प्राणिसमूह, वितलीय: जीवांच्या तीन मुख्य वसतिस्थानांपैकी (समुद्र, गोडे पाणी व जमीन) समुद्र हे एक असे वसतिस्थान आहे की, त्यामुळे जीवाला अत्यंत स्थिर असा परिसर मिळतो. समुद्री परिसरामध्ये नितलस्थ (तळावरील) आणि वेलापवर्ती (मध्यम खोलीवरील व पृष्ठीय पाण्यातील) वसतिस्थानांचा समावेश होतो. नितलस्थ परिसराचे वेलांचली (किनाऱ्यालगतचा सु. २०० मी. खोलीपर्यंतचा भाग) आणि वितलीय (खूप खोल) असे आणखी उपविभाग पडतात. वेलापवर्ती वसतिस्थानामध्ये नितलस्थ विभाग झाकणाऱ्या सागरातील सगळ्या पाण्याचा समावेश होतो. वेलापवर्ती परिसराचे क्षितिजाशी समांतर असे मुक्त-सागर अथवा महासागरी प्रदेश आणि तटसमीपस्थ अथवा तटीय प्रदेश असे भाग पडू शकतात.

समुद्राच्या पृष्ठापासून सु. १८० मी. खोलीपर्यंत प्रकाशाचे किरण जाऊ शकतात. हा प्रकाश कार्यक्षम असल्यामुळे या १८० मी. जाडीच्या थरात प्राणी आणि वनस्पती आढळतात. या थराच्या खाली म्हणजे वितलीय प्रदेशात फक्त प्राणीच आढळतात. वनस्पती मुळीच नसतात.

वितलीय प्रदेशाची मुख्य लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : (१) प्रकाशाचा अभाव : प्रकाश नसल्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा मागमूसही आढळत नाही. अर्थातच येथे आढळणारे सगळे प्राणी मांसाहारी असतात अथवा वरच्या थरातून (प्रकाशित थरातून) हळूहळू खाली येणाऱ्या वनस्पतिज पदार्थांवर किंवा इतर निर्जीव जैव पदार्थांवर उपजीविका करतात. या विभागात कमालीचा अंधार असतो. (२) निश्चलता : या प्रदेशात प्राण्याची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही परंतु या प्रदेशाच्या तळाजवळ अतिशय मंद गतीने वाहाणारे पाण्याचे सूक्ष्म प्रवाह चालू असतात आणि त्यांच्यामुळे येथील प्राणिजीवनाला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो. (३) थंडी : तापमान नेहमी ४° से. असते. (४) पाण्याचा दाब : वितलीय प्रदेशातील पाण्याचा दाब प्रचंड असतो आणि खोलीबरोबरच तो प्रत्यक्ष वाढत जातो, प्रत्येक १८० मी. खोलीला दाबाच्या वाढीचे प्रमाण सु. एका चौ. सेंमी.ला १६० किग्रॅ. असते.

वितलीय प्रदेशाच्या तळावर सगळीकडे अतिशय मऊ चिखल किंवा सिंधुजैवपंक (ऊझ) पसरलेला असतो. या चिखलात मुख्यतः ⇨ प्लवकातील प्राण्यांचे व वनस्पतींचे कॅल्शियमी किंवा सिलिकामय कंकाल (सांगाडे) आणि ज्वालामुखीय धूळ (तांबडी माती) आढळते.

वितलीय प्राणिसमूहात वर वर्णन केलेल्या आत्यंतिक परिस्थितीत जिवंत राहू शकणाऱ्या सर्व प्राण्यांचा समावेश होतो. अन्नाचा तुटपुंजा पुरवठा आणि भौतिक परिस्थिती यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींच्या योगाने जातींची संख्या आणि प्रत्येक जातीतील व्यक्तींची संख्या मर्यादित झाली आहे. यामुळे या समूहातील प्राणी विरळ आहेत परंतु अतिशय खोलीवरदेखील त्यांचा अभाव नसतो पण काळ्या समुद्रासारख्या काही मर्यादित क्षेत्रात खोल जागी पाण्याचे प्रवाह नसल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नसल्यामुळे तेथे प्राण्यांचा अभाव असतो.

