फंजाय  इंपरफेक्टाय : (म. अपूर्ण कवक). कवकांचे वर्गीकरण [⟶ कवक] त्यांच्या लैंगिक पुनरुत्पादनाच्या पद्धतीवर आधारलेले आहे परंतु सत्यकवकांचा असा एक मोठा समूह आहे की, ज्यांची पूर्णावस्था (ज्या अवस्थेत लैंगिक जननाने बीजुके–प्रजोत्पादक घटक–तयार होतात) अद्याप आढळून आलेली नाही (कवकांच्या क्रमविकासाच्या–उत्क्रांतीच्या-स्थितीत यांतील काही कवकांची पूर्णावस्था नाहीशी झाली असण्याचीही शक्यता आहे). अशा प्रकारच्या अपूर्णवस्थेतील सत्यकवकांचा निराळा वर्ग फंजाय इंपरफेक्टाय अथवा ‘अपूर्ण कवक’ या नावाने ओळखला जातो. यात सु. १,४०० वंश आणि २०,००० जाती आहेत. या वर्गातील बहुसंख्य कवके ⇨ॲस्कोमायसिटीज (धानीकवक) व काही बॅसिडिओमायसिटीज (गदाकवक) या वर्गांतील कवकांच्या अपूर्ण अवस्था असतात. ज्या वेळी एखाद्या अपूर्ण कवकाची पूर्णावस्था माहीत होते त्या वेळी पूर्णावस्थेच्या योग्य त्या वर्गात त्याचा समावेश केला जातो. उदा., कपाशीवरील दह्या रोगाचे कवक रॅम्यूलेरिया ॲरिओला या अपूर्णावस्थेतील नावाने ओळखले जात होते. पूर्णावस्था (धानीफल) आढळून आल्यावर हे कवक मायकोस्फिरिला ॲरिओला या नावाने ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणे देता येतील.

आ. १. फंजाय इंपरफेक्टाय : विबीजुकफलांचे प्रकार : (अ) स्पोरोडोकियम (आ) ॲसरव्ह्यूलस (इ) पिक्निडियम (अ), (आ) व (इ) मध्ये (१) विबीजुकदंड, (२) विबीजुके.

या वर्गातील कवकांचे प्रजोत्पादन अलैंगिक असते. विबीजुके (अलैंगिक रीतीने तयार झालेली बीजुके) निरनिराळ्या आकारांची असून विबीजुकदंड (विशिष्ट प्रकारच्या तंतुशाखा) सुटे अगर निरनिराळ्या प्रकारच्या समूहांत असतात. विबीजुकफले चंबूच्या आकाराची (पिक्निडियम) अथवा बशीच्या आकाराची (ॲसरव्ह्यूलस) असतात व त्यांत विबीजुकदंडांवर विबीजुके येतात. काही कवकांत कोणत्याही प्रकारचे पुनरुत्पादन होत नाही व ती ‘वंध्यकवक’ या नावाने ओळखली जातात.

या वर्गात सदा-शवोपजीवी (ज्यांचे पोषण नेहमी मृत प्राणी, त्यांचे भाग किंवा मृत वनस्पतींवर होते अशी) आणि वैकल्पिक जीवोपजीवी (जी जिवंत वनस्पती वा प्राणी यांच्यापासून प्रथमतः, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर शवातूनही अन्न घेतात अशी) कवके आढळून येतात.

वर्गीकरण : विबीजुकफलाच्या प्रकारावर आधारित असे चार गण या वर्गात असून ते पुढीलप्रमाणे आहेत : (१) मोनिलियालीज : यात विबीजुकदंड कवकाच्या पृष्ठभागावर एकेकटे अथवा स्पोरोडोकियमासारख्या (फुगीर उशीसारख्या) समूहात असतात व त्यावर विबीजुके धरतात. (२) मेलँकोनियालीज : यात विबीजुकदंड ॲसरव्ह्यूलस प्रकारच्या विबीजुकफलांत असून त्यावर विबीजुके धरतात. (३) स्फेरोप्सिडेलीज : विबीजुके निरनिराळ्या आकारांच्या अर्धवट बंद अशा पिक्निडियम अथवा तत्सम विबीजुकफलांत असतात. (४) मायसिलिया स्टरीलिया : (वंध्यकवके). या गणातील कवकांत विबीजुके आढळून येत नाहीत.

