प्रॉटेस्टंट : ख्रिस्ती धर्मातील एक पंथ. रोमन कॅथलिक पंथाची काही धर्मतत्त्वे व आचारपद्धती ह्यांच्या विरुद्ध सोळाव्या शतकात झालेल्या धर्मक्रांतीला प्रॉटेस्टंट धर्मचळवळ असे म्हणतात. जर्मनीतील ⇨मार्टिन ल्यूथर (१४८३-१५४६) याचा ह्या चळवळीशी प्रामुख्याने संबंध आहे असे जरी मानले जात असले, तरी त्याच्या अगोदर ऑक्सफर्डचा जॉन विक्लिफ (सु. १३२०-८४) व प्रागचा जॉन हस (सु. १३७१-१४१५) यांनी या दिशेने पावले टाकली होती.

मार्टिन ल्यूथरने १५१७ मध्ये व्हिटन्बेर्क (जर्मनी) येथील चर्चच्या दारावर ९५ मुद्यांचे (थेसिस) पत्रक लावले तेव्हापासून प्रॉटेस्टंट चळवळीला ऐतिहासिक दृष्ट्या सुरुवात झाली, असे समजतात. ह्या चळवळीचे परिणाम मात्र ल्यूथरच्या अपेक्षेबाहेर झाले. ती एक स्वतंत्र व फार दूरवर परिणाम करणारी चळवळ ठरली. ह्या चळवळीमुळे चर्चची शकले होतील, असे ल्यूथरलाही त्यावेळी वाटले नव्हते. कॅथलिक चर्चची काही धर्मतत्त्वे व आचारपद्धती ह्यांच्यात सुधारणा व्हावी एवढीच ल्यूथरची मर्यादित अपेक्षा होती परंतु विक्लिफ आणि हस ह्या विचारवंतांनी तयार केलेल्या वैचारिक भूमिकेमुळे ल्यूथरच्या विरोधाला (प्रोटेस्ट) जागतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. हे बंड नव्हते सुधारणेची चळवळ होती, तरी तिचा परिणाम क्रांतीसारखा झाला. कारण तिच्यामुळे केवळ ख्रिस्ती धर्मातील चर्चव्यवस्थाच बदलली असे नाही, तर एक वैचारिक नवचैतन्य निर्माण झाले. ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन त्यामुळे पुरोगामी बनला. बायबलची अनेक भाषांतून भाषांतरे झाली. बायबलमधील वचनांचा व घटनांचा अर्थ आणि स्पष्टीकरण देणे फक्त चर्चलाच म्हणजे पर्यायाने रोमच्या पोपलाच शक्य आहे असे नाही, तर पवित्र आत्मा (होली स्पिरिट) हे आंतरिक ज्ञान (इनसाइट) इतर व्यक्तींनाही देऊ शकतो व इतर व्यक्तींनाही बायबलमधील वचनांचा व घटनांचा अर्थ विशद करता येतो, असे मानण्यात येऊ लागले. शिक्षणसंस्थांवर व सामाजिक रचनेवर त्याचा झपाट्याने परिणाम होऊ लागला. चळवळीच्या रूपाने जागतिक चर्चमध्ये शिरकाव करून घेऊन वैचारिक व आध्यात्मिक पातळीवर धर्मजागृती करणे, हे प्रॉटेस्टंट चळवळीचे मुख्य कार्य होय. चळवळ इतकी प्रभावी ठरली, की ‘प्रोटेस्ट’ ह्या शब्दाचा ‘प्रतिकार करणे’ हा जो एक नकारात्मक अर्थ आहे तो बाजूला राहून ‘अ सॉलेम डिक्लरेशन ऑफ रेझोलूशन, फॅक्ट ऑर ओपिनियन’, असा अर्थ अठराव्या शतकाच्या मध्यावर रूढ झाला आणि ह्या चळवळीतून वेगळे चर्च म्हणजे पंथच निर्माण झाला. ⇨जॉन कॅल्व्हिन (१५०९-६४), ⇨ हुल्ड्राइख त्स्व्हिरली (१४८४-१५३१) आणि जॉन नॉक्स (१५०५-७२) ह्या पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोळाव्या शतकात प्रॉटेस्टंट चर्चची भक्कम पायावर स्थापना झाली.

