मुसलमानी विधी : इस्लाम किंवा मुसलमानी धर्माच्या अनुयायांना स्थलकालानुरूप थोड्याफार फरकाने लागू होणारा विधी म्हणजे मुसलमानी विधी. ‘इस्लाम’ या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ ‘ईश्वरेच्छेला शरण जाणे’ असा आहे. त्याचबरोबर ‘मुस्लिम’ या शब्दाचा अर्थ ‘ज्याने इस्लामचा स्वीकार किंवा अंगीकार केला आहे’, असा आहे. तसेच प्राचीन विधीपद्धतीप्रमाणे मुसलमानी विधीमध्येसुद्धा धर्म आणि विधी यांचे अविभाज्य मिश्रण झालेले आहे. त्यामुळे मुसलमानी विधीचा विचार करताना मुसलमानी धर्माचा किंवा इस्लामचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. किंबहुना मुसलमानी विधी हा इस्लाम धर्माज्ञेमध्येच समाविष्ट होत असल्यामुळे व त्याला स्वतंत्र अस्तित्व नसल्यामुळे त्याला महोमेडन लॉ किंवा मुहमदन लॉ न म्हणता ‘इस्लामिक लॉ’ म्हणावे असा जाणकारांचा आग्रह आहे.

इ. स. ५७०–७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या शहरामध्ये कुरैश जमातीच्या बानी हशिम घराण्यामध्ये जन्म घेतलेल्या ⇨ मुहंमद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. आणि पर्यायाने मुसलमानी विधीचे मुहंमद पैगंबरच जनक ठरले. वास्तविकपणे पाहता इस्लाम धर्म नवीन नसून तो पर्वताएवढाच प्राचीन किंवा अनादी आणि अनंत आहे, असेच मुहंमदाचे म्हणणे होते. फक्त अल्ला म्हणजेच सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या दूताच्याकरवी ‘इस्लाम’ प्रगट करतो अशी त्याची शिकवण होती. मुसलमानी धर्माप्रमाणे अल्ला हा एकच सर्वसाक्षी व सर्वशक्तिमान परमेश्वर असून मुहंमद हे त्याचे शेवटचे प्रेषित होत.

इस्लाम धर्माची आणि विधीची संस्थापना करताना मुहंमदांच्या मनामध्ये काय ईप्सित होते, हे जाणून घेण्यासाठी अरबस्तानातील मुहंमदांच्या पूर्व परिस्थितीचे थोडक्यात अवलोकन करणे इष्ट होईल. प्राचीन अरबी हे बव्हंशी भटक्या टोळ्यांमध्ये विभागलेले असून आपले वाळवंटी जीवन शौर्याने व धैर्याने जगत असत. त्यांचा वंश शुद्ध होता, भाषा विकसित व संपन्न होती आणि साहित्य व विशेषतः काव्य अभिजात स्वरूपाचे होते. गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या, उंट-घोडे हीच प्रायः त्याची मालमत्ता होती. मदिरा, मदिराक्षी व युद्ध ही त्यांची कालक्रमणेची आवडती साधने होती. ते मूर्तिपूजक, नक्षत्रपूजक व निसर्गपूजक होते. अंधविश्वास व जादूटोणा यांनी त्यांना ग्रासलेले होते. बालहत्या, आसुरी सावकारशाही, अनेकपत्नीत्व, गुलामगिरी इ. चालीरीती त्यांच्यामध्ये रूढ होत्या. अरबी स्त्रियांना जवळजवळ कुठलेही अधिकार नव्हते. मुहंमदांनी अरबांमधील पाखंडीपणा (पेगनीझम) नाहीसा करण्याच्या दृष्टीने एकेश्वरवादाचा हिरिरीने व अनन्यभावाने पुरस्कार केला. स्त्रियांना मानाचे स्थान प्राप्त करून देऊन उत्तराधिकार किंवा वारसाहक्क दिला. त्यांनी बहुपत्नीकत्वाची चाल जरी बंद केली नाही, तरी एका पुरुषाला एका वेळी जास्तीत जास्त चार बायका करण्याची मुभा दिली व त्या सर्वांना सर्व दृष्टींनी समतेने वागवावे, असे कठीण बंधन पुरुषांवर लादले. त्यांनी गुलामगीरीविरुद्ध शस्त्र उपसले नाही पण बालहत्येची आणि पाशवी सावकारीची पद्धत बंद करून टाकली. विशेष म्हणजे तलवारीच्या सामर्थ्याला नीतिविषयक विचारांची जोड व पुस्ती दिली. आयुष्याची चाळीशी उलटल्यावर म्हणजे ६१६ मध्ये मुहंमद धर्मोपदेशक बनले व इस्लामचा धर्मग्रंथ ⇨ कुराण हे त्यांच्या मधूनमधून उद्‌भवणाऱ्या समाधीवजा स्थितीमध्ये त्यांच्या तोंडून प्रगट होऊ लागले व पुढे त्याची संहिता तयार झाली. त्यांचा तसेच त्यांच्या अनुयायांचा कुरैश जमातीमधील अरबी पाखंड्यांनी छळ सुरू केला, म्हणून इ. स. ६२२ मध्ये त्यांनी मदीना या शहराकडे निर्गमन केले व त्या वेळपासून नव्या हिजरी शकाची कालगणना सुरू झाली. आयुष्यातील पुढच्या दहा वर्षांमध्ये त्यांनी प्रचंड कामगिरी केली. शिस्तबद्ध सैन्य तयार केले, अरबास्तानातील सर्व शत्रूंचा बीमोड केला आणि धर्म, विधी व राजकीय सत्ता या सर्व दृष्टींनी सर्व अरबस्तानचे ते एकमेव नेते बनले. कालांतराने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्म व विधींचा प्रसार त्यांच्या अनुयायांनी जगभर केला.

