प्रेमचंद : (३१ जुलै १८८०-८ ऑक्टोबर १९३६). युगप्रवर्तक हिंदी-उर्दू कादंबरीकार व कथालेखक. प्रेमचंदांचा जन्म उत्तर प्रदेशातील लमही (जिल्हा पांडेपुर) येथे झाला. त्यांचे कुटुंब कनिष्ठ मध्यम वर्गीय
प्रेमचंदांचे बालपण खेड्यात गेले. ते खिलाडू वृत्तीचे व तरतरीत बुद्धीचे होते. लहानपणी अभ्यासापेक्षा पतंग उडविणे, विटीदांडू खेळणे, शेतातील वस्तू चोरून खाणे, बागेत हौसेने कामे करणे व उनाडक्या करणे यांतच ते अधिक रमत. त्यांच्या या बालजीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘होली’, ‘कजाकी’, ‘गुल्लीडंडा’, ‘चोरी’ यांसारख्या कथांत मोठ्या मनोरम रीतीने पडलेले दिसते. प्रेमचंदांची आई वारली तेव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते. त्यानंतर दोन वर्षांनी सावत्र आई आली. सावत्र आईशी प्रेमचंदांचे संबंध फारसे चांगले नव्हते. त्यांच्या वाङ्मयात सावत्र आईच्या छळाचे उल्लेख अनेकदा आले आहेत. प्रेमचंदांचा विवाह पंधराव्या वर्षी झाला. त्यांचे वडील त्याच वर्षी वारले. प्रेमचंदांवर सावत्र आई व पत्नी यांची जबाबदारी पडली. प्रेमचंदांची पत्नी कुरूप व भांडखोरही होती. प्रेमचंदांना या विवाहापासून खूपच मानसिक यातना झाल्या. प्रेमचंद शिकवण्या करून शिकू लागले. त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त कादंबऱ्या वाचण्याची खूप आवड होती. तिलस्म-इ-होशरुबा या अद्भूतरम्य ग्रंथाची पारायणे त्यांनी केली. उर्दू लेखक पंडित रतननाथ ‘सरशार’, मिर्झा मुहंमद ‘रुसवा’, मौलाना अब्दुल हलीम ‘शरर’ इ. लेखकांचे साहित्य त्यांनी वाचले. रेनल्ड्झच्या कादंबऱ्याही त्यांनी आवडीने वाचल्या. आरंभी आठ वर्षे त्यांनी फार्सी शिक्षण घेतले. नंतर इंग्रजी शिक्षण घेऊन ते १८९७ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाले. १८९९ मध्ये ते शिक्षक झाले. १९०० मध्ये त्यांना बराइच येथे सरकारी शाळेत सहायक शिक्षकाची नोकरी मिळाली. १९१० मध्ये ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. गणिताच्या अडसरामुळे त्यांना बी. ए. व्हायला १९१९ साल उजाडावे लागले. गोरखपूर, कानपूर, बनारस, बस्ती इ. ठिकाणी शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते मुख्याध्यापकही झाले आणि पुढे शाळा उपनिरीक्षकाच्या हुद्यापर्यंत चढत गेले. स्वाभिमानामुळे सरकारी नोकरीत त्यांचे वरिष्ठांशी खटके उडत व लेखनावर बंधनेही येत. म. गांधींच्या प्रभावामुळे त्यांनी १९२१ मध्ये ही नोकरी सोडून दिली. यापूर्वी १९०५ मध्ये पहिल्या पत्नीशी न पटल्यामुळे त्यांनी तिला कायमचे सोडून दिले आणि शिवरानी देवी या तरुण विधवेशी त्यांनी दुसरा विवाह केला. हा दुसरा विवाह त्यांना अतिशय सुखाचा ठरला. त्यांच्या पुत्रांपैकी अमृतराय हे मोठे हिंदी लेखक झाले व श्रीपतराय यांनी प्रकाशनाचा व्यवसाय उत्तम प्रकारे केला. श्रीपतराय यांनी नई कहानी नावाचे एक उत्तम मासिकही चालवले आहे. प्रेमचंदांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांनी आपल्या सावत्र बंधूंसाठी एक लहानसा छापखाना विकत घेतला होता, तथापि त्यात त्यांना खूपच तोटा सहन करावा लागला. मर्यादा, माधुरी, हंस, जागरण या नियतकालिकांचे त्यांनी अधूनमधून संपादनही केले. जमाना, चंद या पत्रांत त्यांनी नियमितपणे लेखन केले. हंसपत्रिका त्यांनी शेवटपर्यंत जिद्दीने चालवली. आर्थिक ताण कमी करण्यासाठी पटकथालेखक म्हणून ते १९३४ मध्ये अजंता सिनेटोनच्या निमंत्रणावरून काही काळ मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आले पण तेथील बाजारू वातावरणाशी त्यांचे जमले नाही व फारसा आर्थिक लाभ न होताच ते वर्षाच्या आतच लमहीला परत गेले. गरीब मजदूर या चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिकाही केली होती. प्रेमचंदांना उदरविकार होता. आर्थिक हलाखी व अतिशय परिश्रम यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली. प्रकृती चांगली नसतानाही त्यांनी लेखक या नात्याने भारतभर प्रवास केला. १९३५ मध्ये लखनौ येथे भरलेल्या ‘प्रगतिशील लेखक संघा’च्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी अतिसार व जलोदराने त्यांचे बनारस येथे निधन झाले. मृत्युशय्येवर असतानाही त्यांनी हंससाठी जामीन भरण्याची व्यवस्था केली.
