प्रेबिश, रॉउल : (१७ एप्रिल १९०१ – ). जागतिक कीर्तीचे अर्जेंटिनी अर्थशास्त्रज्ञ. जन्म तूकूमान येथे. ब्वेनस एअरीझ विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी त्याच विद्यापीठात १९२५-४८ पर्यंत अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. याच काळात लॅटिन अमेरिकेतील अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थांसंबंधी त्यांनी संशोधन व सखोल चिंतन केले. अध्यापनकार्याबरोबरच त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

प्रेबिश यांनी मांडलेला मूलभूत सिद्धांत म्हणजे प्राथमिक माल उत्पादक देशांच्या व्यापारदरांत सातत्याने होणाऱ्या ऱ्हासाचा सिद्धांत (थिअरी ऑफ सेक्युलर डिटीरिओरेशन ऑफ द टर्म्स ऑफ ट्रेड ऑफ द प्रायमरी प्रोड्यूसिंग कंट्रीज) हा होय. यालाच ‘प्रेबिश सिद्धांत’ असे म्हणतात. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता येईल : इतिहासाच्या प्रवाहात सर्वच राष्ट्रांची आर्थिक प्रगती एकाच वेळी व एकसारखी झालेली आढळत नाही. इंग्लंड, अमेरिका यांसारखी राष्ट्रे औद्योगिक क्रांतीच्या मार्गाने पुढे गेली, तर जगातील अनेक राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या मागासच राहिली. लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया या खंडांतील बहुतांश राष्ट्रे ही औद्योगिक क्रांतीला पारखी त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या अविकसितच राहिली. सतत प्रगतिपथावर असणाऱ्या औद्योगिक राष्ट्रांचा एक गट आणि अन्नधान्ये व कच्चा माल पुरविणाऱ्या त्याचप्रमाणे पक्का माल , यंत्रसामग्री इत्यादींसाठी औद्योगिक राष्ट्रांवर निर्भर असणाऱ्या अविकसित राष्ट्रांचा फार मोठा गट असे जागतिक अर्थव्यवस्थेत दोन भिन्न गट आहेत. एकूण व्यवस्थेतील पहिल्या गटाला केंद्र व दुसऱ्या गटाला परिघावरील राष्ट्रे अशा अतिशय अन्वर्थक संज्ञांचा प्रेबिश यांनी वापर केला आहे. ही केंद्र-परिघ रचना प्रायः पुढील कारणांमुळे अप्रतिहत चालू राहिली आहे : औद्योगिक क्षेत्रात प्राथमिक (शेती वगैरे) क्षेत्रापेक्षा तांत्रिक प्रगती सातत्याने होत असते. तांत्रिक प्रगतीमुळे होणाऱ्या उत्पादकतेतील वाढीमुळे वस्तुतः औद्योगिक मालाच्या किंमती प्राथमिक मालाच्या किंमतीच्या तुलनेने कमी होत गेल्या पाहिजेत. म्हणजे औद्योगिक व प्राथमिक मालाच्या किंमतींतील संबंध प्राथमिक उत्पादनप्रधान (विकसनशील) देशांना उपकारक ठरला पाहिजे. परंतु प्रेबिश यांच्या मते याउलट घडून येते. १८७० ते १९५० पर्यंतच्या दीर्घ कालावधीचा विचार केल्यास असे आढळते की, प्राथमिक मालाच्या किंमती औद्योगिक मालाच्या किंमतींच्या तुलनेने सातत्याने घसरत आहेत. याचाच अर्थ प्राथमिक माल उत्पादक देशांना मिळणारे आंतरराष्ट्रीय व्यापारदर म्हणजेच

