जगनिक : (बारावे शतक). हिंदीतील आल्हखंड ह्या प्राचीन लोकमहाकाव्याचा कर्ता म्हणून जगनिक ओळखला जातो. त्याच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ११७३ च्या सुमारास तो हयात होता असे विद्वान मानतात. महोबाचे राजे परमार (परमर्दी देव) यांच्या दरबारात तो भाट होता, असे म्हणतात. आल्हखंड हे भाटांच्या मौखिक परंपरेने चालत आलेले वीरकाव्य आहे. म्हणूनच ते हस्तलिखित प्रतीच्या स्वरूपात उपलब्ध नाही. महोबाचे दोन वीरनायक आल्हा आणि उदल हे भाऊ भाऊ. त्यांच्या अलौकिक पराक्रमी जीवनाची गाथा विस्तृतपणे त्यात वर्णिली आहे. त्यात या बंधूंनी केलेल्या बावन्न लढायांचे सविस्तर वर्णन आलेले आहे. साहित्यात हे काव्य आल्हखंड नावाने प्रसिद्ध असले, तरी जनमानसात मात्र ते आल्हा ह्या नावानेच विशेष ओळखले जाते. प्रस्तुत काव्य गेय असून वीररसाने ओतप्रोत भरलेले असल्यामुळे, उत्तर भारतातील आबालवृद्धांच्या जिभेवर ते आजही टिकून आहे. म्हणूनच जगनिक हा खऱ्याखुऱ्या अर्थाने लोककवी होता, असे म्हणावयास हरकत नाही. या काव्याची लोकप्रियता तुलसीदासांच्या रामचरितमानसाच्या खालोखाल आहे.
जगनिक कवीचा मूळ ग्रंथ बराच मोठा असावा, असे ग्रंथनामावरून वाटते. मूळ ग्रंथाचा आल्हखंड हा केवळ एक भाग (खंड) असावा. मौखिक परंपरेने हे काव्य चालत आल्यामुळे त्यात देशकालपरिस्थित्यनुसार अनेक बदल झाले असणे शक्य आहे. आल्हखंडाचे पृथ्वीराज रासोतील ‘महोबा खंडात’ आलेल्या कथेशी काही अंशी साम्य असले, तरी तो एक स्वतंत्र व जनमानसाची पकड घेणारा काव्यग्रंथ आहे.
‘आल्ह’ गाणाऱ्या अनेक भाटांच्या मदतीने १८६५ मध्ये फरूखाबाद येथील इंग्रज जिल्हाधिकारी सर चार्ल्स एलियट याने आल्हखंड हा ग्रंथ लिपिबद्ध केला. सर जॉर्ज ग्रीअर्सनने बिहारमध्ये तसेच व्हिन्सेंट स्मिथने बुंदेलखंडात आल्हखंडाचा काही भाग संकलित केला होता. डब्ल्यू. वॉटरफील्डने केलेला त्याच्या काही भागाचा इंग्रजी अनुवाद कलकत्ता रिव्हयूमध्ये ‘द नाइन लॅक चेन’ वा ‘द मेरी फ्यूड’ नावाने प्रसिद्ध झाला (१८७५–७६). हे लोककाव्य असल्यामुळे हिंदी भाषेतील बोलींच्या विविधतेनुसार त्याचे विविध पाठ आढळतात (उदा., खडीबोली, मगही, कनौजी, भोजपुरी, बुंदेली, अवधी इत्यादी) तथापि त्यांतील मगही-पाठ प्रमुख मानला जातो. संपूर्ण आल्हखंडाची रचना वीरछंदात आहे. म्हणूनच आज वीरछंद ‘आल्हखंड’ ह्या नावाने ओळखला जातो.
संदर्भ :
१. तिवारी, उदयनारायण, वीरकाव्य, अलाहाबाद, १९४८.
२. मिश्र, बलदेवप्रसाद, संपा. आल्हखंड, मुंबई, १९१४.
बांदिवडेकर, चंद्रकांत