प्रोस्टाग्लँडिने :शरीरातील सर्व ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या समूहांत) तयार होणाऱ्या हॉर्मोनसदृश [→हॉर्मोने] संयुगांचा एक गट. ऊतकांच्या कोशिका भित्तींमध्ये असंतृप्त वसाम्लांपासून [→वसाम्ले] प्रोस्टाग्लँडीन सिंथेटेज नावाच्या एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाच्या) प्रक्रियेमुळे संश्लेषणाने (साध्या संयुगाच्या वा मूलद्रव्यांच्या संयोगाने जटिल-गुंतागुंतीची संरचना असलेले – संयुग तयार होण्याच्या प्रक्रियेने) ही संयुगे तयार होतात. निरनिराळ्या ऊतकांत तयार होणाऱ्या या वसाभ पदार्थांचे (चरबीसारख्या पदार्थांचे) औषधी परिणाम भिन्न असतात. या प्रत्येक संयुगाच्या रेणूत २० कार्बन अणू असतात.
इतिहास :इ. स. १९३० मध्ये राफेल कर्झरॉक व सी.सी. लीब या शास्त्रज्ञांनी मानवी वीर्यामध्ये मानवी गर्भाशयाच्या ऊतकात जोरदार आकुंचने व शिथिलने उत्पन्न करण्याचा गुणधर्म असल्याचे दाखवून दिले. १९३३-३५ या दरम्यान यू.एस्.फोन ऑयलर व एम्.डब्ल्यू. गोल्डब्लॅट या शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे केलेल्या प्रयोगांतून असे दिसू आले की, मानवी वीर्य व मेंढीतील काही ग्रंथी यांमध्ये स्नायु-ऊतक उद्दीपित करणारा तसेच अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) शरीरात टोचल्यास रक्तदाब कमी करणारा पदार्थ असावा. हा पदार्थ ⇨अष्ठीला ग्रंथीतून येत असावा अशा समजुतीने फोन ऑयलर यांनी ‘प्रोस्टेट’ या अष्टीला ग्रंथीच्या इंग्रजी नावावरून ‘प्रोस्टाग्लँडीन’ हे नाव त्याला दिले. प्रत्यक्षात प्रोस्टाग्लँडीन ही संज्ञा अपसंज्ञाच आहे, कारण हा पदार्थ केवळ अष्ठीला ग्रंथीपासून न येता रेताशय व इतर ऊतकांतूनही मिळतो. सून बर्गस्ट्रॉम नावाच्या फोन ऑयलर यांच्या सहकारी शास्त्रज्ञांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत संशोधन पुढे चालू ठेवले. त्यांनी १९५७-६२ या दरम्यान मेंढीतील ग्रंथीपासून अत्यल्प प्रमाणात प्रोस्टाग्लँडीन तयार केले आणि १९६२ मध्ये प्रोस्टानोइक अम्ल या वसाविद्राव्य (वसेमध्ये विरघळणाऱ्या) अम्लाची प्रोस्टाग्लँडिने अनुजात असल्याचे दाखविले. १९६३ मध्ये एस्. ॲब्राहॅमसन यांनी या पदार्थाच्या रासायनिक संरचनेविषयक माहितीत भर घातली. १९६४ मध्ये प्रोस्टाग्लँडिने वसाम्ले व प्राण्यांच्या ग्रंथी यांच्या मिश्रणापासून संश्लेषणाने मिळविण्यात यश आले.
प्रोस्टाग्लँडिनांच्या शोधापूर्वी फोक्ट या शास्त्रज्ञांनी आतड्याच्या ऊतकापासून ‘डार्मस्टॉफ’ नावाचा पदार्थ मिळविला होता. काही शास्त्रज्ञांनी सशाच्या डोळ्यातील कनीनिकेच्या (ज्याच्या मध्यभागी बाहुली असते त्या वर्तुळाकार पडदेवजा भागाच्या) ऊतकापासून ‘आयरिन’ नावाचा पदार्थ शोधला होता. प्रोस्टाग्लँडीन-सदृश क्रियाशीलता असणारे हे पदार्थ आता प्रोस्टाग्लँडिनेच असल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रकार व उत्पादन :ज्या सर्व ज्ञात पदार्थांपासून प्रोस्टाग्लँडिने मिळतात, त्यांपैकी मानवी वीर्यापासून प्रोस्टाग्लँडिनांचे सर्वाधिक उत्पादन होत असले, तरी कनीनिका, फुप्फुस, मेंदू, ⇨यौवनलोपी ग्रंथी, ⇨अग्निपिंड, मूत्रपिंड,⇨अधिवृक्क ग्रंथी व यकृत यांच्या ऊतकांच्या अर्कात तसेच मानवी ऋतुस्त्राव द्रव्यातही ती आढळतात.मानवी वीर्यातील प्रोस्टाग्लँडिने सहा संबंधित पदार्थाचे मिश्रण असून ती इ, एफ, ए व बी अशी नावे दिलेल्या गटांत विभागता येतात. इतर मानवी ऊतकांतून बहुतांशी इ व एफ गट आढळतात.
