प्रमाणपत्र : (सर्टिफिकेट). प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या लिखित मजकुराच्या खरेपणाबद्दल प्रमाणित केलेले निवेदन. प्रमाणपत्रासाठी पुष्कळदा दाखला अशीही संज्ञा वापरण्यात येते. प्रमाणपत्रातील मजकूर प्रमाणभूत मानला जातो. म्हणजे तो अधिकृत आहे, सत्य आहे, याची खात्री प्रमाणपत्रावरून होते. प्रमाणपत्रांचे अनेक प्रकार संभवतात. उदा., विक्रीचे प्रमाणपत्र, वारसाहक्कचे प्रमाणपत्र, विद्यापीठीय पदव्या किंवा पदविका यांचे प्रमाणपत्र इत्यादी.

सामान्यतः विशिष्ट विषयातील प्रमाणपत्रे विशिष्ट रीतीने किंवा रकान्यातून देण्याची पद्धत आहे. उदा., न्यायालयीन कामकाजासंबंधी असलेली प्रमाणपत्रे किंवा विद्यापीठीय पदवीसंबंधीची प्रमाणपत्रे एका विशिष्ट परिभाषेत व नेमून दिलेल्या प्रपत्रानुसार असतात.

प्रमाणित करणे हासुद्धा एखादा मजकूर अधिकृत आहे, हे दर्शविण्याची रीत होय. इंग्रजीत काही शब्द या दृष्टीने वापरले जातात व त्यांना पारिभाषिकत्वही प्राप्त झालेले दिसते. उदा., ‘सर्टिफाय’ म्हणजे प्रमाणित करणे वा दाखला देणे, ‘ॲटेस्ट’ म्हणजे अनुप्रमाणित करणे, ‘ऑथेंटिकेट’ म्हणजे अधिप्रमाणन करणे इत्यादी. व्यवहारात अनेक प्रकारच्या लिखित माहितीला अधिकृत म्हणून अशा विविध संज्ञांनी प्रमाणित केले जाते. उदा., एखाद्या व्यक्तीच्या वर्तनासंबंधी दिलेला दाखला किंवा प्रमाणपत्र. शासकीय प्रशासनात तसेच इतरही सार्वजनिक व्यवहारात एखादे निवेदन प्रमाणित करण्याची कार्यपद्धती ठरलेली असते तसेच विशिष्ट व्यक्तींना वा अधिकाऱ्यांना तत्संबंधीचे अधिकार असतात.

कायद्याच्या क्षेत्रात प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अगर वस्तुस्थितीच्या सत्यासत्यतेबद्दल योग्य किंवा लायक व्यक्तीने खात्रीपूर्वक जाहीर रीतीने केलेले अधिकृत निवेदन. एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःच्या स्वाक्षरीसह दिलेल्या लेखी माहितीसही प्रमाणपत्र असे म्हणतात. एका न्यायालयाच्या अधिकाऱ्याने दुसऱ्या न्यायालयाच्या माहितीसाठी दिलेल्या एखाद्या वस्तुस्थितीबद्दलचे अधिकृत लेखी निवेदन म्हणजे प्रमाणित प्रत, असे म्हणतात. न्यायालयात एखाद्या गोष्टीच्या सत्यासत्यतेबद्दल पुरावा म्हणूनसुद्धा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रमाणपत्रास सत्य प्रतिज्ञेची जरूरी असत नाही. अशा प्रमाणपत्राची जरूरीही काही बाबतींत कायद्याप्रमाणे आवश्यक असते, तर काही बाबतींत अशी प्रमाणपत्रे एखाद्या गोष्टीच्या खरेखोटेपणाबद्दल निवेदन म्हणून स्वेच्छेने दिली जातात.

एखादी व्यापारी कंपनी अगर अन्य तत्सम संस्था नवीन अस्तित्वात येताना अशा संस्थेची कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक असते. अशा नोंदणीनंतर कंपनीला अगर संस्थेला जे नोंदणीपत्र देण्यात येते, त्याला ‘सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन’ असे म्हणतात. हे प्रमाणपत्र अशा कंपनीच्या संदर्भात त्या कंपनीच्या कायदेशीर अस्तित्वाचा पुरावा म्हणून वापरण्यात येते. ‘सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट’ किंवा ठेवीबाबतचे प्रमाणपत्र हे एखाद्या बँक अधिकाऱ्याने दिलेल्या एखाद्या व्यक्तीच्या खात्यातील ठराविक रकमेबाबतचे प्रमाणपत्र होय. ‘सक्सेशन सर्टिफिकेट’ किंवा वारसाहक्काचे प्रमाणपत्र हे एखाद्या मृत व्यक्तीच्या संबंधात त्या व्यक्तीतर्फे प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र होय.

संदर्भ : 1. Ballentine, J. A. A Law Dictionary with Pronuciations, Rochester, 1948. 2. Mukharjee, T. P. Singh K. K. The Law Lexicon, Allahabad, 1971.

कुलकर्णी, स. वि.