प्रेमचंदांच्या साहित्यिक जीवनास १९०१ मध्ये प्रारंभ झाला. आरंभी ते उर्दूमध्ये व नंतर हिंदीत लिहू लागले. त्यांनी हिंदी व उर्दू या दोन्ही कथासाहित्यांस नव्या दिशा दिल्या. त्यांची पहिली कादंबरी असरारे मआविद (देवालयाचे रहस्य) ही आवाजे खल्क नावाच्या बनारसच्या उर्दू साप्ताहिकातून १९०३ ते १९०५ पर्यंत क्रमशः प्रसिद्ध झाली. काहीशा अतिरंजित शैलीत त्यांनी देवालयाचे पुजारी व महंतांच्या कृष्णकृत्यांचे तीत उपरोधात्मक पद्धतीने चित्रण केले आहे. त्यांची नंतरची मूळ उर्दू कादंबरी हमखुर्मा-ए-हमशबाब हिंदीत १९०७ साली प्रेमा नावाने प्रकाशित झाली. एक आणखी कादंबरी किश्ना १९०७ मध्ये प्रकाशित झाली. ती सध्या उपलब्ध नाही. या काळात त्यांच्या अनेक कथाही प्रकाशित झाल्या होत्या आणि हिंदी व उर्दूत लेखक म्हणून ते प्रतिष्ठित झाले होते.
प्रेमचंदांनी सु. पंधरा कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत सेवासदन (१९१८), प्रेमाश्रम (१९२२), रंगभूमि (१९२४), निर्मला (१९२७), कायाकल्प (१९२८), गबन (१९३०), कर्मभूमि (१९३२), गोदान (१९३६) या कादंबऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रेमचंदांनी सु. ३०० कथा लिहिल्याचे सांगण्यात येते. त्यांचे पुत्र अमृतराय यांनी प्रेमचंदांचे जे चरित्र (प्रेमचंद : कलम के सिपाही) लिहिले आहे, त्यात २२४ कथांचाच उल्लेख आहे. त्यांच्या कथांचे सु. २४ संग्रह प्रसिद्ध झाले व पुढे त्यांच्या बहुतेक सर्व कथा मानसरोवर नावाने आठ भागांत प्रसिद्ध झाल्या (१९६०). प्रेमचंदांच्या कथांचे संपादित संग्रहही अनेक निघाले. त्यांच्या गाजलेल्या कथाकादंबऱ्याचे अनेक आधुनिक भारतीय भाषांमध्ये व काही यूरोपीय भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. प्रेमचंदांनी संग्राम, कर्बला, प्रेमकी वेदी नावाची तीन नाटके लिहिली. काही चरित्रेही लिहिली. वाङ्मयीन व अन्य विषयांवर निबंध लिहिले. टॉलस्टॉयच्या व इतरांच्या कथांचे, गॉल्झवर्दी व शॉच्या काही नाटकांचे त्यांनी हिंदीत अनुवाद केले. काही बालसाहित्यही त्यांनी लिहिले. तथापि हिंदी साहित्यात प्रेमचंदांचे महनीय कार्य कादंबरी व कथा या क्षेत्रांतच मानले जाते व ‘उपन्यास -सम्राट’ म्हणून त्यांना गौरविले जाते.