तसे पाहिले तर मुसलमानी विधी हा संपूर्णपणे नवीन प्रकारचा विधिसंप्रदाय नव्हे त्यामध्ये प्राचीन अरबी रूढी, रिवाज व परंपरा आणि प्रेषितांची शिकवण यांचे बेमालूम मिश्रण झालेले आहे. प्राचीन मक्केचा व्यापारविषयक कायदा, मदीनेचा कृषिविषयक कायदा व अरबी टोळ्यांच्या चालीरीती यांमध्ये कुराण व आपले स्वतःचे शब्दाचरण (सुन्ना) यांच्या अनुषंगाने योग्य त्या सुधारणा घडवून संस्कारित विधिपद्धती तयार करण्यात आली तोच इस्लामी विधी होय. असामान्य गुण अंगी असल्यामुळे मुहंमद नव्या धर्माचे जरी प्रेषीत वा जन्मदाता ठरले, तरी स्वतःला ईश्वरी अवतार न मानता एक सामान्य माणूस म्हणूनच समजत असत. त्यामुळे इस्लामी किंवा मुसलमानी विधी, हा ज्याचे अरब लोक वंशज होते त्या सेमिटिक वंशाच्या शहाणपणाची नवी व सुधारित आवृत्ती मानण्यास काही प्रत्यवाय नाही.


कुठल्याही विधीची केवळ कायदेविषयक तरतुदी व त्यांचा तौलनिक अभ्यास किंवा न्यायशास्त्र अशी विभागणी करायची झाल्यास, मुसलमानी विधीचा ऊहापोह करतांना त्या विधीतील ‘शारिअ’ व ‘फिक्‌ह’ अशा दोन संकल्पनांचा विचार करावा लागेल.

अल्लाच्या किंवा परमेश्वराच्या आज्ञा अशा सर्व संग्रहाला शारिअ (शब्दशः ‘पाणवठ्याकडे जाणारा रस्ता’ असा अरबी भाषेतील अर्थ) असे नामाभिधान मुसलमानी विधी देतो. प्रत्येक आज्ञेला हुक्म म्हणतात. (अनेकवचन अहकाम). त्यामध्ये धार्मिक किंवा नीतिविषयक मूल्यांचा वा कर्तव्यांचा निर्देश येत असल्यामुळे व्यावहारिक स्वरूपाचे कायदेशीर हक्क व कर्तव्य यांचा ऊहापोह हा अगदी गौण किंवा दुय्यम स्वरूपाचा आहे. अर्थात धर्माच्या बाहेर कायदा नसल्यामुळे धर्म व नीती यांमध्ये संपूर्ण विधीचा अंतर्भाव अनुस्यूत आहे. अशा या धर्माज्ञा एकंदर पांच स्वरूपाच्या आहेत. अमुक गोष्ट करणे आवश्यक आहे व अमुक एक गोष्ट संपूर्णतया टाळणे आवश्यक आहे, असे सांगणाऱ्या धर्माज्ञांना अनुक्रमें ‘फर्द’ व ‘हराम’ म्हणतात. या टोकांकडील आज्ञांमध्ये ‘मंडुब’ व ‘मक्रूह’ अशा दोन प्रकारच्या धर्माज्ञा आहेत. मंडुबमध्ये अमुक गोष्ट करणे हितावह आहे, व मक्रूहमध्ये अमुक गोष्ट टाळणे हितावह आहे, असा शारिअचा सल्लावजा आदेश असतो. ज्या गोष्टीविषयी शारिअ उदासीन आहे किंवा कुठल्याही प्रकारचा आदेश देत नाही, त्यांना ‘जाइज’ अशी संबा आहे. उदा., दैनिक पाच प्रार्थना करणे किंवा ⇨ नमाज पढणे फर्द आहे. दारू पिणे हराम आहे पंचाधिक प्रार्थना करणे-जसे ईदच्या दिवशी-मंडुब आहे व काही प्रकारचे मत्स्य आहारवर्जित करणे मक्रूह आहे. जाइजमध्ये हजारो गोष्टींचा समावेश होऊ शकेल. उदा., हवाई प्रवास इत्यादी. अत्यंत आवश्यक व अटळ अशी कर्तव्ये आणि केवळ नैतिक जबाबदाऱ्या वा काम्यकर्मे यांमधील फरक जाणण्याच्या दृष्टीने शारिअच्या धर्माज्ञांची ही वर्गवारी अभ्यासणे इष्ट आहे. मानवजातीच्या सर्वांगीण व सर्वकालीन वागणुकीवर शारिअचा अंमल आहे. अशी मुसलमानी विधीची धारणा आहे.

मुसलमानी विधीची दुसरी संकल्पना म्हणजे फिक्‌ह. ज्याचा शब्दशः अर्थ बुद्धी किंवा अक्कलहुशारी असा आहे. फिक्‌ह या शब्दाचे वेगवेगळे अर्थ धर्मपंडितांनी सांगितलेले असले, तरी मुसलमानी विधीच्या सर्व मूलस्त्रोतांचा तौलनिक अभ्यास करून व्यक्तीचे हक्क व कर्तव्ये यांसंबंधीचे झालेले ज्ञान म्हणजे फिक्‌ह हा बऱ्याच अशी सर्वमान्य झालेला अर्थ स्वीकारण्यास हरकत नसावी. ज्याला फिक्‌ह किंवा असे धर्मज्ञान आहे, अशा धर्मपंडिताला ‘फकीह’ अशी संज्ञा आहे. म्हणजेच इस्लामचे शारिअ आणि फिक्‌ह अशी दोन शास्त्रे विधिसंग्रह आणि न्यायशास्त्र यांच्याशी अनुक्रमे तुलनीय आहेत, असे दिसते. फिक्‌हचे दोन भाग म्हणजे उसूल व फुरूअ. उसूल हे झाडाच्या मुळांसारखे असून त्यामध्ये कायद्याच्या मूलतत्वांचे निर्वाचन केलेले असते, तर फुरूअ हे फांद्यांसारखे असून त्यामध्ये कायद्याच्या निरनिराळ्या शाखोपशाखा (उदा., विवाह विधी) इ. विषयांवर चर्चा केलेली असते. शारिअ आणि फिक्‌ह या दोहोंमध्ये मुख्य भेद म्हणजे शारिअ केवळ ईश्वरनिर्मित किंवा प्रेषितनिर्मित आहे, तर फिक्‌ह हे शास्त्र मानवनिर्मित आहे. शारिअ मानवाच्या सर्व जीवनाला व वर्तनाला लागू आहे, तर फिक्‌ह हे केवळ त्याच्या कायद्याच्या कक्षेतील वर्तणुकीचा विचार करते.

