प्लेयाद, ला : सोळाव्या शतकात फ्रान्समध्ये घडून आलेल्या प्रबोधनाशी निगडित असलेले एक कविमंडळ. प्लेयाद म्हणजे सप्तर्षी. ह्या कवीमंडळात, त्याच्या नावाला अनुसरून, सात कवी होते. प्येअर द राँसार, झोआकिम द्यू बेले, पाँत्यूस द त्यार, झां आंत्वान बाईफ, एत्येन जॉदेल, रेमी बॅलो व झाक पॅलतिए हे ते होत. काही अभ्यासक पॅलतिएच्या ऐवजी झां दोरा ह्या कवीचा अंतर्भाव ह्या सप्तर्षींत करतात. राँसार हा प्लेयादमधील सर्वश्रेष्ठ कवी. मध्ययुगीन वाड्‌मयीन परंपरा झुगारून देऊन फ्रेंच भाषा-साहित्याला नवे वळण लावण्याचा प्लेयादचा प्रयत्न होता. होमर, पिंडर, हॉरिस ह्यांसारख्या अभिजात ग्रीक-लॅटिन कवींप्रमाणे पीत्रार्क ह्या इटालियन कवीचा आदर्शही प्लेयादसमोर होता. तसेच काव्यातून ख्रिस्ती पुराणकथांऐवजी ग्रीक पुराणकथांचा वापर करण्याची प्रवृत्ती प्लेयादमधील कवींनी जोपासली. फ्रेंच भाषा संपन्न करण्यासाठी ग्रीक-लॅटिन भाषांतील, तसेच प्राचीन फ्रेंच भाषेतील शब्द त्यांनी आत्मसात केले. तांत्रिक आणि व्यवसायविषयक शब्दही वापरात आणले. देफांस ए इल्ल्‌युस्त्रासिआँ द ला लांग फ्रांसॅझ (१५४९) ह्या झोआकिम द्यू बेलेकृत प्रबंधात प्लेयादची वाङ्‌मयीन भूमिका विशद करण्यात आली. नवनवे शब्द व काव्यरचना ह्यांनी फ्रेंच साहित्य समृद्ध करून त्याला ग्रीक-लॅटिन साहित्यांची श्रेष्ठता प्राप्त करून देणे हा प्लेयादचा हेतू व प्रयत्न होता. ग्रीक-लॅटिन कवींचे अत्यनुकरण, पांडित्याचे प्राचुर्य अशा कारणांमुळे प्लेयादचा प्रसार उत्तरोत्तर कमी होत गेला.

सरदेसाय, मनोहरराय