अमेरिकन वसाहतकारांमार्फत प्रॉटेस्टंट चर्च उत्तर अमेरिकेतही प्रविष्ट झाले. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या प्रॉटेस्टंट मिशनरी चळवळीच्या जोरावर प्रोटेस्टंट चर्चचा जगभर प्रसार झाला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ह्या चळवळीच्या आधाराने प्रॉटेस्टंट पंथीयांतही अनेक वेगवेगळे पंथ निर्माण व्हायला सुरूवात झाली. ह्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथाच्या प्रेरणेने ⇨ एक्युमेनिकल चळवळ झाली. ह्या चळवळीचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वच चर्चरचना केंद्रित असावी, हा होय. इंग्लंडचे चर्च जरी प्रॉटेस्टंट चळवळीच्या अनुषंगाने अस्तित्वात आले, तरी ते स्वतःला एपिस्कपल चर्च म्हणवते. कारण आठव्या हेन्रीने पोपच्या सत्तेऐवजी इंग्लंडच्या राजाची सत्ता स्थापन केली व रोमन कॅथलिक चर्चच्या काही आक्षेपार्ह आचारपद्धती रद्द केल्या. आज ⇨रोमन कॅथलिक पंथ, ⇨ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च व प्रोटेस्टंट चर्च अशी तीनच सर्वव्यापी ख्रिस्ती चर्चेस म्हणजे पंथ आहेत परंतु त्यांचा धर्म मात्र एकच आहे.

प्रॉटेस्टंट चळवळीला प्रत्युत्तर म्हणून रोमन कॅथलिक चर्चने प्रतिधर्मसुधारणा चळवळ (काउंटर रेफर्मेशन) सुरू केली. १५४५ साली ट्रेंट येथे एक धर्मपरिषद घेण्यात आली. १५४० साली स्थापना झालेल्या ⇨ जेझुइट पंथीयांचे ह्या परिषदेवर वर्चस्व होते. त्यामुळे काही मामुली सुधारणा जरी स्वीकारण्यात आल्या, तरी पोपची सत्ता अधिक बळकट करण्यात आली. कॅथलिक शिकवणीशी तुलना करून प्रॉटेस्टंट पंथाच्या शिकवणीचे सार खालीलप्रमाणे मांडता येईल :

धर्मगुरूही चुका करू शकतो. पापाचे क्षालन पैशाने किंवा तपाने होत नाही, तर ख्रिस्ताने स्वखुषीने केलेल्या आत्मयज्ञामुळे व त्यावरील विश्वासामुळे होते. चर्चची व्यवस्था लोकशाही पद्धतीनुसार असावी धर्मगुरूने जसे इतरांना मार्गदर्शन करावे तसेच इतरांकडूनही मार्गदर्शन स्वीकारावे. येशूची आई मेरी व ख्रिस्ती संत ह्यांची पूजा करू नये. पापक्षालनासाठी देवाच्या दयासनापुढे मानवी मध्यस्थीची गरज नाही. येशू ख्रिस्त म्हणजे चर्चचे मस्तक. विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर पवित्र आत्मा प्रत्यक्ष संबंध ठेवतो. रोमन कॅथलिक चर्चच्या बायबलमध्ये प्रॉटेस्टंट चर्चला मान्य नसलेल्या अपोक्रॅफा नावाच्या पुस्तकाचा समावेश आहे.

पहा : धर्मसुधारणा आंदोलन.

संदर्भ : 1. Dillenberger, John Welch, Claude, Protestant Christianity Interpreted through Its Development, New York, 1954.

2. Whale, J. S. The Protestant Tradition, Cambridge, 1955.

आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला