प्रूस्त, झोझेफ ल्वी : (२६ सप्टेंबर १७५४ – ५ जुलै १८२६). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक संयुगांच्या निश्चित प्रमाणाच्या तत्त्वाच्या प्रायोगिक सिद्धतेच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म अँजर्झ (फ्रान्स) येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वडिलांच्या हाताखाली त्यांनी औषधांचा अभ्यास केला व त्यात त्यांनी प्रावीण्य मिळविले. १७७४ च्या सुमारास पुढील अभ्यासासाठी ते पॅरिस येथे गेले. तेथे त्यांनी हिलारे-मार्टिन रौले यांच्या हाताखाली रसायनशास्त्राचा व औषधिशास्त्राचा अभ्यास केला. पॅरिस येथील एका दवाखान्यात औषध विभागाचे प्रमुख म्हणून १७७६ पासून ते काम करू लागले. तेथे असतानाच त्यांनी पहिला शास्त्रीय निबंध प्रसिद्ध केला. फ्रान्सच्या राजवाड्यामध्ये त्यांनी रसायनशास्त्र शिकविले. १७७८ मध्ये ते स्पेनला गेले व बेर्गारा येथील संस्थेत रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तेथे ते १७८० पर्यंत होते. त्यानंतर ते फ्रान्समधील जे. एफ्. पिलात्र द रोझ्ये यांच्या संग्रहालयात १७८४ पर्यंत रसायनशास्त्र शिकवीत होते. या काळात त्यांनी पिलात्र व झाक शार्ल यांच्याबरोबर वायुस्थितिकीविषयक (वायू व त्यात बुडालेले घन पदार्थ यांच्यातील फक्त नैसर्गिक गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखालील समतोलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राविषयी) प्रयोग केले. व्हर्साय येथे जून १७८४ मध्ये त्यांनी स्वीडन व फ्रान्सचे राजे यांच्यासमोर फुग्याच्या (बलूनच्या) साहाय्याने हवेत वर जाण्याचा प्रयोग केला. स्पेन सरकारच्या विनंतीनुसार ते १७८६ मध्ये स्पेनला गेले. प्रथम त्यांनी माद्रिद येथे रॉयल लॅबोरेटरीत व १७८८ नंतर सिगोव्हीया येथील ॲकॅडेमी ऑफ आर्टिलरीत रसायनशास्त्र शिकविले. तेथे असताना त्यांनी भूवैज्ञानिक व खनिजवैज्ञानिक सर्वेक्षण व संशोधनही केले. १७९९ मध्ये ते माद्रिद येथे परत आले व तेथील नवीन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून काम करू लागले. सिगोव्हीया येथे असताना संयुगांच्या निश्चित प्रमाणाच्या तत्त्वावरील निबंध प्रसिद्ध केला. ‘एखादे संयुग कसेही व कोणत्याही पद्धतीने तयार केले, तरी त्या संयुगाच्या घटकांच्या प्रमाणात बदल होत नाही’, असा त्यांचा प्रायोगिक निष्कर्ष होता. त्यांनी लोखंड, जस्त, शिसे, तांबे, अँटिमनी, निकेल व कोबाल्ट या धातूंची दोन प्रकारची ऑक्साइडे आहेत, हे सिद्ध केले व त्यांची अशाच प्रकारची दोन तऱ्हेची लवणे असावीत, असा विचार मांडला.

यांशिवाय त्यांनी हायड्रोजन सल्फाइडाचा रासायनिक विश्लेषणात विक्रियाकारक म्हणून उपयोग केला. परिमाणात्मक विश्लेषणाचे निष्कर्ष टक्केवारी वजनात देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. १७९९ मध्ये त्यांनी द्राक्षांतून ग्लुकोज वेगळे केले व त्याचे महोत्पादन करता येईल, असे प्रतिपादन केले. १८१० मध्ये नेपोलियन सरकारने ग्लुकोजाच्या निर्मितीच्या कारखान्यासाठी त्यांना १ लाख फ्रॅंक दिले. चीजमध्ये

ल्यूसीन हे ॲमिनो अम्ल असते, असे १८१८ मध्ये त्यांनी दाखवून दिले.

इ. स. १८०६ मध्ये ते स्पेनहून फ्रान्सला परत आले व क्राँ येथे स्थायिक झाले. १८१६ मध्ये ते इन्स्टिट्यूट द फ्रान्सचे प्रमुख झाले व फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सवर त्यांची नेमणूक झाली. १८१७ ला ते अँजर्झ येथे परत आले.१८१९ मध्ये त्यांना ‘लिजन ऑफ ऑनर ’ हा किताब मिळाला. १८२० मध्ये अठराव्या लूई राजांनी त्यांनी निवृत्तिवेतन दिले. ते अँजर्झ येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.