इस्लामी किंवा मुसलमानी विधीचे चार प्रमुख मूलस्त्रोत आहेत आणि प्रामण्याप्रमाणे त्यांचा खालीलप्रमाणे अनुक्रम लागतो : (१) कुराण,(२) सुन्ना,(३) इज्मा आणि (४) कियास.

(१) कुराण : मुसलमानी विधीचा मुख्य उगम कुराण या धर्मग्रंथामध्ये आहे. कुराण हे अपौरुषेय आहे. म्हणजे ते कुणीही लिहिलेले नाही आणि ईश्वरेच्छेचा जो भाग देवदूत गॅब्रिएलकरवी साक्षात्काराच्या स्वरुपात मुहंमदासमोर प्रगट झाला, त्याला कुराण अशी संज्ञा आहे. कुराणात एकंदर सहा हजार सहाशे सहासष्ट आयत किंवा श्लोक आहेत. त्यांपैकी फक्त दोनशे आयत हे विधीतत्त्वासंबंधी किंवा विधिविषयक तरतुदीबद्दल आहेत. अर्थात कुराण एकाच वेळी प्रगट झालेले नसून इ. स. ६०९ ते ६३२ पर्यंतच्या २३ वर्षांच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने मुहंमदांना आविष्कृत झाले. कुराणाची अधिकृत संहिता मुहंमदाच्या मृत्यूनंतर तिसरा खलीफा उस्मान (कार. ६४४–५६) याच्या स्मरणावरून करण्यात आली. परंतु कुराण हे नवीन नसून अनादी आणि अनंत असल्याची इस्लाम धर्माची धारणा आहे. प्रेषितांच्या मदीना येथील वास्तव्याच्या कालखंडामध्ये कुराणाचा जो भाग प्रगट झाला. त्यामध्ये सार्वजनिक प्रार्थना उपवास, यात्रा, मदिरानिषेध, विवाह, घटस्फोट, अनैतिक कामसंबंध, उत्तराधिकार किंवा वारसा इत्यादींसंबंधी तरतुदींचा अंतर्भाव आहे. विधिविषयक तरतुदी संपूर्णतया कुराणामध्ये नाहीत पण ज्या विषयासंबंधी कुराणामध्ये उल्लेख किंवा तरतुदी आहेत, त्यांबाबतीत कुराणाचे प्रामाण्य वादातीत आहे. कुराणाचा अन्वयार्थ व त्याची मीमांसा करणाऱ्या शास्त्राला मुसलमानी विधीमध्ये ‘तफासीर’ किंवा ‘तफसीर’ असे नाव आहे. कुराणावर ग्रंथकारांनी अनेक भाष्ये लिहिली आहेत. त्यांमध्ये एकंदर ३० खंडांमध्ये लिहिलेले अल-तबरी (८३८–९२३) याचे भाष्य तसेच अल्-झमकशरी क्‌श्शफ (सु. ११–१२ वे शतक) व फखरुद्दिन अल्-राझी (११४९–१२०९) यांची भाष्ये यांचा उल्लेख केला पाहिजे.


(२) सुन्ना व अहादिस : कुराणाच्या खालोखाल मुसलमानी विधीचा उगमस्त्रोत म्हणून सुन्नाला जास्तीत जास्त मान्यता आहे. सुन्ना म्हणजे थोडक्यात प्रेषितनिर्णय किंवा प्रेषितवर्तन. मदीना शहरामध्ये न्यायाधीश म्हणून काम करीत असताना ज्या मुद्द्यांवर कुराणातून मार्गदर्शन मिळणे असंभवनीय होते, त्यांवर मुहंमद उत्स्फूर्त विवेकबुद्धीच्या जोरावर निर्णय देत असत. ईश्वराचा प्रेषित या नात्याने मुहंमदांची ही वचने कुराणाखालोखाल सर्वमान्यता पावली. त्यांचे बोलणे-चालणे, वर्तणूक इ. गोष्टी समाजाचे प्रथम आदर्श म्हणून व नंतर कायदा म्हणूनच मानल्या गेल्या. मुहंमद हे सर्वोत्तमपुरुष मानले असल्यामुळे प्रेषितवचन व प्रेषितवर्तन हाच मुसलमानी धर्माचा दुसरा मुख्य आधार ठरला.

इथे ‘अहादिस’ (अनेकवचनी) किंवा ⇨ हदीस (एकवचनी) या संज्ञांचा संदर्भ दिला पाहिजे. मुहंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर आपल्या वचनांनी किंवा वर्तनाने समाजाला मार्गदर्शन पुरविणारा पुरुष उरला नाही. तेव्हा त्यांची वचने व यांची माहिती पुरविणाऱ्या अनेक कथा अनेक व्यक्तींकडून प्रसृत होऊ लागल्या. ह्या कथाकारांमध्ये मुहंमदांचे सहकारी व नंतर जन्मलेल्या अनुयायांचासुद्धा समावेश होतो. अशा प्रेषितांविषयीच्या कथांना अहादिस असे म्हणतात. मुहंमद काय बोलले व कसे वागले, यांविषयी निरनिराळ्या व्यक्तींनी निरनिराळे वृत्तांत दिल्यामुळे लाखो खऱ्याखोट्या अहादिसचा समाजामध्ये सुळसुळाट झाला. अशा अनेक कथा तपासून हंसक्षीरन्यायाने प्रेषितांच्या सुन्ना ठरवणे, हे एक वेगळेच शास्त्र बनले व तसा उपक्रम नंतरच्या लेखकांनी केला. असे म्हणतात की, ‘आपण अशा चार हजार प्रेषित कथा कपोलकल्पित केल्या’, अशा तऱ्हेच्या कबुलीजबाबानंतर इबन अली अवजा या व्यक्तीला फाशी देण्यात आले. अशा प्रेषितकथांची स्वीकारार्हता ठरविणाऱ्या बुखारी या प्रसिद्ध ग्रंथकाराने एकंदर सहा लाख कथा तपासून त्यांपैकी फक्त सात हजार कथा ग्राह्य ठरविल्या. ज्या कथाकारांनी अधिकारवाणीने अशा ग्राह्यकथा सांगितल्या, त्यांचे वर्गीकरण करण्यात येऊन त्यांचे ‘मुसनद’ म्हणजे कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. त्यांमध्ये मालिक याचा मुवत्ता, इब्न हनबलचा मुसनद त्याचप्रमाणे साहि बुखारी आणि साहि मुस्लिम ह्या सुप्रसिद्ध कथासंग्रंहांचा समावेश होतो.