कमीत कमी चौदा नैसर्गिक प्रोस्टाग्लँडिने आहेत. त्यांच्या रासायनिक संरचनेप्रमाणे त्यांना निरनिराळी नावे दिली असली, तरी ती प्रोस्टोनोइक अम्लापासून बनलेली हायड्रॉक्सि-अम्ले आहेत. सहा प्रमुख नैसर्गिक प्रोस्टाग्लँडिनांना पीजीइ१, पीजीइ२, पीजीइ३, पीजीएफ१α, पीजीएफ२α व पीजीएफ३α अशी नावे आहेत. त्यांचे संश्लेषित (कृत्रिम रीतीने) उत्पादनही होऊ शकते. सुरुवातीस त्यांची रासायनिक संरचना निश्चित समजल्यानंतर ती बहु-असंतृप्त वसाम्लांपासून बनविण्याकरिता मेंढ्यांतील शुक्राणु-उत्पादक (पुं-जननकोशिका उत्पादक) ग्रंथीपासून मिळविलेल्या एंझाइमांचा उपयोग करण्यात आला. याकरिता ई.जे. कोरी या शास्त्रज्ञांनी शोधिलेली पुरोगामी पद्धत आजही श्रेष्ठ गणली जाते. अलीकडील संशोधनानंतर कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील दर्शन रंगनाथन् व सुब्रह्मणिया रंगनाथन् या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संश्लेषणाची अधिक सोपी व व्यवहार्य पद्धत वापरण्यात आली आहे.
सस्तन प्राण्यांच्या ऊतकांत प्रोस्टाग्लँडिनांचा संचय होत नाही. जरूरीप्रमाणे त्यांचे जलद उत्पादन होऊ शकते व त्यांचा उपयोग संपल्यानंतर एंझाइमांच्या प्रक्रियेमुळे ती ताबडतोब अक्रिय बनतात. यांत्रिक, औष्णिक, रासायनिक किंवा सूक्ष्मजंतुजन्य हानीच्या जागी ती ताबडतोब तयार केली जातात.
औषधी गुणधर्म :प्रोस्टाग्लँडिने पांढऱ्या चूर्णाच्या स्वरूपात मिळतात व ती औषधी दृष्ट्या अतिप्रभावी असतात. केवळ १ ते ५ मायक्रोग्रॅम मात्रा उत्तम परिणाम करते. ती तोंडाने, आंतरनीला अंतःक्षेपणाने, योनिमार्गाद्वारे किंवा गर्भाशयाच्या आत सोडून वापरता येतात. प्रोस्टाग्लँडिनाचे काही औषधी परिणाम येथे दिले आहेत.
(१) अंतःस्त्रावी ग्रंथी कार्य व चयापचय :(ज्यांचे स्त्राव म्हणजे हॉर्माने सरळ रक्तप्रवाहात मिळतात अशा वाहिनीविहीन ग्रंथीना अंतःस्त्रावी ग्रंथी म्हणतात शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींना चयापचय म्हणतात). मानवी वीर्यात १३ प्रोस्टाग्लँडिने असतात. ती वृषणापासून (पुं-जनन ग्रंथीपासून) किंवा रेताशयापासून तयार होत असावीत. प्रोस्टाग्लँडिने शुक्राणु-उत्पादनांवर परिणाम करीत नाहीत परंतु ⇨पौरुषजन या हार्मोनांच्या स्त्रावावर नियंत्रण करीत असावीत. पुरुष वंध्यत्वात त्यांची पातळी प्राकृतावस्थेपेक्षा बरीच कमी असल्याचे आढळले आहे. शुक्राणूंचीहालचाल,अंडाचा अंडाशयापासूनचा गर्भाशयाकडील प्रवास, तसेच त्याचे निषेचनानंतर (फलनानंतर) गर्भाशय भित्तीतील आरोपण यांवर प्रोस्टाग्लँडिने परिणाम करतात किंवा नाही याविषयी निश्चित पुरावा अजून मिळालेला नाही. गर्भाशयाच्या स्त्रावक अंतःस्तरात व ऋतुस्त्रावातील द्रव्यात प्रोस्टाग्लँडिने मोठ्या प्रमाणात असतात. पीजीएफ२αहे पीतपिंडाचे (अंडाभोवतील कोशिकांच्या द्रवयुक्त पिशवीचे म्हणजे अंडपुटकाचे रूपांतर होऊन तयार होणाऱ्या पिवळ्या अंतःस्त्रावी पिंडाचे) अपघटन करते व अंडाशयाच्या ⇨ प्रगर्भरक्षी या हॉर्मोनाच्या स्रवणात वाढ करते.