निर्यात वस्तू किंमत

हे गुणोत्तर घसरत आहे. प्रेबिश यांच्या मते

आयात वस्तू किंमत

सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत केंद्र-परिघ अशी हानिकारक विभागणी झाल्याने गरीब देशांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार-दरांमध्ये दीर्घकालीन घसरण दिसून येते. प्रेबिश यांच्या मते सध्याच्या असमान जागतिक अर्थव्यवस्थेत व्यापारदरांची वरील प्रकारची होणारी घसरण अशीच पुढे चालू राहण्याची भीती पुढील कारणांच्या योगे संभवते : औद्योगिक देशांत (केंद्र देशांत) उत्पादकतेतील वाढावा त्या देशातील वाढीव नफा व वाढीव वेतने यांच्या रूपाने वाटला जातो तर अविकसित देशांत (परिघस्थित देशांत) उत्पादकतेतील वाढीचा परिणाम वस्तूंच्या किंमती कमी करण्यात होतो. याचा खरा फायदा प्राथमिक उत्पादनांची आयात करणाऱ्या विकसित देशांनाच मिळतो. याचाच अर्थ असा की, तांत्रिक प्रगतीमधून होणाऱ्या उत्पादनवाढीचा परिणाम सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत अविकसित राष्ट्रांना अनुपकारकच ठरतो. त्याचप्रमाणे भांडवलशाहीप्रधान जागतिक अर्थव्यवस्थेतील अटळ अशा तेजीमंदीच्या चक्रामुळे प्राथमिक माल उत्पादक गरीब देशांचेच नुकसान अधिक होते. याशिवाय प्राथमिक मालाला असलेली जागतिक बाजारपेठेतील मागणी बरीचशी किंमत व उत्पन्न यांच्या संदर्भात अलवचिक असल्याने याचाही विपरीत परिणाम गरीब देशांनाच भोगावा लागतो.

जागतिक अर्थव्यवस्थेतील दोन गटांमधील ही दरी अविकसित राष्ट्रांनी जाणीवपूर्वक उपाय योजल्याशिवाय केवळ नैसर्गिक रीत्या बुजली जाणार नाही उलट ती अधिकच रुंदावत जाण्याची भीती प्रेबिश यांनी व्यक्त केली आहे. अविकसित देशांनी औद्योगिकीकरणाची कास धरल्याशिवाय त्यांना तरणोपाय नाही त्याचप्रमाणे त्यांना प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने उत्पन्नपातळी गाठावयाची असल्यास त्यांनी आयात पर्यायी (इंपोर्ट सब्स्टिट्यूशन) औद्योगिकीकरण हाती घेतले पाहिजे, असे प्रेबिश आग्रहाने प्रतिपादितात. प्रेबिश यांचे मूलभूत विचार व सिद्धांत (१) द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ लॅटिन अमेरिका अँड इट्स प्रिन्सिपल प्रॉब्लेम्स, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, यूनो, १९५० व (२) कमर्शियल पॉलिसी इन अँडरडेव्हलप्ड कंट्रीज, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, XLIV, १९५९ या दोन प्रबंधांतून पहावयास मिळतात.

लॅटिन अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञांच्या नव्या पिढीनेही प्रेबिश यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या देशांतील अर्थनीतीवर खूपच प्रभाव पाडलेला आहे. प्रेबिश यांच्या प्रेरणेने यूरोपीय सामायिक बाजारपेठेच्या धर्तीवर लॅटिन अमेरिकेतील देशांनी आपला मुक्त व्यापारगट (लॅफ्टा) स्थापन केला आहे. लॅटिन अमेरिकेसाठी संयुक्त राष्ट्रांनी नेमलेल्या ‘इकॉनॉमिक कमिशन फॉर लॅटिन अमेरिका’ (‘एक्‌ला’ १९४८) या आयोगाचे प्रेबिश १९५० ते १९६३ पर्यंत महासचिव होते. व्यापार व विकास यांसंबंधी विचारविनिमय करून विकसित आणि अविकसित राष्ट्रांमधील वाढती आर्थिक दरी कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी स्थापिलेल्या ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट’ – ‘उंक्टाड’ – या महत्त्वाच्या संस्थेतेही ते काही वर्षे महासचिव होते (१९६४ – ६९). त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून लिहिलेल्या अहवालांमधून अर्थशास्त्रज्ञांना, विशेषतः अविकसित देशांतील धोरणकर्त्यांना, बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.

प्रेबिश यांना चिली विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विद्याशाखेचे सन्मान्य सदस्यत्व मिळाले असून (१९५६) कोलंबिया, चंडीगढ, लॉस अँडीस, माँटेव्हिडिओ, यूरग्वाय इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या बहाल करून गौरविले आहे. १९७४ मध्ये ‘जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्या’ चा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

बापट, भ. ग.