याप्रमाणे कुराणाच्या खालोखाल मुसलमानी विधीला वळण लावण्याचे मुख्य काम सुना व अहादिस यानी निरपवाद केलेले आहे.

(३) इज्मा : इज्मा किंवा धर्मपंडितांमधील मतैक्य हा मुसलमानी विधीचा तिसरा उगमस्त्रोत होय. इस्लामचा जसजसा दूरवर प्रसार होऊ लागला. तसतसे नवीन आचारविषयक किंवा विधीविषयक समस्या त्याच्यासमोर उभ्या राहू लागल्या. त्यामध्ये स्थानिक स्वरूपाचे प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर असत. जिथे कुराण व सुन्नाचे मार्गदर्शन अपुरे पडू लागले, तिथे ‘उलेमा’ (एकवचन अलीम म्हणजे विद्वान) किंवा मुज्तहिद (म्हणजे फहीद किंवा न्यायशास्त्रज्ञ) यांच्यामधील मतैक्य म्हणजेच इज्मा हा नवीन उगमस्त्रोत काळाच्या ओघाबरोबर तयार झाला. परंतु कुराण व सुन्नामध्ये इज्माच्या बाबतीत बंधनकारकतेच्या दृष्टीने समानता आढळत नाही. काही इज्मा हे एका पंथाला मान्य आहेत, तर दुसऱ्या पंथाला नाहीत. त्याचप्रमाणे मुहंमद पैगंबरांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या इज्मांना इतरांनी दिलेल्या इज्मांपेक्षा अधिक महत्व आहे. सुन्नी पंथामधील ‘मालिकी’ हा उपपंथ प्रेषितांच्या फक्त मदीनावासी सहकाऱ्यांच्या इज्मांना जास्त महत्त्व देतो. त्याचप्रमाणे पूर्वनिर्णित इज्मांना नंतरच्या इज्मांमुळे बाधा येणार नाही, असेही एक तत्त्व सर्वमान्य पावले. काही असले, तरी कुराण व सुन्ना यांमधीला विधीला इज्मा या उगमस्त्रोतामुळे वेळोवेळी प्रचंड पुष्टी व गती लाभली. परंतु त्याची अपरिमित व असंबद्ध वाढ होऊ नये, या दृष्टीने इज्मा या विकसनशील मूलस्त्रोताची कवाडे इ. स. च्या सु. दहाव्या शतकांमध्ये बंद झाली असे म्हणतात आणि ‘मुज्तहिदां’च्या म्हणजे धर्मपंडितांच्या नवीन ‘इज्तिहादला’ म्हणजे एकवाक्यतेला फारसा अर्थ उरला नाही. म्हणूनच ‘तक्लीद’ म्हणजे जुन्या इज्मांचे आपापल्या पंथांच्या मताप्रमाणे अनुकरण करणे, हे लोकप्रिय होऊ लागले.

(४) कियास : कियास किंवा सतर्क युक्तिवाद हा मुसलमानी विधीचा चवथा मूलस्त्रोत आहे. जिथे कुराण किंवा सुन्नाचा दाखला उपयोगी पडत नसेल, तिथे विधिज्ञाने किंवा न्यायाधिशाने आपल्या विवेकबुद्धीवर विसंबून न्याय देणे हे प्रेषितांनासुद्धा मान्य होते, असे एका हदीसाप्रमाणे दिसते. वास्तविक पाहता कुराण-सुन्नामधील एका विशिष्ट प्रश्नाला किंवा परिस्थितीला लागू असणारा विधी दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा परिस्थितीमध्ये तथ्यसादृश्यामुळे लागू करणे, याला कियास म्हणता येईल. किंबहुना कुराण-सुन्नातील मूलतत्त्वांच्या अपूर्व-कल्पित परिस्थितीमध्ये न्यायाधीशाने केलेला वैयक्तिक पातळीवर विस्तारित उपयोग म्हणजे कियास, असे म्हणता येईल. कियासाचे इंग्रजी विधीमधील विधिकल्पिताशी (फिक्शन ऑफ लॉ) बरेच साम्य आहे, असे एका इंग्रज लेखकाचे मत आहे. कियासच्या वचनकारकतेसंबंधी सर्व मुस्लिम पंथांमध्ये एकवाक्यता नाही. उदा., हनबलचा पारंपारिक संप्रदाय कियासला फारसे महत्व देत नाही कारण त्याला कुराण-सुन्नांसारख्या ईश्वरेच्छेचा दुजोरा नाही. फक्त इमामच विधीमध्ये सुधारणा करू शकतात या कारणास्तव शियापंथीय कियासला मूलस्त्रोत मानीत नाहीत. ‘कियास हे नासक्या मासळीसारखे आहे दुसरे काहीच क्षुधाशांतीसाठी उपलब्ध नसेल तर ते खावे’ अशा एका हदीसमध्ये वर्णिलेल्या तात्पर्याप्रमाणे कियासचा उपयोग व महत्त्व मर्यादित आहे हे सिद्ध होते.