प्रोस्टाग्लँडिने पोष ग्रंथी स्त्रावोत्तेजक असतात. हे कार्य ती थँलॅमसावरील अप्रत्यक्ष व पोष ग्रंथीवरील प्रत्यक्ष परिणामाद्वारे करीत असावीत. ती अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातील (बाह्य भागातील) हॉर्मनो स्त्रवणाक आणि अग्निपिंडातून इन्शुलीन मुक्त होण्यात वाढ करतात. तसेच ती अवटू ग्रंथीवर अवटु-उद्दीपक हॉर्मोनासारखे कार्य करतात. [→ अग्निपिंड अधिवृक्क ग्रंथिअवटु ग्रंथि तंत्रिका तंत्र पोष ग्रंथि].
प्रोस्टाग्लँडिने प्रयोगशाळेत वसा ऊतकातील मूलभूत व हॉर्मोन मध्यस्थ असलेल्या वसा अपघटनास प्रतिरोध करतात. अल्प मात्रेत ती शरीरातील वसा अपघटनास अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या [→तंत्रिका तंत्र] उद्दीपनाने मदत करतात. कार्बोहायड्रेट चयापचयावर ती इन्शुलिनासारखे कार्य करतात व शरीर कंकालावर (सांगाड्यावर)⇨परावटू ग्रंथीच्या हॉर्मोनांप्रमाणे परिणाम करतात.
(२) अरेखित स्नायू :(ज्यांच्यावर रेखा दिसत नाहीत व काही अपवाद सोडल्यास ज्यांच्यावर इच्छेचे नियंत्रण चालू शकत नाही असे स्नायू). गर्भाशयाच्या स्नायुस्तरावर प्रोस्टाग्लँडिने उद्दीपक परिणाम करतात. ती आंत्रमार्गाच्या (आतड्याच्या) स्नायूंवर परिणाम करून आतड्याची हालचाल वाढवितात. श्वासनाल व श्वासनलिका यांच्या स्नायूंचा स्नायू-तान (स्नायूतील सर्वसाधारण जोम व ताण) कमी करून श्वसनीविस्फारण करतात (फुप्फुसातील हवेच्या मार्गाचे आकारमान वाढवितात). या कारणाकरिता प्रोस्टाग्लँडिनयुक्त वायुकलिल (द्रव वा घन पदार्थाचे अतिशय सुक्ष्म कण ज्यात लोंबकळत ठेवलेले आहेत असा वायू) दम्यावर गुणकारी ठरण्याचा संभव आहे.
(३) जठरांत्र मार्ग :(जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गाला जठरांत्र मार्ग म्हणतात). जठराच्या श्लेष्मकलास्तरात (बुळबुळीत पातळ अस्तरात) प्रोस्टाग्लँडिने नैसर्गिक रीत्या आढळतात. पीजीइ व पीजीइ ही प्रोस्टाग्लँडिने मानवामध्ये जठराम्ल स्त्रवणास प्रतिरोध करतात व जठरव्रण [→पचनज व्रण] बरा करण्यास मदत करतात परंतु प्रयोगशाळेतील प्राण्यांत ती जठरव्रण उत्पन्न करतात.
(४) हृद्-रक्तवाहिन्या तंत्र :पीजीइ२ व पीजीए२ ही प्रोस्टाग्लँडिने परिसरीय वाहिनीविस्फारण करतात. मूत्रोत्पादनाच्या वेळी मूत्रातील ऋणायनांच्या पुनर्अवशोषणास, विशेषेकरून सोडियमाच्या पुनर्अवशोषणास, प्रतिरोध करतात. पीजीएफ हे प्रोस्टाग्लँडीन रोहिणिकांचे (रोहिणीच्या सूक्ष्म शाखांचे) व नीलांचे आकुंचन करते. प्रोस्टाग्लँडिने हृदगती वाढवून हृदयाच्या आकुंचनाचा जोर वाढवीत असावीत.