प्रेमचंदांनी ज्यावेळी साहित्यक्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी हिंदी तसेच उर्दू साहित्यही अदभूत, रहस्यमय, जादूटोण्यांच्या कथासाहित्याने गजबजलेले होते. अशा प्रकारच्या कथा-कादंबऱ्यांना हिंदीत ‘तिलस्मी ऐयारी’ कथासाहित्य म्हणतात. शिवाय रहस्यकथांचेही भरघोस पीक आले होते. सामाजिक विषयांवर लिहिलेल्या बोधवादी कादंबऱ्या अर्थातच नीरस होत्या. प्रेमचंदांची सेवासदन कादंबरी प्रसिद्ध झाली आणि हिंदीमध्ये वास्तववादी पण कलात्मक कथावाङ्मयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सेवासदन कादंबरीत मध्यमवर्गीय स्त्रीच्या जीवनातील जटिल वैवाहिक समस्या प्रेमचंदांनी हाताळली आहे. सुमन नावाच्या शीलवती व सद्गुणी स्त्रीचे केवळ आर्थिक परिस्थितीच्या भीषणतेमुळे एका वयस्क बिजवराबरोबर लग्न होते आणि अपमानित झाल्यामुळे ती पुढे वेश्या बनते. नंतर तिचा उद्धार होतो. या कथानकामधून अनुषंगाने प्रेमचंदांनी मध्यमवर्गाच्या मानसिक आणि सामाजिक स्थितीचे मोठे प्रभावी चित्रण केले आहे. प्रेमाश्रम कादंबरीत शेतकरी व जमीनदार वर्गाच्या परस्परसंबंधांचा वास्तववादी भूमिकेवरून वेध घेतला आहे. या कादंबरीवर महात्मा गांधींच्या आदर्शवादी विचारांचा प्रभाव असून कादंबरीच्या अखेरीस शेतकरी व जमीनदारांच्या सहजीवनाचे आदर्श चित्र उभे केले आहे. प्रेमचंदांची रंगभूमि कादंबरी एक महान कृती समजली जाते. सूरदास नावाचा एक आंधळा भिकारी या कादंबरीचा नायक. याचा वडिलार्जित जमिनीचा तुकडा जानसेवक नावाचा एक कारखानदार सिगारेटचा कारखाना काढण्यासाठी बळकावू पाहतो. सूरदास त्याच्याबरोबर सत्याग्रही पद्धतीने अयशस्वी लढा देतो. भारतातील कृषिसंस्कृतीवर भांडवलदारी संस्कृतीच्या होणाऱ्या आक्रमणाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक, नैतिक आणि सामाजिक प्रश्नांचा कलात्मक आलेख तीत प्रेमचंदांनी काढला आहे. तीत सर्व धर्मांची पात्रे आहेत सर्व थरांतील माणसे आहेत. राष्ट्रीय जीवनात होणाऱ्या प्रचंड घडामोडींची स्पंदने या कादंबरीतून जाणवतात. कायाकल्प कादंबरीत ‘धन की दुष्मनी’ हे सूत्र केंद्रवर्ती असून विलास व भोग यांमुळे उच्च जीवनमूल्ये कशी नष्ट होतात, याचे चित्रण केलेले आहे. धार्मिक दंगली, श्रमिकांची पिळवणूक व त्यांच्यातील जागृती, संस्थानिकांची परिस्थिती व देशातील एकूण राजकीय स्थिती यांचे वर्णनही कादंबरीत येते. तथापि जन्म-पुनर्जन्माच्या अद्भुततेमुळे ही कादंबरी काहीशी डागळली आहे, असे वाटते. चंद नावाच्या स्त्रियांच्या मासिकात क्रमशः प्रसिद्ध होऊन अतिशय लोकप्रिय झालेली प्रेमचंदांची निर्मला कादंबरी मध्यमवर्गीय स्त्रीच्या सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या वैवाहिक समस्यांचे चित्रण करते. यातील मानवी मनाचा वेध घेण्याचे प्रेमचंदांचे कसब उल्लेखनीय आहे.