(५) इतर उगमस्त्रोत : कुराण, सुन्ना, इज्मा व कियास यांमध्ये सामावलेल्या विधीला प्रसंगानुरूप व स्थानिक पातळीवर जोड देण्याचे अनेक प्रयत्न नवीन मीमांसातत्त्वांच्या जोरावर करण्यात आले. उदा., अबू हनीफा ह्या धर्मगुरूने नव्या तऱ्हेच्या विधिसमस्येला तोंड देण्यासाठी प्रसंगविशेषी प्रस्थापित धर्मतत्त्वातून कियासच्या प्रभावावर होणाऱ्या अनुबोधाला व्यावहारिक मुरड घालून समन्वायाच्या (इक्किटी) जोरावर निर्णय देणे हे तत्त्व शोधून काढले व त्याला ‘इस्तेहसन’ असे नाव दिले. त्याचप्रमाणे मदीना शहराप्रमाणे न्यायाधीश म्हणून निर्णय देताना मालिक या धर्मगुरूने ‘इस्तिलाह’ (सार्वजनिक हितानुवर्ती तत्त्व) व ‘इस्तिदलाल’ (कियासपेक्षा थोडा वेगळा असणारा विधितर्कवाद व अनुमान) या तत्त्वांचा पुरस्कार व अवलंब केला. भारतामध्ये जिथे कुराणादी मुलस्त्रोत उपयोगी पडत नसतील, अशा प्रश्नांबाबत न्यायालयांनी न्याय (जस्टिस), समन्याय व शुद्धबुद्धी (गुड कॉन्शन्स) या इंग्रजी विधीमधील सुप्रसिद्ध सिद्धांताचा वापर केलेला आहे.

इस्लाममधील पंथभेद : मुहंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर ताबडतोब इस्लाम धर्मामध्ये शिया व सुन्नी असे दोन पंथ सुरू झाले. प्रथमतः ते वैयक्तिक मतभेदांमुळे झाले पण पुढे त्यांच्यामध्ये वैचारिक आणि विधिविषयक मतभेदसुद्धा निर्माण झाले. प्रेषितांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस कोण, यावर प्रथम मतभेद निरनिराळ्या गटांमध्ये झाला. त्यांपैकी एक प्रभावी गटाचे म्हणणे असे होते, की खलीफा हे पद प्रेषितांच्या भौतिकी सत्तेचे निदर्शक असल्यामुळे ते योग्य त्या वारसाकडे निवडणुकीच्या पद्धतीने जावे, तर मुहंमदांच्या फातिमा या मुलीचा नवरा अली बिन अबू तालिब (सु. ६००–६१) याच्या गटाचे म्हणणे असे होते, की प्रेषितांचा वारस हा इमाम असावा म्हणजे त्याच्याकडे आधिभौतिक किंवा दैवी श्रेष्ठत्व असावे आणि ते प्रेषितांच्या रक्तसंबंधित व्यक्तिकडेच जाणे इष्ट आहे. पहिल्या गटाला सुन्नी हे नाव पडले, तर दुसऱ्या गटाला शिया हे नाव पडले. शिया यांचा मूळ अर्थ पक्ष. अलीच्या पक्षाला शिया हे नाव पडले.

अलीच्या अनुयायांच्या विरोधाला न जुमानता इ. स. ६३२ मध्ये मुहंमदांचा सासरा म्हणजे त्यांच्या आयेशा ह्या पत्नीचा पिता ⇨ अबू बकर (सु. ५७३ ?–६३४) यास खलीफा म्हणून निवडण्यात आले. तो दोनच वर्षांनी म्हणजे ६३४ मध्ये मरण पावला. त्याने उमर (सु. ८५६–६४४) या दुसऱ्या खलीफाची नियुक्ती केली. उमरचा इ. स. ६४४ मध्ये खून झाला. त्यांनतर प्रेषितांच्या पितृवंशातील एक दूरचा नातेवाईक उमय्या याचा वंशज उस्मान (सु.५७६–६५६) यास खलीफा म्हणून निवडण्यात आले. त्यालाही पुष्कळ विरोध होत राहिला आणि त्याची परिणीती ६५६ मध्ये त्याचा खून होण्यामध्ये झाली. उमर आणि उस्मान यांच्या निवडणुकीत अलीने नंतर मान्याता दिली व त्यांच्या मृत्यूनंतर तो खलीफा झाला. त्याच्या अगोदरच्या तीन खलीफांना अलीचे अनुयायी म्हणजे शिया हे अवैधपणे गादी बळकवणारे धर्मगुरू असे म्हणत असल्यामुळे खलीफा म्हणून मान्यता देत नाहीत पण सुन्नीपंथीय त्यांना खलीफा म्हणून मान्यता देतात. अली हा इ.स. ६६१ मध्ये युद्धात मारला गेला. त्यानंतर त्याचा मुलगा हसन याने उमय्या घराण्याचा संस्थापक मुआविया (कार. ६६१–६८०) हा खलीफा व्हावा म्हणून राजीनामा दिला. अलीच्या धाकट्या मुलाने म्हणजे मुआवियाचा मुलगा यझिद (६८०–८३) याच्याविरुद्ध बंड पुकारले पण करबला तेथे झालेल्या लढाईत तो त्याच्या काफिल्यासह ठार मारला गेला. इथे शिया व सुन्नी यांमधील तंटा विकोपाला गेला. त्यांच्यामध्ये कुराण व सुन्ना यांच्या बंधनकारकतेविषयी एकमत असले, तरी त्यांच्या अर्थाबद्दल मतैक्य नाही व अहादिस, इज्मा आणि कियास यांच्या अस्तित्व व वापरासंबंधी मतभेद आहेत.

मुआवियाच्या हाती राजकीय सत्ता असल्यामुळे तो मुसलमानी किंवा इस्लाम धर्माचा राजकीय व आध्यात्मिक नेता झाला आणि त्याने दमास्कस ही राजधानी केली. खलीफापद आणि राजपद एकत्र झाल्यावर इस्लाम धर्म व विधि यांचा प्रभाव अटलांटिक महासागरापासून हिंदी महासागरापर्यंत पसरला आणि चौदा सम्राटांच्या कारकीर्दीनंतर मुहंमदांचा चुलता अब्बासीने इ. स. ७४६ मध्ये उमय्या घराण्याचा पाडाव केला व खलीफापद बळकावले. अब्बासी घराण्याची सत्ता व खिलाफत जवळजवळ पाच शतके टिकली आणि १२५८ मध्ये तार्तर लोकांनी अब्बासी साम्राज्याचा विध्वंस केला. त्यानंतर आश्रयार्थ अब्बासी खलीफा ईजिप्तमध्ये पळून गेले आणि त्यांचे खलीफापद १५१७ पर्यंत नामधारी स्वरूपात चालू राहिले. त्यानंतर तुर्की सुलतानांनी खलीफा ही पदवी धारण केली, ती ⇨ केमाल आतातुर्क (१८८१–१९३८) याने नाहीशी करीपर्यंत म्हणजे १९२२ पर्यंत तुर्कस्तानमध्येच राहिली.


