात पुं-पुष्पे चितीय, ५–१५ सेंमी. पुष्पासनावर, छदहीन असून संदले दोन व केसरदल एकच असते. पुं-पुष्पे थोड्याच दिवसांत गळून पडतात. छदयुक्त स्त्री-पुष्पे फार मोठ्या स्वतंत्र पुष्पासनावर असून परिदले नलिकाकृती आणि किंजपुटात एकच बीजक असते [⟶ फुल मोरेसी]. स्त्री-फुलोऱ्याचे सर्वच भाग एकत्र वाढून लंबगोल (३० – ७५ X १५ – ३० सेंमी.) व मोठे संयुक्त फळ (फलपुंजे) बनते व मांसल परिदलांनी वेढलेली अनेक साधी मृदू फळे (गरे) असतात. फळे झाडाच्या मुख्य खोडावर व प्रमुख शाखांवर धरतात. बीजात एक दलिका मोठी व एक लहान असते बी लंबगोल असते तीत पिठूळ, तेलकट व खाद्य अन्नभाग असतो. सर्व फळावर किंजल्क वाळून कठीण झाल्याने काटेरी व जाड आवरण बनते. पिकलेल्या फळास उत्तम स्वाद असून गरे खाद्य, गोड, शक्तिवर्धक, रक्तवर्धक व कामोत्तेजक असतात. गोरगरीब लोकांना पिकलेल्या फणसांचा अन्नासारखा उपयोग होतो. इतर फळांपेक्षा याला व्यापारी महत्त्व कमी आहे. पक्व फणसापासून लोणची, फणसपोळ्या, पाक, जॅम, जेली इ. खाद्यपदार्थ तयार करतात गरे हवाबंद डब्यात भरून ठेवतात. गऱ्यातील आठळ्या (बी) उकडून अगर भाजून खातात, त्यांची भाजीही करतात. चिवर (गराभोवतीचे तंतू) गुरे मोठ्या आवडीने खातात. याचे लाकूड प्रथम फिकट व नंतर गर्द पिवळे बनते आणि पुढे किंचित लालसर होते. ते मजबूत, टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. त्यापासून सजावटी सामान, घरबांधणीची सामग्री, होड्या, डोलकाठ्या, वल्ही, गाड्या, मुसळे, कपाटे इ. अनेक वस्तू व वाद्ये बनविता येतात. लाकडाचा भुसा उकळून पिवळा ‘बसंती रंग’ काढतात आणि रेशमी व बुद्ध भिक्षूची छाटी, कफनी वगैरे कपडे रंगविण्यासाठी वापरतात. चिकापासून पक्षी पकडण्याचा उत्तम गोंद बनवितात. त्याने लोखंडी मोटेची किंवा मडक्यांची भोके बंद करून गळती थांबविता येते. फळातील गऱ्यांशिवाय इतर भाग व पाने गुरांना चारा म्हणून घालतात. पानांपासून पत्रावळीही बनवितात. झाडाची मुळे अतिसारावर, चीक गाठींच्या सुजेवर किंवा फोड पिकण्यास त्या ठिकाणी लावतात कोवळी पाने जखम किंवा फोड सुकविण्यास व शेकण्यास वापरतात. गऱ्यातील मांसल भागात ७८·२% जलांश, १·९% प्रथिन, ०·१% वसा (स्निग्ध पदार्थ) आणि १८·९% कार्बोहायड्रेट, तसेच काही प्रमाणात अ व क ही जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्ये असतात. बियांमध्ये ५१·६% जलांश, ६·६% प्रथिन, ०·४% वसा आणि ३८·४% कार्बोहायड्रेट असतात. बियांमध्ये ब१ व ब२ ही जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात.
ज्ञानसागर, वि. रा.
