प्लंबॅजिनेसी : (चित्रक कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ह्या कुलाचा समावेश आडोल्फ एंग्लर व कार्ल फोन प्रांट्ल यांच्या पद्धतीत प्लंबॅजिनेलीझ गणात आणि जॉर्ज बेंथॅम व जे. डी. हूकर आणि जॉन हचिन्सन यांच्या पद्धतीत ⇨प्रिम्युलेलीझ गणात केलेला आढळतो. ह्या कुलातील वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ⇨औषधी, क्षुपे (झुडपे) अथवा वेली असतात. एकूण सु. १० वंश व ३०० जाती (जे.सी. विलिस यांच्या मते ५०० जाती) प्रसार-जगभर मध्यम रूक्ष प्रदेशात, लवणयुक्त गवताळ प्रदेशात व समुद्रकिनाऱ्यावर, पाने एकाआड एक, साधी फुले द्विलिंगी, सच्छद, अरसमात्र, पंचभागी व अवकिंज असून ती विविध प्रकारच्या फुलोऱ्यात येतात संदले जुळून वाढल्याने संवर्त नळीसारखा होतो त्याचे पापुद्र्याप्रमाणे फळावर सतत आवरण राहते. पाकळ्या जुळलेल्या किंवा तळापासून बराच भाग सुटा केसरदले पाकळ्यांसमोर, बहुधा अपिप्रदललग्न परागकोश द्विपुटक व अंतर्मुख असून उभ्या रेषेवर तडकतात बिंब नसते. किंजले पाच व संदलासमोर किंजपुट ऊर्ध्वस्थ, त्यात एकच कप्पा व एकाकी, तलस्थ व लांब देठाचे लोंबते बीजक [→ फूल]. फळ क्लोम (फुग्यासारखे) किंवा आडवे फुटणारे बोंड बी सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले). ह्या कुलातील वनस्पतींना फारसे व्यावहारिक महत्त्व नाही. ⇨चित्रक व तत्सम इतर वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात. चित्रक औषधी व विषारी वनस्पती आहे.
ह्या कुलातील कित्येक जातींवर श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव किंवा चुन्याच्या निवळीसारखा द्रव स्त्रवणारे प्रपिंड (ग्रंथी) असतात. भेंडात व ⇨मध्यत्वचेत ⇨वाहक वृंद आणि अंतर्वेशी ⇨परिकाष्ठ आढळते.
पहा : वनस्पति, विषारी.
संदर्भ : Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants,
जमदाडे, ज. वि.