इस्लाम धर्म व विधीमध्ये शिया व सुन्नी अशी फूट पडल्यावर त्यांच्यात आपापसांतसुद्धा मतभिन्नतेमुळे काही उपपंथ निर्माण झाले, ते पुढील पृष्ठावरील आलेखावरून ठळकपणे समजतील.

शियांचे उपपंथ त्यांच्या इमामांच्या वंशाळीवरून सहज समजतील. शियांमधील पहिली फूट चवथ्या इमामानंतर पडली. काही शिया त्याचा मुलगा झैद याला इमाम मानू लागले. त्यापासून झैदी हा उपपंथ निर्माण झाला, तो मुख्यतः दक्षिण अरबस्तानात व येमेनमध्ये अस्तित्वात आहे. बाकीच्या लोकांनी मुहंमद अल् बाकीर याचे अनुयायित्व पत्करले. सहाव्या इमामानंतर पुन्हा एकदा फूट पडली. बहुसंख्य शियांनी मूसा अल् काझीमचे व त्याच्यानंतरच्या पाच इमामांचे म्हणजे एकंदर बारा इमामांचे नेतृत्व मान्य केले म्हणून त्यांना ‘बारावाले शिया’ किंवा अरबी भाषेमध्ये इयना अशरी म्हणून ओळखले जाते. अल्पसंख्याकांनी मूसाचा मोठा भाऊ इस्माइल याचे सातवा इमाम म्हणून नेतृत्व पत्करले म्हणून त्यांना दूरान्वयाने ‘सातवाले शिया’ म्हणतात. भारतात त्यांचे दोन प्रमुख गट आहेत : (१) जे सध्याच्या आगाखानचे अनुयायी आहेत, ते पौर्वात्य इस्माइली किंवा खोजा जमात व (२) पाश्चिमात्य इस्माइली म्हणजे दाउदी किंवा सुलेमानी बोहरा जमात. इराण व भारत यांमधील बहुसंख्य शिया हे इथना अशरी पंथाचे आहेत. जगामध्ये सुन्नीपंथीय मुसलमानांच्या संख्येच्या जेमतेम /२० संख्येचे लोक शियापंथीय असावेत. [⟶ शिया पंथ].

सुन्नीपंथामध्ये पुढील चार उपपंथांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल : (१) हनफी उपपंथ, (२) मालिकी उपपंथ,(३) शाफी उपपंथ आणि (४) हनबली उपपंथ.


हनफी उपपंथ : सुन्नी मुसलमानांतील सर्वांत जुन्या व जास्तीतजास्त उदारमतवादी पंथाचा गुरू म्हणजे अबू हनीफा (६९९–७६७). याच्या संप्रदायाला हनफी संप्रदाय म्हणतात. अबू हनीफा हा मक्का-मदीनेपासून दूर अशा इराक देशातील कूफा या शहरी राहिला आणि तेथे त्याने आपल्या धर्मतत्त्वांचा उपदेश केला. त्याच्या पंथाची काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. मक्का-मदीनेपासून तो दूर राहिल्यामुळे त्याच्यावर अहादिसचा प्रभाव नगण्य स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे निर्णयासाठी आपोआपच कियासचा सढळ हाताने त्याने उपयोग केला. तसेच इज्माचे क्षेत्र केवळ मुहंमदाच्या सहकाऱ्यांच्या एकवाक्यतेपुरते मर्यादित न ठेवता त्याने त्यामध्ये नंतरच्या विद्वज्जजनांच्या एकमताचासुद्धा अंतर्भाव केला. इतकेच नव्हे, तर कियासला जोड देण्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे समन्यायाप्रमाणे इस्तेहसन या नवीन तत्त्वाचा वापर केला. त्याचे लिखाण आता उपलब्ध नाही पण धर्माचे व विधीचे सिद्धांत शास्त्रशुद्ध पायावर शिकवणारा तो पहिलाच श्रेष्ठ धर्मगुरू होता. त्याचे दोन शिष्य अबू युसूफ व इमाम मुहम्मद अल् शैबानी (७४९–८०५) ह्यांनी विधिज्ञ या दृष्टीने खूप नावलौकिक कमावला व शैबानीने विपुल लेखनही केलेले आहे. अब्बासी खलीफांची आणि मोगल सम्राटांची मान्यता लाभल्यामुळे या संप्रदायाचा प्रसार पुष्कळ झाला व भारतातही बहुसंख्य सुन्नी मुसलमान हे हनफी उपपंथाचे अनुयायी आहेत. तुर्की लोक हे सुन्नी असल्यामुळे व महंमूद गझनी (कार. ९९८–१०३०) हा भारतातील पहिला मुसलमानी आक्रमक सुलतान तुर्क असल्यामुळे हनफी उपपंथाने इतर उपपंथांचा प्रभाव उत्तर भारतातून प्रायः नष्ट केला. अरबस्तान, सिरिया, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, ईजिप्त इ. देशांत हनफी पंथाचे वर्चस्व आहे. जवळजवळ अर्धे मुस्लिम जगत् संप्रदाय मानते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. [⟶ अबू हनीफा].