प्रकार व लागवड : लागवडीखालील फणसाचे ठोकळमानाने दोन प्रकार समजतात. एकाला ‘कापा’ आणि दुसऱ्याला ‘बरका’ म्हणतात. कापा प्रकारचे गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड आणि रोचक असून फणसातून काढून घेण्यास सोपे असतात. बरका प्रकारचे गरे नरम, लिबलिबीत, चवीला गोड किंवा सपक असून फणसातून काढून घेण्यास जरा अवघड असतात. कापा फणसाच्या पक्व फळावर बोटाने टिचकी मारल्यास धप्प असा आवाज निघतो. साल दबत नाही. बरका फणसाच्या पक्व फळावर टिचकी मारल्यास विशिष्ट आवाज निघत नाही पण बोटाने साल दाबल्यास दबते. या दोन प्रकारांशिवाय फलपुंजाचा आकार, आकारमान, गराची चव, गराचा वास, सालीचा प्रकार, तिच्यावरील काट्यांचा आकार व दाटपणा यांवरून आणखी निरनिराळे प्रकार मानण्यात येतात. त्यांपैकीच रुद्राक्षी नावाचा एक प्रकार तमिळनाडूत लागवडीत आहे. त्याची फळे लहान, सालीवर कमी काटे असलेली, पण सामान्य फणसापेक्षा कमी दर्जाची असतात. या प्रकारात बियांपासून अभिवृद्धी (लागवड) केली असतानाही झाडांचे वैयक्तिक गुणधर्म कायम राहतात. दुसरा प्रकार अलीकडेच श्रीलंकेमधून भारतात आणलेला आहे. त्याला श्रीलंका किंवा सिंगापुरी प्रकार म्हणतात. त्याची फळे मध्यम दर्जाची व आकारमानाने स्थानिक फणसाएवढी असतात आणि ती गैर हंगामी (सप्टेंबर ते डिसेंबर या काळात) येतात.
इतर कोणत्याही फळझाडापेक्षा फणसाचे दर झाडापासूनचे उत्पन्न (वजनी) जास्त असते, तरीही भारतात त्याची फळबाग म्हणून संघटित मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात नाही. त्याचे एक कारण म्हणजे हे फळ ज्या भागात पिकते त्या बाहेरील भागात त्याला फारशी मागणी नसते. दुसरे कारण गरे जास्त खाल्याने माणसाची पचनशक्ती बिघडते हा लोकांत प्रचलित असलेला समज. केरळ भागात फणसाच्या बागा लावण्याचे प्रयत्न झाले आहेत. १९५५ साली भारतात या फळझाडाच्या लागवडीचे एकूण क्षेत्र सु. ६५,००० हेक्टर होते.
हवामान व जमीन : उष्ण दमट हवामान, अधून मधून पडणारा पाऊस आणि चांगल्या निचऱ्याची खोल सुपीक जमीन फणसाला फार मानवते परंतु जमिनीत सतत पुरेशी ओल असल्यास चांगल्या निचऱ्याची कोणतीही जमीन चालते. काळ्या चिकण जमिनीत फळे उशीरा धरतात व थोडी येतात. तीव्र उन्हाळा अथवा कडाक्याची थंडी याला मानवत नाही. तसेच दाट सावलीतही हे झाड चांगले वाढत नाही. सु. १,६०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे झाड वाढू शकते परंतु सु. १,२०० मी. पेक्षा जास्त उंचीवरील झाडांची फळे कमी प्रतीची असतात.