या वर्गातील निरनिराळ्या गणांतील वनस्पतिरोगांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असलेले वंश पुढीलप्रमाणे आहेत : मोनिलियालीज गणातील ओइडियम, आल्टर्नेरिया, सर्कोस्पोरा व फ्युजेरियम मेलँकोनियालीज गणातील कोलेटॉट्रिकम ग्लिओस्पोरियम स्फेरोप्सिडेलीज गणातील फोमा, ॲस्कोकायटा, डिप्लोडिया सेप्टोरिया मायसिलिया स्टरीलिया गणातील स्क्लेरोशियम ऱ्हायझोक्टोनिया.

वनस्पतिरोग : या वर्गातील कवकांमुळे पिकांवर व फळझाडांवर निरनिराळी लक्षणे असलेले रोग पडतात. महत्त्वाचे रोग पुढीलप्रमाणे आहेत.

मर : कापूस, हरभरा, तूर, वाटाणा, लाख, टोमॅटो, वांगी, केळी इ. वनस्पतींना हा रोग होतो. रोगाचे कवक जमिनीत राहते आणि त्याचा मुळांवाटे वनस्पतीत शिरकाव होतो. नंतर त्याची वाढ प्रकाष्ठातील (पाण्याची ने-आण करणाऱ्या व शरीराला मजबुती आणणाऱ्या वनस्पतीच्या भागातील) जलवाहक नलिकांत होते व त्याचा परिणाम वनस्पतीच्या निरनिराळ्या भागांना पाणी व लवणे यांच्या होणाऱ्या पुरवठ्यावर होऊन झाड मरते. काही झाडांत कवकजन्य विषारी पदार्थही झाड वाळण्यास कारणीभूत होतात. [⟶ मर].

मूळकूज : कापूस, तंबाखू, तीळ व इतर पुष्कळ पिके या रोगाला बळी पडतात. या रोगातही कवक जमिनीत राहते. रोगामुळे वनस्पतीच्या मुळांची बाह्य साल कुजते व झाड मरते. अशी मेलेली झाडे थोड्याशाच प्रयत्नाने मुळांसकट उपटली जातात.


आ. २. फंजाय इंपरफेक्टाय वर्गातील कवकांमुळे होणारे वनस्पतींचे रोग : (अ) भातावरील करपा : (१) रोगट पान, (२) लोंबीच्या देठावरील रोगट भाग, (३) विबीजुके (आ) ऊस रंगणे : (१) रोगट खोडाचा उभा छेद, (२) रोगट पान, (३) विबीजुके (इ) भुईमुगावरील टिक्का : (इ१) सर्कोस्पोरा पर्सोनाटा : (१) पानावरील ठिपके, (२) विबीजुके (इ२) सर्कोस्पोरा ॲरॅचिडिकोला : (१) पानावरील ठिपके, (३) विबीजुके (ई) बटाट्यावरील करपा : (१) रोगट पान, (२) विबीजुके (उ) तुरीचा मर रोग : (१) रोगाने वाळलेली झाडे, (२) रोगट खोडाचा उभा छेद, (३) विबीजुके.

फांद्या, पाने व फळे यांवरील रोग : जसे खैरा अथवा व्रण (पेरूची फळे) काळा व्रण अथवा रुक्ष रोग (कापूस, घेवडा, द्राक्षे, मिरची कापसाच्या बोंडांवरील या रोगाला ‘कवडी’ असे म्हणतात) ⇨करपा (बटाटा, टोमॅटो, जिरे, भात) पानांवरील ठिपके [भुईमूग, बीट, कापूस (दह्या रोग), भात, तंबाखू]. याखेरीज ऊस रंगणे [⟶ ऊस] हाही महत्त्वाचा रोग आहे. या रोगाच्या कवकाची पूर्णावस्था भारतात केव्हा केव्हा आढळून येते.

वरील रोगांचा प्रतिबंध आणि निर्मूलन करण्यासाठी पूर्व पिकांचे अवशेष नष्ट करून व तणांचा नाश करून शेतजमीन स्वच्छ ठेवणे, बियांना कवकनाशक चोळणे, रोगट झाडे शेतात दिसताच त्यांचा नाश करणे, कवकनाशकांचा वापर व रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हे सर्वसाधारण उपाय आहेत.

पहा : कवक कवकनाशके वनस्पतिरोगविज्ञान.

संदर्भ : 1. Bessey, E. A. Morphology and Taxonomy of Fungi, New York, 1964.

   2. Chester, K. S. Nature and Prevention of Plant Diseases, New York, 1950.

   3. Roberts, D. A. Boothroyd, C. W. Fundamentals of Plant Pathology, San-Francisco, 1972.

   4. Singh, R. S. Plant Dieases, Bombay, 1968.

   5. Walker, J. C. Plant Pathology, New York, 1969.

भिडे, वि. प. गोखले, वा. पु.