मालिकी उपपंथ : हनफी पंथानंतर उदयाला आलेल्या मालिकी पंथाचा जनक म्हणजे मालिक, इब्न अनास इमाम (७१३–७९५) हा होय. हा मदीनेमध्ये जन्माला आला व तेथेच मृत्यू पावला. हा प्रायः परंपरावादी होता, कारण जेथे मुहंमदांचे उर्वरित आयुष्य गेले, त्या मदीना शहराच्या वातावरणात न्यायाधीश या नात्याने त्याने आपले आयुष्य व्यतीत केले व त्याच्या मनावर सुन्ना व अहादिस यांचा प्रचंड प्रभाव होता. तथापि त्याने कियासकडे संपूर्ण दुर्लक्ष केले नाही आणि इज्मा, विशेषतः मदीनेतील धर्मपंडितांचा इज्मा, हा नेहमी शिरोधार्य मानला. धर्मतत्त्वांची मीमांसा व विवेचन करता उपरोक्त पद्धतीप्रमाणे त्याने इस्तिलाह व इस्तिदलाल या तत्त्वांचाही उपयोग केला. भुवत्ता हा त्याने लिहिलेला सुन्नी विधीवरील प्राचीन व महत्त्वाचा ग्रंथ आहे. या पंथाचे अनुयायी प्रामुख्याने आफ्रिकेतील ईजिप्त, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जीरिया, लिबिया, इ. देशांत आहेत. मूर लोकांमध्ये हा पंथ प्रसृत झालेला आहे. भारतात मालिकी उपपंथीय जवळजवळ नाहीतच. [⟶ मालिक, इब्न अनास इनाम]

शाफी उपपंथ : ह्या उपपंथाचा जनक मुहंमद बिन इद्रिस अस् शाफी (७६७–८२०) हा होय. हा इमाम मालिक व इमाम मुहंमद ह्यांचा शिष्य होता व प्रेषितांच्या घराण्यातच त्याचा जन्म झाला होता. त्याने न्यायशास्त्राचा विशेष अभ्यास केला व उसूलवर लेखन केले. तो परंपरांना हनीफापेक्षा जास्त परंतु मालिकपेक्षा कमी महत्व देत असे. त्याने अहादिसचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला व ग्राह्य परंपरांचा मुसनद म्हणजे संग्रह प्रसिद्ध केला. त्याने इज्माला भरपूर महत्त्व दिले पण हनफी उपपंथाचे इस्तेहसन व मालिकीचे इस्तिलाह ह्या तत्त्वांबद्दल तुच्छताच दर्शविली. शाफी पंथाचा प्रभाव अरबस्तानाची किनारपट्टी, श्रीलंका, जावा, दक्षिण भारत, उत्तर आफ्रिका, इ. प्रदेशांतील मुसलमानांवर पडलेला आहे. [⟶ शाफी, इमाम].

हनबली उपपंथ : याचा तथाकथित संस्थापक अबु अब्दुल्ला अहमद इब्न हनबल (७८०–८५५). याच्या गुरूंमध्ये इमाम शाफीचीसुद्धा गणना होते. हनबलच्या मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांनी या उपपंथाची स्थापना केली. हा परंपरांचा जास्त अभिमानी असल्यामुळे इज्मा व कियास यांना त्याने अगदी मर्यादित महत्त्व दिले. त्याचे अनुयायी प्रामुख्याने मध्ये अरबस्तान व ओमान येथे आहेत. [⟶ सुन्नी पंथ].


भारतातील मुसलमानी विधी : मुसलमानी विधीचे निरूपण करणारे अनेक विख्यात ग्रंथ आहेत, परंतु ज्या हनफी पंथाचे बहुसंख्य भारतीय मुसलमान अनुयायी आहेत, त्या पंथाच्या दृष्टीने दोन ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांतील पहिला ग्रंथ हिदाया हा बुऱ्हाणुद्दीन या लेखकाने (मृत्यू ५९३) सु. ५८० मध्ये लिहिला. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याच्या हुकूमावरून चार्ल्स हॅमिल्टन या इंग्रजी लेखकाने त्याचे फार्सीमधून इंग्रजीत भाषांतर केले. हिदाया हा सर्वांत महत्त्वाचा टीकाग्रंथ म्हणून भारतीय न्यायालयांत मान्यता पावलेला आहे. दुसरा गंथ म्हणजे फतवॉ-इ-आलमगीरी हा मोगल सम्राट औरंगजेबाच्या हुकूमावरून रचला गेला. त्यांत अनेक फतव्यांचा म्हणजे पंडित-निर्णयांचा संग्रह करण्यात आला आहे. मोगलांचा भारतामध्ये अंमल असताना काझींच्याकरवी मुसलमानी विधी सर्वांना लागू केला जात असे. ब्रिटीश अंमल सुरू झाल्यापासून १७७२ च्या सुप्रसिद्ध दुसऱ्या रेग्युलेशन ॲक्टच्या तरतुदींनुसार वारसा, उत्तराधिकार, विवाह इ. व्यक्तिगत बाबतीत मुसलमानांना मुसलमानी विधी व हिंदूंना हिंदू विधी लागू होईल, असे इंग्रज सरकारने जाहीर केले.

जसजसे ब्रिटिशांचे भारतातील सरकार नवनवीन अधिनियम करू लागले, तसतसा मुसलमानी विधीचा प्रभाव ओसरत गेला. उदा., भारतीय दंडसंहिता (१८६०) व भारतीय दंडप्रक्रिया संहिता या दोन संहितांमुळे मुसलमानी विधीतील दंडविधी भारतात नामशेष झाला. १८७२ च्या पुरावा अधिनियमाने मुसलमानी विधीचा अधिकच संकोच केला. यानंतरच्या अनेक अधिनियमांनी मुसलमानी विधीवर आक्रमण करून त्याचा बराचसा भाग अपवर्जित केल्यामुळे आजमितीस मुसलमानी विधी हा भारतातील मुसलमानांना फक्त व्यक्तिगत बाबतींत म्हणजे वारसा, विवाह, विवाहविघटन, मेहेर, पितृत्व आणि औरसत्व, अभिस्वीकृती, अज्ञानत्व व पालकत्व, दान (हिबा), मृत्युपत्र (वसीयत), वक्‌फ, अग्रक्रय इ. विषयांपुरता लागू राहिलेला आहे.