अभिवृद्धी : सर्वसाधारणपणे फणसाची अभिवृद्धी बियांपासून करतात. बी कायम जागी पावसाळ्यात लावतात, कारण रोपाचे सोटमूळ लांब व नाजूक असल्यामुळे विशेष काळजी घेतल्याशिवाय रोपांचे स्थलांतर करणे कठीण जाते. पण या पद्धतीने तयार केलेल्या झाडाझाडांवरील फळांत खूपच भिन्नता आढळते. एकाच गुणधर्माची फळे मिळविण्याकरिता कलमे लावून लागवड करता येते. तामिळनाडू राज्यातील कलार येथील फलसंशोधन केंद्रावर ही पद्धत ६०–७०% यशस्वी झालेली आहे. हिच्यात आर्टोकार्पस हिर्सुटा या रानटी जातीच्या खुंटावर लागवडीतील फणसाचे भेटकलम केले जाते. भेटकलमे करून कलमाची लागवड भारताच्या नैर्ऋत्य भागात पावसाळ्यांत जून ते सप्टेंबर महिन्यांत करतात इतर भागात जुलै ते डिसेंबर या महिन्यांत करतात. कलम झाडावरून उतरल्यावर ते महिनाभर सावलीत ठेवून जोपासून नंतर लावतात. चांगल्या जमिनीत सु. एकदशांश घनमीटरचे खड्डे १२ मी. हमचौरस अंतरावर खणून त्यांच्यामध्ये कलमे लावतात. हलक्या जमिनीमधील खड्डे खणल्यावर सहा महिन्यांपर्यंत उन्हात तापू देतात. नंतर कुजलेले शेणखत प्रत्येकी सु. १५ किग्रॅ. घालून पावसाळ्यात लागण करतात. उत्तर व मध्य भारतात विशेषतः लावलेल्या रोपांचे किंवा कलमांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करणे जरूर असते. लागवड केलेल्या झाडांना खत व पाणी दिल्यास फायदा होतो, असे आढळून आले आहे. लागण केलेल्या झाडांना सु. आठव्या वर्षापासून फळे येऊ लागतात. फळांचा हंगाम मार्च ते जून असतो. कधीकधी उंचावरील प्रदेशामधील फळांचा हंगाम सप्टेंबरपर्यंत सुद्धा टिकतो.
उत्पन्न : प्रत्येक झाडावरून दरसाल ५० पासून २५० पर्यंत फळे मिळतात. ती ३० ते ६० सेंमी. लांब व २५ ते ३० सेंमी. व्यासाची आणि २७ किग्रॅ.पर्यंत वजनाची असतात.
चौधरी, रा. मो.
रोग व कीड : फणसावर खोडकूज, फळकूज हे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग तुरळक आढळतात. यांच्यापैकी फळकूज हा रोग आसामात आढळतो (१९७७ व १९७८ मध्ये केरळातील त्रिवेंद्रम येथे ऱ्हायझोक्टोनिया सोलॅनी या कवकामुळे होणारा फळकूज रोग आढळला होता). त्याचा प्रादुर्भाव नरफुलावर सुद्धा आढळतो. हे कवक जमिनीत कार्बनी पदार्थावर जगते. बोर्डो मिश्रण फवारण्याने रोग आटोक्यात येतो. फणसावरील किडीमध्ये विशेषतः खोडकिडा व पिठ्या कीटक आढळतात. खोडकिड्याच्या अळीचा फणसाच्या कोवळ्या फांद्या व कोवळी फळे यांना उपद्रव होतो. खोडकिड्याच्या विनाशाकरिता बीएचसी किंवा डीडीटी ही कीटकनाशके फवारतात. अळ्या गोळा करून त्यांचा नाश करतात. पिठ्या कीटक कोवळ्या फांद्यांतील रस शोषून घेऊन अपाय करतात.
रुईकर, स. के.
रानफणस : (लॅ. आ. हिर्सुटा). हा सु. ६० मी. उंचीचा सदापर्णी वृक्ष फणसाच्या कुलवंशातील असल्याने अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत. त्याचा प्रसार भारतात (कारवार, कोकण, मुंबई, कोचीन, त्रावणकोर किनारा, कूर्ग, कर्नाटक, तमिळनाडू इ.) विपुल आहे. याच्या सर्व कोवळ्या भागांवर लांब, राठ केस असतात. स्त्री-पुष्पबंधाक्ष (फुलोऱ्याचा दांडा) सरळ उभा असतो. फळ लिंबाएवढे व काटेरी फुले जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येतात व फळे मेमध्ये पिकतात. लाकूड पिवळसर, पिंगट, टिकाऊ, मजबूत व हलके असून सागवानाची बरोबरी करते. फळे खाद्य आहेत. वाळलेली पाने व रस, कचोरा व कापराबरोबर सजलेल्या वृषणावर (पुं-जनन ग्रंथीवर) लावतात.
