प्राणिसंख्या : आधुनिक प्राणिविज्ञानानुसार वेगवेगळ्या प्राण्यांच्या अभ्यासाबरोबर प्राणिसंख्येच्या अध्ययनाला सुद्धा फार महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण प्राणिसंख्येच्या अध्ययनाचा शास्त्रीय दृष्ट्या व व्यावहारिक दृष्ट्या फार उपयोग आहे परंतु असंख्य प्राणिप्रकार, अगणित प्राणिसंख्या, प्राणिगणतीतील उणिवा वगैरे कारणांमुळे अचूक प्राणिसंख्या सांगण्याच्या दृष्टीने फारशी प्रगती झाली नाही, त्यामुळे प्राणिसांख्यिकी (प्राणिसंख्याशास्त्र) अजनू अपक्वावस्थेत आहे.
प्राणिसंख्या म्हणजे काय? प्राणिसंख्या म्हणजे विशिष्ट क्षेत्रमर्यादेतील विशिष्ट प्राणिजातीची संख्या. उदा., गीर जंगलात वास्तव्य करणाऱ्या एकूण सिंहांची संख्या ही त्या जंगलापुरती सिंहांची संख्या म्हणता येते. थोडक्यात म्हणजे प्राणिसंख्या ही क्षेत्रसापेक्ष गोष्ट आहे.
प्राणिगणतीनुसार फक्त प्राणिसंख्याच ज्ञात होते असे नाही, तर त्या अनुषंगाने प्राणिजीवनासंबंधीच्या पुढील गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळते : प्राणिसंख्येतील नर-मादी प्रमाण पिल्लांचे वयपरत्वे गट वेळोवेळी प्राणिसंख्येत चढउतार होण्याची कारणे विशिष्ट मर्यादा-क्षेत्रात प्राणी कशा प्रकारे पसरलेले किंवा विखुरलेले आहेत त्या प्राणी जातीने किती मर्यादा-क्षेत्र व्यापले आहे त्या क्षेत्राचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) व भौगोलिक परिस्थितीचे वैशिष्ट्य अनुकूल वातावरणात जास्तीत जास्त किती प्राणी राहू शकतात. यांसारख्या इतर गोष्टी प्राणिसंख्येच्या अभ्यासाने उजेडात येतात व याच माहितीचा व्यावहारिक दृष्ट्या उपयोग होतो.
प्राणिसंख्या माहितीचा उपयोग: जुन्या प्राणिवर्गीकरणानुसार एखादी नवीन प्राणिजाती नक्की ठरविण्यासाठी त्या प्राणिजातीच्या नर-मादीचे काही नमुने वर्गीकरण-वैज्ञानिकाने संग्रहित केले, तरी पुरेसे होते परंतु प्राणिजातीच्या आधुनिक व्याख्येप्रमाणे ‘आनुवंशिक दृष्ट्या सुस्पष्ट, प्रजनन दृष्ट्या पृथक् अशा निसर्गात आढळणाऱ्या व्यक्तिसमूहाला जाती असे नाव दिले आहे’. म्हणून वर्गीकरणासाठी प्राणिसंख्येला फार महत्त्व आहे. त्यासाठी वर्गीकरण-वैज्ञानिकाला नवीन प्राणिजातीचे अनेक नमुने गोळा करणे आवश्यक असते आणि त्याबरोबरच वर सांगितलेल्या प्राणिजीवनासंबंधीच्या सर्व अंगांचा विचार करावा लागतो.
वन्यपशु-अभ्यासकाला व वन्यपशुव्यवस्थापकाला उपयुक्त व उपद्रवी प्राण्यांच्या संख्येसंबंधी माहिती असणे महत्त्वाचे आहे, कारण शिकाऱ्यांनी किती प्राण्यांची हत्या केली, रोगांमुळे किती मृत्युमुखी पडले, वन्यपशूंच्या संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या ऋतूत किती नर व माद्या मारण्यास परवानगी द्यावी वगैरेंसंबंधी नियम करणे शक्य होते.
कीटक किंवा इतर उपद्रवी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण हे त्या प्राणिजातीच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यासाठी आर्थिक कीटक-वैज्ञानिकाला प्राणिसांख्यिकीची सविस्तर माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कीटक नियंत्रणाचे मार्ग अनुसरण्यास त्यास मदत होते.
