प्रवाद : (रूमर). प्रवाद किंवा अफवा म्हणजे वस्तुस्थितीचा आधार नसलेले, पण कर्णोपकर्णी होऊन लोकांमध्ये फैलावणारे विधान किंवा वृत, वस्तुस्थितीचे ज्ञान हे अफवांच्या प्रसारास मारक ठरते. साहजिकच, जनपदासारख्या लहानशा जनसमूहात स्थानिक घटनांविषयी अफवा सहसा पसरत नाहीत कारण लोकांना खरी माहिती समजून येण्यास वेळ लागत नाही. जनपदात अफवा पसरू शकतात, त्या दूरवरच्या ठिकाणी घडलेल्या घटनाविषयी.

आज संचारण साधनांमुळे जगातील विविध समाज फारच जवळ आले आहेत व जणू एकच एक समुदायरूप समाज अस्तित्वात आलेला आहे. अशा वेळी वस्तुस्थितीचा विपर्यास होण्याचा व वृत्तान्त अतिरंजित केला जाण्याचा अधिक संभव निर्माण होतो व अफवा पसरतात.

अफवा पसरतात हे जित्तके खरे तितकेच कधीकधी त्या हेतुपूर्वक प्रसृत केल्या जात असतात, हेही खरे आहे. त्यामुळे अफवा का पसरतात तसेच अफवा पसरविण्याच्या मुळाशी कोणकोणते हेतू असू शकतात, या प्रश्नांकडे मानसशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.

अफवांचा प्रसार : अफवा पसरण्याचे एक कारण असे, की लोक कानी पडलेल्या गोष्टीची शहनिशा करण्याची प्रयास न करता ती गोष्ट इतरांच्या कानी घालतात आणि भूमितिश्रेणीने ती गोष्ट अफवा म्हणून वेगाने पसरते. अर्थातच तिची स्वतः शहानिशा करून घेणे हे पुष्कळदा त्यांना शक्यंही नसते. अफवा पसरण्यास अनुकूल ठरणाऱ्या आणखी काही बाबी पुढीलप्रमाणे : (१) तथाकथित घटनेचे संदिग्ध स्वरूप, (२) लोकांना त्या घटनेचे वाटणारे महत्त्व, (३) लोकांच्या अपेक्षाची तीव्रता, (४) सद्यःस्थितीविषयी लोकांचे असमाधान आणि (५) तोचतोपणा असलेले जीवन.

व्यक्तिमत्व व प्रेरणांचे सखोल अभ्यासक ⇨ जी. डब्ल्यू. ऑल्पोर्ट (१८९७–१९६७) यांच्या मतानुसार, नेमके काय घडले आहे हे तर अजून माहीत नाही, पण ती घटना तर लोक़ांना फार महत्त्वाची वाटत आहे कारण त्यांच्या गरजांशी तिचा संबंध पोहोचतो आहे अशी परिस्थिती असली, की अफवा वाऱ्यासारखी पसरते. प्रत्येकजण कानी पडलेल्या वृत्ताचा स्वतःच्या भावनिक दृष्टिकोणातून अर्थ लावतो व त्या अर्थाशी सुसंगत अशा कल्पनांच्या मालमसाल्यासह ती वार्ता इतरांपर्यंत पोहोचवितो. ऑल्पोर्ट यांनी हे सत्य गणिती सूत्ररूपात मांडले आहे. ते असे : अफवेची तीद्रता = महत्त्व × संदिग्धता (आर्. ~ आय्. × ए.).

‘असे असे होणार’ अशी प्रबळ अपेक्षा लोकांच्या मनात असली म्हणजेही तत्संबंधीच्या अफवा चटकन पसरतात. ‘युद्धाचा भडका उडणार’, ‘चलनफुगवट्याविरुद्ध सरकार उपाय योजणार’ अशा अपेक्षा असल्या, की साधी चकमक उडाल्याबरोबर तसेच जबाबदार मंत्र्याच्या बोलण्यात चलनफुगवट्याचा विषय आल्याबरोबर अफवा पसरू लागतात, लोकांच्या गरजा अतृप्त राहिलेल्या असल्या म्हणजेदेखील ज्या घटनांचा त्या गरजांशी संबंध पोहोचतो, त्या घटनांबाबत अफवा पसरतात. लोकांना उत्तेजक, सनसनाटी असे काहीतरी हवेसे वाटत असते. उद्दीपनाची गरज ही माणसाची एक मूलभूत गरज होय. त्यामुळे नवीन अशा छोट्याशा वा क्षुल्लक घटनेविषयीही चविष्टपणे बोलण्यात लोकांना आनंद वाटतो.

अफवांचा उगम व त्याचा प्रसार यांच्याशी व्यक्तीच्या गरजांचा व भावनांचा संबंध असतो. अफवा पसरविणाऱ्या तसेच त्या विश्वासपूर्वक ऐकणाऱ्या माणसांची चर्या व बोलता-ऐकतानाची त्यांची ढब पाहिली म्हणजे याची सत्यता पटते.