प्रेमचंदांची गबन कादंबरी मध्यमवर्गीय माणसाच्या स्वभावाचे उत्कृष्ट चित्रण करणारी आहे. पोलीस खात्याच्या कचाट्यात सापडलेल्या एका दुर्बल माणसाचा निर्दयपणे कसा उपयोग करून घेतला जातो, याचे मोठे प्रभावी चित्रण या कादंबरीच्या उत्तरार्धात केले असून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेल्या सामान्य जनांचेही तीत मोठे मार्मिक चित्रण आले आहे. त्यांची कर्मभूमि सर्वच दृष्टीने राजकीय कादंबरी आहे असे म्हणता येईल. तत्कालीन राजकीय वातावरणाचे गहिरे पडसाद या कादंबरीत उमटले आहेत. खेड्यांत व शहरांत चाललेल्या चळवळींचे जिवंत चित्रण व कलात्मक व्यक्तिचित्रण ही या कादंबरीची वैशिष्ट्ये होत. गोदान कादंबरी म्हणजे प्रेमचंदांची अमर कृती. भारतीय कृषक जीवनाचे महाकाव्य म्हणून ती गौरविली जाते. खरे तर हे आंशिक सत्य आहे कारण गोदानमध्ये कृषकांबरोबर जमीनदार वर्ग, मध्यमवर्ग, महाजन वर्ग व उद्योगपतींचा वर्ग या सर्वांचे बारकाव्यांनिशी चित्रण केलेले आहे. त्यांची शेवटची कादंबरी मंगळसूत्र मात्र अपुरी राहिली.
प्रेमचंदांच्या कथांपैकी ‘बडे घरकी बेटी’, ‘पंच परमेश्वर’, ‘बडे भाई साहब’, ‘गुल्लीडंडा’, ‘नशा’, ‘ठाकूर का कुआँ’, ‘सवासेर गेहूँ’, ‘सुजान भगत’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘पूस की रात’, ‘कफन’, ‘ईदगाह’ या कथा श्रेष्ठ दर्जाच्या मानल्या जातात. आपल्या कथांतून त्यांनी ग्रामीण व नागर अशा दोन्ही प्रकारच्या जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांची दृष्टी मनुष्याचे मनोभाव व्यक्त करताना त्याचे पूर्ण चरित्र रेखांकित करण्याकडे होती. त्यांचा माणूस आपल्या मातीशी, परंपरांशी व संस्कृतीशी घट्टपणे जखडून गेलेला आहे. म्हणूनच तो विलक्षण जिवंत वाटतो. प्रेमचंदांच्या कथावाङ्मयाची कक्षा अतिशय विस्तृत असून मानवी मनाचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म व सखोल आहे. हिंदी कथावाङ्मयात ‘प्रेमचंद स्कूल’ असा संप्रदाय निर्माण झाला असून अनेक वास्तववादी व समाजोन्मुख लेखक त्यांच्याशी मोठ्या अभिमानाने आपले नाते सांगतात.
प्रेमचंदांचा साहित्यविषयक दृष्टिकोन उद्देश्यवादी (ध्येयवादी) होता. साहित्याचे ध्येय मनोरंजन हे नसून जीवनाचे दर्शन घडविणे व लोकांच्या सदभिरुचीचे पोषण करीत त्यांची मांगल्यावरची श्रद्धा वाढत जाईल अशा तऱ्हेचे संस्कार करणे हे आहे, असे त्यांचे मत होते. जीवनातील विषण्णता, विसंगती, अव्यवस्था, शोषण, फसवणूक यांचे वास्तववादी चित्रण करून जनतेला संघर्षासाठी मानसिक दृष्ट्या तयार करण्याचे महत्वाचे कार्य लेखकाने केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
प्रेमचंद अत्यंत जागरूक लेखक होते. त्यांचा महनीय गुण म्हणजे व्यापक सर्वस्पर्शी सहानुभूती हा होय. भिकाऱ्यांपासून राजामहाराजांपर्यंत, शेतकऱ्यांपासून मोठ्या जमीनदारांपर्यंत, अशिक्षित स्त्रियांपासून उच्च विद्याविभूषित स्त्रियांपर्यंत, बालकांपासून वृद्धांपर्यंत अशी सर्व प्रकारची पात्रे प्रेमचंदांनी कलात्मक सहानुभूतीने चित्रित केली आहेत. सुधारणावाद, गांधीवाद, समाजवाद इ. विचारसरणींचा त्यांच्या लेखनावर क्रमशः प्रभाव पडत गेला पण कोणत्याही एकाच विचारसरणीच्या शृंखलेने ते बद्ध झाले नाहीत. तथापि प्रारंभापासून शेवटपर्यंत ते जहाल राष्ट्रवादी होते. भारतातील विविध जातींच्या, धर्मांच्या, वर्गांच्या समस्यात्मक जीवनाचे चित्रण प्रेमचंदांनी ताकदीने केले. पीडित, दलित व उपेक्षित सामान्य जनतेच्या हितसंबंधांचा त्यांनी विशेष कळकळीने विचार केला. या अर्थाने ते जनवादी लेखक होते. भारतीय समाजात कुटुंबव्यवस्थेला फार महत्त्व आहे. प्रेमचंदांच्या वाङ्मयात कुटुंबव्यवस्थेची वेगवेगळी रूपे आढळतात. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी सार्थपणे म्हटले आहे, की उत्तर भारतीय माणूस कसा असतो हे समजून घ्यावयाचे असेल. तर प्रेमचंदांच्या साहित्यासारखा दुसरा साथी नाही.