प्राण्याच्या वर्तनाच्या अभ्यासकाला प्राणिजातीचे काही स्वभावविशेष उदा., अंतर्जातीय सहिष्णुता, लैंगिक वृत्ती वगैरे प्राणिस्वभावाचे स्थायीभाव माहिती होण्यासाठी प्राणिसंख्येचा विचार करणे आवश्यक असते.
प्राणिगणती: जन्ममृत्यू नोंद, कायम निवासस्थानाचा पत्ता वगैरे लिखित गोष्टींमुळे मनुष्यमात्राची शिरगणती करणे सुलभ झाले आहे परंतु हे प्रकार प्राणिजीवनात नाहीत. त्याशिवाय असंख्य प्राणिप्रकार, प्राण्यांची अगणित संख्या, जीवनेतिहासातील विविध स्थित्यंतरे वगैरे कारणांमुळे प्राण्यांची शिरगणती करणे हे तारे मोजण्याइतकेच अवघड आहे. असे असले, तरी शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या शिरगणतीचे विविध प्रकार शोधून काढले आहेत परंतु त्या प्रकारांतही गुणदोष आहेत त्यामुळे अचूक संख्या सांगता येणे शक्य होत नाही.
प्राणिगणतीचा खात्रीचा मार्ग म्हणजे प्रत्येक प्राणी मोजणे परंतु हा प्रकार काही प्राण्यांच्या बाबतीत (उदा., सिंह, वाघ, हत्ती वगैरे संख्येने कमी असलेले व एका विशिष्ट जंगलात किंवा डोंगराळ भागात राहणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत) शक्य आहे. हे प्राणी मोजण्यासाठी एक प्रकारची गोळी बंदुकीच्या साहाय्याने प्राण्याच्या मांडीवर मारतात. या गोळीमुळे जखम न होता आकड्याचा ठसा उमटतो व हे ठसे दुर्बिणीच्या साहाय्याने नोंदता येतात. दुसरी पद्धत म्हणजे धातूच्या पोकळ सुईत गुंगी येणारे औषध वापरून ही सुई बंदुकीच्या साहाय्याने प्राण्याला मारतात. त्यामुळे जनावर जागच्या जागी बसते आणि त्यामुळे त्याच्या शरीराची मोजमापे घेता येतात व लिंग ओळखता येते. या पद्धतीमुळे संख्या मोजण्याचे काम सुलभ होते.
चितळ, काळवीट, हरिण, डुक्कर वगैरे कळप करून रहाणारे प्राणी व तळ्यात, सरोवरात व पाण्याच्या आसपास राहणाऱ्या पक्ष्यांची मोजदाद करण्यासाठी विहंगम छायाचित्रण प्रकाराचा उपयोग होतो.
पाण्यात राहणारे सूक्ष्म प्राणी, जमिनीवरील बारीक बारीक सूक्ष्मजीव, झाडाच्या पानांवरील माव्यासारखे असंख्य कीटक, कोट्यावधी टोळ असलेली टोळधाड वगैरे प्राणिमात्रांच्या संख्येच्या नोंदीसाठी अप्रत्यक्ष गणन पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यासाठी एक घ. सेंमी. पाण्यात किती प्राणी आहेत, एक चौ. सेंमी. किंवा एक चौ. मी. जमिनीवर अथवा एक घ. सेंमी. किंवा एक घ. मी. जमिनीत अथवा एक ग्रॅम वजनाच्या मातीत प्राण्यांची संख्या किती आहे यांपैकी योग्य त्या एकक प्रकारचा उपयोग करून प्राणिजातीच्या संख्येचा अदमास करता येतो. उदा., वारूळातील वाळवीची संख्या मोजण्यासाठी एक ग्रॅम वजनात किती वाळवी आहे हे मोजून त्यानंतर वारूळातील सर्व वाळवीचे वजन करून एकंदर वाळवीच्या संख्येसंबंधी अंदाज करता येतो.
प्राणिसांख्यिकीचे शास्त्रीय व व्यावहारिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था, सागर संशोधन संस्था वगैरे प्राणिविषयक संशोधन करणाऱ्या संस्थांनी प्राणिसंख्या संशोधनासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे.
पहा : जीवसांख्यिकी.
संदर्भ : 1. Benton, A. H. Werner, W. E. Principles of Field Biology and Ecology, New York, 1958.
2. Entomological Society of India, Entomology in India 1938-1963, 1964.
3. Lock, D. The Natural Regulation of Animal Number, Oxford, 1954.
4. Singhi, Dharamkumar K. A Field Guide to Big Game Census in India.
केतकर, श. म.
“