अफवांमागील प्रेरणा : (१) अहंसंतोष : स्वतःला काही विशेष माहिती आहे अशा आविर्भावाने एक व्यक्ती दुसरीला काही सांगत असते. त्यायोगे तिचा ‘अहंभाव’ सुखावत असतो, असे म्हणावयास हरकत नाही. (२) अहंरक्षण तसेच वासनांची काल्पनिक पूर्ती : एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या अफवा पसरविणाऱ्यांच्याच अंतरंगात कदाचित (त्यांची त्यांनाच कल्पना नसलेल्या) अप्रशस्त वासना असतात परंतु त्या इतरांना चिकटवण्यात येत असतात. म्हणजेच त्यांचे प्रक्षेपण करण्यात आलेले असते, असे पुष्कळदा आढळून येते. या प्रक्षेपित प्रेरणांमध्ये कामप्रेरणेचाही अंतर्भाव असू शकतो. कधीकधी व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छा तिला एखाद्या वृत्तान्तात स्वतःच्या कल्पनांचा मालमसाला घालण्यास प्रवृत्त करीत असतात. (३) द्वेष व असूया : या भावनाही एखाद्या व्यक्तीविषयी किंवा समूहाविषयी अनुदार अफवा पसरविण्यास कारणीभूत होत असतात. (४) जिज्ञासा : काही अफवा खरी माहिती बाहेर यावी व कळावी या हेतूने मुद्दाम प्रसृत करण्यात येत असतात.

व्यक्तींच्या प्रेरणांचा व भावनांचा अफवांशी असणारा संबंध लक्षात घेऊन जी डब्ल्यू. ऑल्पोर्ट व लीओ पोस्टमन यांनी (१) युयुत्साप्रेरीत अफवा, (२) भयप्रेरित अफवा, (३) भयप्रेरक अफवा, (४) स्वप्नरंजनात्मक अफवा व (५) जिज्ञासाप्रेरित अफवा असे अफवांचे प्रकार केले आहेत.

अफवा-प्रसरणाची तिहेरी प्रक्रिया : अफवा पसरतात तेव्हा (१) मूळच्या बातमीतील काही तपशील गाळला जाण्याचा संभव असतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टीही तिच्यातून गळतात. या प्रक्रियेस सपाटीकरण (लेव्हलिंग) ही संज्ञा मानशास्त्रज्ञांनी दिली आहे. (२) काही गोष्टींवर भर दिला जातो व त्यामुळे अफवा ‘धारदार’ बनवली जाते (शार्पनिंग). (३) बातमी ऐकणारा मनुष्य स्वतःच्या समजुती, अभिवृती व इच्छा यांच्याशी त्या बातमीची सांगड घालून तिच्याशी आपले सात्मीकरण करतो व अशा रीतीने आत्मसात केलेली बातमी इतरांपर्यत पोहचवतो.

अफवांचा प्रायोगिक अभ्यास : अफवांच्या प्रसरणाची ही तिहेरी प्रक्रिया प्रयोगांच्या द्वाराही अभ्यासण्यात आलेली आहे. एका व्यक्तीला एक चित्र दाखवल्यानंतर तिने त्यातील दहाबारा वैशिष्ट्ये वेचून दुसऱ्या व्यक्तीला तोंडी सांगायची, तिने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला सांगायची असा प्रयोग जी. डब्ल्यू. ऑल्पोर्ट यांनी केला तेव्हा, त्यांना सातव्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यावर या तपशिलातील वैविध्य कमी झाल्याचे तसेच काही गोष्टी अधिक खुलवल्या गेल्याचे दिसून आले.

द फ्लर यांनी काही गृहिणींना प्रत्येकी एक पौंड कॉफीपूड आणि सोबत एक घोषणा दिली. ती घोषणा लक्षात ठेवली, तर त्यांना तीन दिवसांनी पुन्हा एक पौंड कॉफीपूड देऊ केली. या गृहिणींच्या घरांच्या आसपासही असेच आश्वासन देणारी तीस हजार पत्रकेही टाकली. या पाहणीतही त्या घोषणेतील वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द गाळले गेल्याचे व काही शब्दांना उठाव मिळून ती घोषणा धारदार झाल्याचे त्यांना आढळले.

अफवांचा प्रतिबंध : अफवांचे दुष्परिणाम होत असल्यामुळे त्या पसरू नयेत यासाठी वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान लोकांना उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे होय. मात्र हे ज्ञान देणाऱ्या व्यक्ती तसेच ज्ञान करून देणारी वृत्तपत्रादी माध्यमे खरोखरीच विश्वासपात्र असली पाहिजेत.

संदर्भ : Allport, G. W. Postman, Leo, The Psychology of Rumor, New York, 1947.

अकोलकर, व. वि.