वितलीय परिसरात समुद्री प्राण्यांचे सगळे गट आढळतात. प्रोटोझोआ (आदिजीव) संघातील रेडिओलॅरिया, हेक्झॅक्टिनेलिडा वर्गातील सिलिकामय स्पंज, सीलेंटेरेटा (आंतरगुही) संघातील फ्लॅबेलमसारखे चषक-प्रवाल आणि पेनॅट्युलिड प्राणी विशेषतः अँबेल्यूलासारखे खोल समुद्रातील प्राणी, येथे आढळून येतात नेमर्टिनिया व ॲनेलिडा (वलयी) या संघांतील प्राण्यांचे प्रमाण फार थोडे असते ॲनेलिडा संघापैकी नळ्यांमधून राहणाऱ्या जातीच फक्त दिसून येतात, क्रस्टेशियांपैकी (कवचधारी प्राण्यांपैकी) काही बार्नेकल आणि अँफिपॉड व आयसोपॉड प्राणी दिसून येतात, तर डेकॅपोडांपैकी सरपटणारे प्राणी व काही ॲनॉम्यूराच्या जाती आढळतात परंतु खरे खेकडे मुळीच नसतात समुद्री कोळी (पिक्नोगोनिडा) आढळतात आणि ते आकारमानाने फार मोठे असतात. मॉलस्कांपैकी (मृदुकाय प्राण्यांपैकी) सेफॅलोपोडा आणि स्कॅफोपोडा मोठ्या प्रमाणात आढळतात. उथळ पाण्यात विपुल असणारे लॅमेलिब्रँकिया आणि गॅस्ट्रोपोडा या प्रदेशात फारच थोडे असून आकारमानाने लहान असतात. पॉलिझोआ या प्रदेशात सगळीकडे असतात. एकायनोडर्माटा संघातील प्राणी, विशेषतः ॲस्टरॉयडिया आणि होलोथूरॉयडिया वर्गांतील, बरेच आढळतात पण सवृंत (लांब देठाने समुद्राच्या तळाला चिकटलेले) क्रिनॉयडिया अतिशय खोल जागीच फक्त आढळतात. ट्यूनिकेट (चोलधारी) प्राण्यांपैकी ॲसिडियनच (जलोद्‌गारीच) फक्त आढळतात आणि त्यांच्या काही जाती केवळ वितलीयच आहेत. मासे सापेक्षतेने पुष्कळ आढळतात आणि बऱ्याच जातींचे आकार वैशिष्ट्यपूर्ण असतात.

वितलीय प्राण्यांच्या शरीराची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. हेक्झॅक्टिनेलिड स्पंज, पेनॅट्युलिड प्राणी किंवा क्रिनॉइड यांसारखे प्राणी ज्या कंटिकांनी किंवा देठांनी समुद्राच्या तळाला चिकटलेले असतात, त्या मुळांसारख्या कंटिका किंवा देठ फारच लांब होतात व त्यामुळे असे प्राणी चिखलात बुडलेले असण्याऐवजी चिखलाच्या पृष्ठाच्या वर उचलले जातात. माशांचे शरीर पुष्कळदा जास्त लांब व चपटे झालेले असून शेपटी लांब व क्रमाक्रमाने निमुळती होत गेलेली असते. अतिशय कमी तापमानामुळे कॅल्शियमाची चयापचय क्रिया (शरीरात सतत होणारी भौतिक व रासायनिक घडामोडींची क्रिया) फारच मंद होते व म्हणून वितलीय अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांची कवचे व पृष्ठवंशी प्राण्याची हाडे यांत कॅल्शियम कार्बोनेटाचे प्रमाण अत्यल्प असते. वितलीय बार्नेकल, एकायनोडर्म आणि मॉलस्क यांच्या कवचात कॅल्शियमाची लवणे मुळीच नसतात किंवा त्यांचे प्रमाण फारच थोडे असते.

