पारपत्र : (पासपोर्ट). एका देशातील नागरिकास दुसऱ्या देशात जाण्यासाठी शासनातर्फे दिले जाणारे अनुज्ञप्तीचे पत्र म्हणजे पारपत्र. त्यात पारपत्रधारकाची ओळख पटेल अशी संपूर्ण माहिती, त्याचे राष्ट्रीयत्व, त्याचे छायाचित्र इ. गोष्टी दिलेल्या असतात. त्याचप्रमाणे परदेशात त्याची सुरक्षितता अबाधित रहावी व तेथे त्यास विनाहरकत संचार करता यावा, म्हणून शासनातर्फे परदेशातील शासनास केलेली विनंतीही त्यात अंतर्भूत असते. पारपत्र हे म्हणूनच एक प्रकारचे ओळखपत्र व विनंतीपत्रही असते. सामान्यपणे पारपत्राविना परदेशात प्रवास व स्वदेशात पुनरागमन करता येत नाही. जगातील बहुतेक सर्व देशांत पारपत्रासंबंधीचा हा संकेत रूढ आहे. विशेषतः पहिल्या महायुद्धानंतरच जगातील सर्व देशांनी पारपत्रपद्धतीचा स्वीकार केल्याचे दिसून येते. ज्या देशात प्रवेश करावयाचा आहे, त्या देशाच्या प्रतिनिधीचा शिक्का किंवा स्वाक्षरी पारपत्रावर घेणे आवश्यक असते. त्यालाच प्रवेशपत्र (व्हिसा) म्हणतात [→प्रवेशपत्र].

भारतात १९२० साली पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम संमत करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात १९६७ साली भारतीय संसदेने पारपत्र अधिनिया संमत केला. त्यातील तरतुदीनुसार पारपत्राचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे : (१) सर्वसामान्य पारपत्र, (२) पदीय (सेवेतील पदामुळे मिळणारे) व (३) राजनैतिक पारपत्र. प्रस्तुत अधिनियमात पारपत्रासाठी कोणास अर्ज करता येतो, त्यासंबंधी कोणती चौकशी आवश्यक आहे, पारपत्राची मुदत, त्यांचे नूतनीकरण त्याचप्रमाणे तो रद्द किंवा जप्त करण्यासंबंधीचे नियम इ. विषयांसंबंधी तरतुदी अंतर्भूत केलेल्या आहेत. एखाद्या नागरिकास पारपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा शासनाचा अधिकार अबाधित मानला जातो.

नेरलेकर, व. प्र. होनप, वा.रा.