(५) जनन तंत्र :गर्भाशयावरील वर उल्लेखिलेल्या परिणामाशिवाय इतर काही परिणाम आढळतात. प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्ये पीतपिंडाचे अपघटन व प्रगर्भरक्षीच्या स्त्रावात घट झाल्याचे आढळते. फिनॉक्सी-प्रोस्टाग्लँडीन पशुवैद्यकात मदोत्पत्तीकरिता व पाहिजे तेव्हा अंडमोचन करण्याकरिता (अंडपुटकापासून पक्व अनिषेचित अंड बाहेर पडण्याकरिता) वापरतात.
(६) तंत्रिका तंत्र : तंत्रिका तंत्रावर प्रोस्टाग्लँडिने निरनिराळे परिणाम करतात. तंत्रिका आवेगाच्या (तंत्रिका उद्दीपित झाल्यावर तिच्या मार्गाने वाहून नेल्या जाणाऱ्या विक्षोभाच्या) परिवहनात ती भाग घेत असावीत.
(७) प्रोस्टाग्लँडिने शोथ (दाहयुक्त सूज) प्रक्रियेत भाग घेत असावीत. काही शोथ-प्रतिबंधक वेदनाशामके (उदा., ॲस्पिरीन) प्रोस्टाग्लँडिनांच्या संश्लेषणात घट आणून परिणामकारी होत असावीत.
युगांडातील एस्. एम्. एम्. करीम यांनी १९७१ मध्ये प्रोस्टाग्लँडिनांच्या औषधी उपयोगासंबंधी पुढील आढावा प्रसिद्ध केला आहे.
(अ) गर्भपात प्रेरणा : आंतरनीला अंतःक्षेपणाने गर्भाशयात सोडून योनिमार्गाद्वारे वा तोंडाने देऊनही प्रोस्टाग्लँडिने गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यात गर्भपातास प्रेरणा देऊ शकतात. परंतु फार मोठी मात्रा द्यावी लागून उलट्या व अतिसार यांसारखे उपद्रव उद्भवतात. हे उपद्रव टाळण्याकरिता ती ऑक्सिटोसिनांबरोबर (पोष ग्रंथीच्या गर्भाशय आकुंचक हॉर्मोनाबरोबर) मिश्रित करून वापरावी.
(आ) प्रसुती प्रेरणा : प्रसूती सुरू करण्याकरिता तोंडाने किंवा आंतरनीला अंतःक्षेपणाने प्रोस्टाग्लँडिने वापरण्यापूर्वी ती ऑस्किटोसिनाइतकी धोकारहित असल्याचे सिद्ध व्हावयास हवे.
(इ) संततिप्रतिबंधक : योनिमार्गाद्वारे देऊन गर्भाशय स्नायूंची जोरदार आकुंचने सुरू करून निषेचित अंड निखळून पाडण्याकरिता.
(ई) रक्तवाहिन्या, श्वासनलिकास्त्राव आणि जठरस्त्राव यांवरील प्रोस्टाग्लँडिनांच्या परिणामांचा अभ्यास चालू आहे.
प्रोस्टाग्लँडिने ही अलीकडील संशोधनातून प्राप्त झालेली अल्प मात्रा असलेली पण अतिप्रभावी औषधे आहेत. निरनिराळ्या नैसर्गिक पदार्थांपासून ती मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. कॅरिबियन समुद्रातील पोवळ्यांच्या प्लेक्साउरा होमोमल्ला नावाच्या एका जातीपासून अमेरिकेत प्रोस्टाग्लँडिने संश्लेषणाने मिळविण्यात यश आले आहे.
संदर्भ : 1. Cuthbert, M.F., Ed., The Prostaglandins, London, 1973.
2. Datey, K.K.Shah, S.J., Ed., A.P.I.Textbook of Medicine, Vol. I, Bombay, 1979.
3. Ranganathan, D. Ranganathan, S. Prostaglandins :Mighty Drugs in Mini Doses, Science Today, October 1978.
4. Satoskar, R.S. Bhandarkar, S.D. Pharmacology and Pharmacotherapeutics,Bombay, 1978.
भालेराव, य. त्र्यं.
“