वितलीय प्राणी प्रारूपिकतेने (नमुनेदारपणे) एकेकाच रंगाचे असतात अपृष्ठवंशी प्राण्यांचा रंग तांबूस अथवा तांबड्या रंगाची एखादी छटा असते मासे काळ्या अथवा गर्द जांभळ्या रंगाचे असून त्यावर रुपेरी चिन्हे असतात. प्रकाशाच्या अभावाचा डोळ्यांवर परिणाम होतो. पुष्कळ अपृष्ठवंशी प्राण्यांत डोळे अतिशय लहान झालेले असतात किंवा मुळीच नसतात पण स्पर्शेंद्रियांची वाढ अतिशय स्पष्टपणे झालेली असते, उदा., संवेदनाक्षम शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) असाधारण लांब व पर (पक्ष) दीर्घित (लांबट-मोठे) झालेले असतात. काही झिंग्यांत तर शृंगिका शरीराच्या चौपट लांब असतात. सेफॅलोपॉड व मासे यांचे डोळे पुष्कळदा असामान्य मोठे असतात आणि निदान एका सेफॅलोपॉडमध्ये आणि पुष्कळ माशांमध्ये डोळ्यातील भिंग मोठे झाल्यामुळे नेत्र दूरदर्शी (दूरचे दृश्य पाहण्याची क्षमता असलेली) होतो. सगळ्या वितलीय माशांच्या जालपटलात (दृक्‌पटलात) केवळ शलाकाच असतात आणि त्या प्रकाशाच्या तीव्रतेने उद्दिपीत होतात. शंकू मुळीच नसतात [⟶ डोळा]. उथळ पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांत जरी संदीप्ती (विशिष्ट पेशींतील रासायनिक प्रक्रियेने होणारी प्रकाशनिर्मिती) आढळत असली, तरी वितलीय प्रदेशात प्रोटोझोआ संघापासून तो मत्स्य वर्गापर्यंंत ती सर्वसाधारणपणे नेहमी आढळते. या प्रदेशात राहणारे जवळजवळ निम्मे मासे प्रकाश देणारा श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) उत्पन्न करतात किंवा त्यांना प्रकाशोत्पादक विशिष्ट अंगे (इंद्रिये) असतात. या अंगात पुढच्या बाजूला भिंग असून मागे अंतर्गोल परावर्तक असतो. अशाच प्रकारची गुंतागुंतीची अंगे काही सेफॅलोपोडांत आणि क्रस्टेशियात उत्पन्न झालेली दिसून येतात. याचा उपयोग बहुतकरुन भक्ष्य प्राण्याला भुरळ पाडून आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता किंवा नर आणि मादी यांची एकमेकांना ओळख पटण्याकरिता होत असावा. [⟶ जीवदीप्ति].

बहुसंख्य अपृष्ठवंशी प्राणी सिंधुजैवपंक गिळून त्यातील जैव अन्नकणांचा अन्न म्हणून उपयोग करतात पण मासे आणि सेफॅलोपॉड प्राणी मांसाहारी असतात. माशांचे तोंड फारच मोठे असते, त्यामुळे त्यांच्याएवढे मोठे प्राणी ते सहज गिळू शकतात.

बहुतेक अपृष्ठवंशी प्राणी आणि उथळ पाण्यात राहणारे अस्थिमीन (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो असे मासे) यांच्या डिंभावस्थेची (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असणाऱ्या पूर्व अवस्थेची) वृद्धी प्रारूपिकतेने समुद्राच्या पृष्ठावरील प्लवकामध्ये होते पण वितलीय प्राण्यांच्या बाबतीत हे शक्य नसते त्यांचा विकास प्रत्यक्ष किंवा सरळ (डिंभावस्था उत्पन्न न होता) असतो. अंडी असाधारण मोठी असून ती फुटण्याच्या आतच प्राण्याचे प्रौढ रुप तयार झालेले असते. वितलीय प्रेदशात ⇨ गळवाला मासा (बडिशमीन) अतिशय तुरळक असल्यामुळे निषेचनाचा (फलनाचा) प्रश्न मजेदार रीतीन सोडविलेला दिसून येतो नर अतिशय लहान असून मादीच्या शरीरावर बाह्य परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारा) म्हणून असतो आणि त्याचे कार्य शुक्राणू (पुं-जनन पेशी) उत्पन्न करणे हेच असते.

वितलीय प्राणिसमूहापैकी एकही प्राणी भूवैज्ञानिक दृष्टीने प्राचीन नाही. हल्लीच्या उथळ समुद्रांत पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) २५ ते ३५ वंश आढळतात परंतु वितलीय प्रदेशातील एकही प्राणी मध्यजीव महाकल्पापेक्षा (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापेक्षा) जास्त जुना नाही.

पहा : जीवविज्ञान, सागरी परिस्थितिविज्ञान.

संदर्भ : 1. Idyll, C. P. Abyss : The Deep Sea and the Creatures that Live in it, New York, 1964.

2. Marshall, N. B. Aspects of Deep Sea Biology, London, 1954.

कर्वे, ज. नी.