बाधर : (लॅ. आ. लकूचा). हा पानझडी वृक्ष १२–१८ मी. उंच (१·८ ते ३·० मी. घेराचा) असून तो भारतात (हिमालयात कुमाऊँ ते पूर्वेस ब्रह्मदेशापर्यंत व दक्षिणेस त्रावणकोरपर्यंत, कोकण व कारवारची गर्द जंगले), ब्रह्मदेशात, श्रीलंकेत व मलेशियात आढळतो. (याला म. वाटोंबा, सं. लकुच, क. वाचुळी, इं. मंकी जॅक इ. नावे आहेत). बृहत्संहितेत (वृक्षायुर्वेदात) लकुच (ओटी) याचा उल्लेख पाणथळ जागी वाढणारा वृक्ष असा केला आहे. याची पाने फणसापेक्षा मोठी, फुलोरे बुटके, पुं-कणिशे खालच्या पानांच्या कक्षेत (बगलेत) व स्त्री-कणिशे वरच्या पानांच्या कक्षेत फळ साधारण सीताफळाएवढे, लवदार व पिकल्यावर पिवळे (मार्च-एप्रिल) दिसते. पुं-कणिशाचे लोणचे करतात. फळ मधुर-आंबट व खाद्य. पाने गुरांना चारण्यास उपयुक्त फळ कामोत्तेजक, तोंडास रुची आणणारे व क्षुधावर्धक. बिया रेचक. साल गरम पाण्यात कुसकरून मुरुम, पुटकुळ्या व कातडीवरच्या भेगा यांस लावतात. मुळांपासून पिवळा रंग काढतात. लाकूड फणसाप्रमाणे व अनेक प्रकारे उपयुक्त, वाळवीपासून सुरक्षित व पाण्याच्या सन्निध टिकणारे असते. सालीत टॅनीन असते.
ज्ञानसागर, वि. रा.
विलायती फणस : (इं. ब्रेड फ्रूट ट्री लॅ. आ. इंसिसा, आ.कॉम्यूनिस, आ. अल्टिलिस). हा वृक्ष मूळचा ईस्ट इंडीजमधील असून त्याचे फळ उपयुक्त असल्याने हल्ली सामान्यतः सर्व उष्ण देशांत त्याची लागवड करतात. ह्याला कोणी कोणी ‘भाकरीचे झाड’ असेही म्हणतात कारण याच्या फळापासून मिळणाऱ्या पिठाच्या भाकरी करतात. भारतात डच लोकांनी ते प्रथम आणले असे म्हणतात. दक्षिणेत (विशेषतः कोकण, गोवा व कारवार) किनाऱ्यालगतच्या टेकड्यांवर याची वाढ चांगली होते.
हा वृक्ष अतिशय शोभिवंत असून १४ ते २० मी. उंच होतो. पाने मोठी, दीर्घवर्तुळाकार, चकचकीत हिरव्या रंगाची असून देठाकडे ती अखंड पण टोकांकडे खोल फटींमुळे त्याचे तीन ते नऊ खंड पडलेले असतात. पुं-आणि स्त्री-पुष्पे वेगवेगळ्या फुलोऱ्यात पण एकाच झाडावर असतात. पुष्कळ पुं-पुष्पे एके ठिकाणी असून त्यांचे गदेसारखे लोंबते कणिश (फुलोरे) असतात. स्त्री-पुष्पे असंख्य असून त्यांचे छिद्रल पुष्पासनांवर मोठे काटेरी गुच्छ असतात. या स्त्री-पुष्पांच्या परिपक्व किंजपुटांचेच पूर्ण वाढ झालेले संयुक्त (एकत्रित) फळ बनलेले असते ते गोलसर, फणसासारखे, सामान्यतः १० ते २० सेंमी. व्यासाचे आणि हिरवट पिवळे किंवा तपकिरी हिरव्या रंगाचे असून आतला गर पांढरा व काहीसा रेषायुक्त असतो. पावाशी त्याची तुलना करून या वृक्षाचे ‘ब्रेड फ्रूट ट्री’ असे इंग्रजी नाव पडले आहे.