प्रेमचंदांच्या कादंबऱ्या आकाराने मोठ्या आहेत व तांत्रिक दृष्ट्या त्यांत अनेक दोषही काढले जातात पण त्यांच्या समग्र कथा-कादंबरी- साहित्यात कमालीचा जिवंतपणा आहे, मानवाविषयी उदंड कळकळ आहे आणि सर्वसमावेशकताही आहे.
त्यांच्या काही कथा-कादंबऱ्यांवर गरीब मजदूर, हीरा मोती, सेवासदन, गबन, शतरंज के खिलाडी इ. चित्रपटही निघाले आहेत.
हिंदी साहित्याला प्रेमचंदांनी अनेक प्रकारे संपन्न केले. समृद्ध गद्यभाषा ही त्यांची हिंदी साहित्याला मिळालेली एक महत्त्वाची देणगी होय. त्यांनी वास्तवाची जी वाट साहित्याला दाखवून दिली, ती इतकी अचूक होती, की आजही हिंदी कथासाहित्य त्या वाटेवरून वाटचाल करीत समृद्ध होत असल्याचे दिसते. आंधळा भिकारी व अकिंचन शेतकरी यांना नायकत्व बहाल करून साहित्यातील अनेक प्रतिष्ठित संकेतांवर त्यांनी आघात केले. भारतीय संस्कृतीतील मूल्यांचा समयोचित स्वीकार करून त्यांनी महान लेखकाची जबाबदारी पार पाडली. हिंदी व उर्दू साहित्यात त्यांचे स्थान चिरंतन महत्त्वाचे आहे. ३१ जुलै १९८० रोजी त्यांची जन्मशताब्दी भारतभर मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. त्यानिमित्ताने भारत सरकारने त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीटही काढले.
संदर्भ : 1. Gupta, Prakash Chandra, Prem Chand, New Delhi, 1968.
2. Madan Gopal, Munshi Premchand : A Literary Biography, Bombay, 1964.
3. अमृतराय, प्रेमचंद: कलम के सिपाही, अलाहाबाद, १९६२.
4. गुप्त, रामदीन, प्रेमचंद और गांधीवाद, दिल्ली, १९६१.
5. गुरू, राजेश्वर, प्रेमचंद : एक अध्ययन, भोपाळ, १९५८.
6. भटनागर, महेंद्र, समस्यामूलक उपन्यासकार प्रेमचंद, बनारस, १९६२.
7. भारती, धर्मवीर, संपा. धर्मयुग : प्रेमचंद जन्मशताब्दी अंक (साप्ताहिक, ३ ऑगस्ट), मुंबई, १९८०.
8. शिवरानी देवी प्रेमचंद, प्रेमचंद : घर में, दिल्ली, १९५६.
9. साधले, नलिनी, संपा. पंचधारा : मुन्शी प्रेमचंद विशेषांक (एप्रिल, मे, जून), हैदराबाद, १९८०.
10. हंसराज ‘रहवर’ , प्रेमचंद : जीवन ओर कृतित्व, दिल्ली, १९५१.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“