प्रिन्सेप, जेम्स : (२० ऑगस्ट १७९९-२२ एप्रिल १८४०). सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांतील लिपीचा शोध लावणारा प्रसिद्ध ब्रिटिश संशोधक व पुरातत्त्वज्ञ. जन्म इसेंक्स येथे. इंग्लंडमध्ये वास्तुशास्त्रातील शिक्षण घेऊन तो भारतात आला व कलकत्ता येथील टाकसाळीत रुजू झाला (१८१९). पुढे बनारसच्या टाकसाळीत त्याने काम केले (१८२०-३०). १८३१ मध्ये तो कलकत्त्यास परत आला. त्याने भारतीय नाण्यांत सुसूत्रता आणून त्यांच्या वजन-मापात अनेक सुधारणा केल्या. कलकत्त्यास तो बंगालच्या एशिॲटिक सोसायटीचा सचिव झाला (१८३२). त्यामुळे त्यास प्राचीन नाण्यांचा अभ्यास व संशोधन करण्याची संधी लाभली. पुढे त्याच्याकडे बनारस येथील वास्तुप्रकल्प सोपविण्यात आले. वास्तुशास्त्रावर त्याने अनेक लेख लिहिले. बंगालच्या एशिॲटिक सोसायटीच्या नियतकालिकाची सूत्रेही त्याच्या हाती होती. १८३४ ते १८३७ च्या दरम्यान त्याने विलक्षण चिकाटीने प्राचीन कोरीव लेखांचा अभ्यास केला आणि शास्त्रीय अचूकतेने ब्राह्मी व खरोष्ठी या लिप्यांच्या वाचनात यश मिळविले. यामुळे मौर्यकाळातील विशेषतः अशोकाच्या शिलालेखांचे वाचन सुलभ झाले. अशोकाचे लेख वाचून त्याने ‘पियदसी’ म्हणजे अशोक हे सिद्ध केले. त्यामुळे संशोधकांना अभ्यासाचे एक मोठे दालन खुले झाले. साहजिकच प्राचीन भारतीय इतिहासाच्या कालनिश्चितीस यामुळे मदत झाली. या काळातच त्याने सारनाथ येथे प्रथम उत्खननास सुरुवात केली आणि तेथील प्राचीन अवशेष उजेडात आणले. त्याचे पुरातत्त्वीय समन्वेषण अचूक असे. वास्तुशास्त्र अथवा नाणकशास्त्रातील त्याच्या कामगिरीपेक्षा लिपिशास्त्रातील त्याची कामगिरी अपूर्व आहे. त्याने लिहिलेले लेख इ. टॉमस याने संपादित करून एसेज ऑन इंडियन अँटिक्विटीज-हिस्टॉरिक, न्यूमिझ्‌मॅटिक अँड पॅलोग्राफिक या शीर्षकाने दोन खंडांत प्रसिद्ध केले आहेत (१८५८). तो १८३८ मध्ये प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे इंग्लंडला गेला आणि पुढे दोन वर्षांनी लंडन येथे मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ हुगळी (कलकत्ता) नदीवर घाट बांधण्यात आला आहे.

देव, शां. भा.