ह्या वृक्षाचे स्पष्टपणे दोन भिन्न प्रकार असतात. एकाच्या फळात अजिबात बी नसते आणि दुसऱ्यात चेस्टनटासारख्या दिसणाऱ्या बिया भरपूर असतात. बिनबियांचा प्रकार विशेष उपयुक्त असल्यामुळे सामान्यतः त्याचीच लागवड करतात. मलेशिया द्वीपसमूहात याची अतिप्राचीन काळापासून लागवड केली जात आहे आणि या भागातूनच इतिहासपूर्व काळात त्याचा दक्षिण पॅसिफिकच्या सगळ्या उष्ण कटिबंधी प्रदेशांत प्रसार झाला.
सामान्य रूढ अर्थाने ज्याला फळ म्हणतात तशा प्रकारचे या झाडाचे फळ नसते यात पिष्टमय पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे फळ भाजून किंवा शिजवूनच खावे लागते. फळ पिकण्यापूर्वी त्यातला मगज (गर) जेव्हा पिठूळ असतो आणि साधारणपणे रताळ्याच्या मगजाइतपत घट्ट असतो त्या वेळी त्याचा खाण्यासाठी उपयोग करतात. पॅसिफिक महासागरातील द्वीपांमधील मूळचे रहिवासी ज्या पद्धतीने ही फळे भाजीच असत त्याच पद्धतीने जमिनीत खड्डा खणून त्यांत तापविलेल्या दगडांचा एक थर, नंतर फळांचा एक थर, हिरव्या पानांचा थर त्यावर पुन्हा गरम दगडांचा थर याप्रमाणे काही काळापर्यंत पूर्वी ही फळे भाजण्याचा प्रघात होता. परंतु हल्ली ही फळे उकडतात अथवा भट्टीत भाजतात किंवा फळाच्या चकत्या करून त्या बटाट्याच्या चकत्यांप्रमाणे तळतात. भाजलेले किंवा उकडलेले नुसते फळ बेचव लागते म्हणून मीठ व लोणी लावून अथवा पातळ मसाल्यात कालवून त्याला चव आणतात. अशा तऱ्हेने खाण्याकरिता वापरल्यास हे स्वादिष्टच नव्हे, तर पौष्टिकदेखील असते.
बी असलेल्या फळांतील बिया नुसत्या भाजून खातात किंवा दळून त्यांच्या पिठाचा उपयोग खाण्याकडे करतात.
वेस्ट इंडीजमध्ये आणि अमेरिकेच्या मेक्सिकोपासून ब्राझीलपर्यंतच्या प्रदेशात हे झाड घराभोवतालच्या मोकळ्या जागेत लावून फळे बाजारात विकतात.
बिनबियांच्या झाडांची अभिवृद्धी मुळांच्या अधश्चरांपासून (कोंबापासून) अथवा छाटांपासून करतात. या झाडांना २०० ते २२५ सेंमी. पाऊस आणि उष्ण व दमट हवा लागते. कडाक्याची थंडी त्यांना सोसत नाही आणि ९०० मी.पेक्षा जास्त उंच जागी ती वाढत नाहीत.
दक्षिण पॅसिफिकमधील बेटांत या झाडाच्या तंतुमय अंतर्सालीपासून कापड तयार करतात लाकडाचा उपयोग डोंगे किंवा होड्या आणि फर्निचर तयार करण्याकरिता होतो. खोडावर केलेल्या जखमांमधून गळणाऱ्या पांढऱ्या चिकट रसापासून एक प्रकारचे चिकटवण आणि भेगा बुजविण्याकरिता किंवा दरजबंदी करण्याकरिता लागणारा पदार्थ तयार करतात.
पहा : मोरेसी
चौधरी, रा. मो.
संदर्भ : 1. Hays, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.
2. Sing, Sham and others, Horticulture in india, New Delhi., 1963.
३. परांजपे, ह. पु. फळझाडांचा बाग, पुणे, १९५०
“