त्याचप्रमाणे भारतातील खोजा, कच्छी व हलाई मेमन, बोहरी या लोकांना त्यांच्या रूढीनुसार वारसा, मृत्युपत्रीय उत्तराधिकार यांबाबतींत हिंदू विधीच लागू होत होता. परंतू १९३७ च्या शरीयत अधिनियमाने मुसलमानी विधीच्या विरोधात असलेल्या सर्व रूढी रद्द करून सर्व मुसलमानांना-मग ते कोणत्याही पंथोपपंथाचे असोत- मुसलमानी विधीच लागू होईल, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे निदान व्यक्तिगत कायद्याबाबत भारतातील यच्चयावत् मुसलमान काही अपवादात्मक बाबी वगळता मुसलमानी विधीच्या अंमलाखाली आणले गेले.

उपरिलिखित परिच्छेदांवरून असे दिसून येईल, की इस्लामी किंवा मुसलमानी विधीचा विकास हा जसा कुराण, सुन्ना व अहादिस, इज्मा व कियास यांनी तसाच अक्षरशः हजारो धर्मपंडीतांचे व लेखकांचे प्रकांड पांडित्य, प्रशंसनीय तर्कशास्त्र व कल्पनाशक्ती आणि प्रदीर्घ परिश्रम यांनी घडविलेला आहे. मक्का आणि मदीना येथून सुरुवात करून इस्लाम धर्म व विधी जगभर पसरत गेले. धर्माचा विस्तार होत असतांना निरनिराळ्या प्रदेशातील स्थानिक समस्या सोडविताना कुराण, सुन्ना इत्यादींची पकड फार ढिली होऊ न देता मुसलमानी विधीने काही स्थानिक बदल लवचिकपणे आत्मसात केले. अन्यथा इतक्या धर्मपंडीतांनी सहस्त्रावधी विधीग्रंथ लिहावे, याची उपपत्तीच लागत नाही. परंतू सगळ्या विश्वाचा असा अनुभव आहे, की विधी हा स्थलकालसापेक्षच राहिला आहे. नव्या युगाबरोबर नव्या समस्या व नवी आव्हाने मनुष्यजातीसमोर उभी राहतात. त्यांना सामोरे जातांना कायदा प्रसंगानुरूप सतत आपले पवित्रे बदलत असतो. आता एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलेले असतांना जुना मुसलमानी विधी नव्या प्रश्नांना आहे त्या स्वरूपामध्ये यशस्वीपणे तोंड देऊ शकेल काय, हाच विधीपंडितांसमोर यक्षप्रश्न आहे.


मुसलमानी विधी बदलण्याची आमूलाग्र प्रक्रिया काही मध्यपूर्वेतील देशात केव्हाच सुरू झाली. प्रा. अँडरसन यांनी इस्लामिक लॉ इन द मॉडर्न वर्ल्ड या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे काही मुसलमानी विधीच्या अंमलाखाली किंवा प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे, तर एकदोन ठिकाणी परिपूर्णतेला गेलेली आहे. ⇨ जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२) या इंग्रज लेखकाने सुचविल्याप्रमाणे जरी इंग्लंडमध्ये नाही, तरी फ्रान्स, जर्मनी, इटली इ. देशांत दिवाणी कायद्याच्या नव्या संहिता तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा प्रभाव मध्ययुरोपीय देशांच्या विधीवर पडत चाललेला आहे. अर्थात काही ठिकाणी व विशेषतः जेथे लष्करी राजवट सुरू झाली आहे. अशा काही देशांमध्ये मुसलमानी विधी त्याच्या मूळस्वरूपात लागू करावा, अशी प्रतिक्रियासुद्धा सुरू झाली आहे व अयातुल्ला खोमेनीच्या राजवटीतील इराण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. विधीची वाटचाल ही क्रियाप्रतिक्रियेच्या आवर्तनामधूनच चालू असते. सुन्नी घराण्याचा पहिला धर्मगुरू अबू हनीफा हा मक्का मदीनेपासून व त्यांच्या परंपरांपासून इराकमधील कुफा येथे राहिल्यामुळे बराचसा उदारमतवादी होता त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याच्या पाठोपाठ नावलौकिक कमावणारा दुसरा धर्मगुरू मालीक हा अगदी कडवा परंपरावादी झाला आणि त्याच्या मागोमाग नावारूपाला येणारा तिसरा सुन्नी धर्मगुरू शाफी याने जणू काही त्या दोघांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून उभयतांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला, याचा निर्देश वर आला आहेच.

विद्यमान परिस्थितीत कायदा सोपा, सरळ, सोयीस्कर आणि संहितामय स्वरूपाचा असावा. अशी भावना सर्वसाधारणपणे लोकशाही राष्ट्रात रूजू लागली आहे. भारतीय संविधानाच्या ४४ या अनुच्छेदामध्ये सरकारने समान नागरी संहिता निर्माण करावी, हे उद्दिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांमध्ये लिगंजातीधर्मनिरपेक्ष समानता असावी, हे उच्चतम ध्येय संविधानाने मान्य केलेलेच आहे. त्याला अनुसरून सर्वधर्मियांसाठी एक समान नागरी संहिता तयार करावी, हे ओघानेच आले. परंतू त्यासाठी कदाचित बहूसंख्य हिंदू, पारशी व ख्रिश्चन लोक तयार होतील पण बहुसंख्य मुसलमान तयार होतील काय, दहाव्या शतकात इज्तिहादची कवाडे बंद करण्यात आली ती पुन्हा खुली होतील काय, असे यक्षप्रश्न आहेत व त्याची उत्तरे देणे सोपे नाही. सातव्या शतकात स्त्रियांना वारसाहक्क प्रदान करणारे महंमद पैगंबर हे क्रांतिकारक होते यात शंकाच नाही. परंतू त्यांचे बहुसंख्य अनुयायी पुन्हा एकदा वैचारिक क्रांती करण्यास तयार नाहीत, अशी साधार भीती वाटते. तसे पाहता भारतात भारतीय दंडसंहिता अंमलात आल्यापासून मुसलमानी विधीचा बराचसा भाग अपवर्जित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अगदी अलिकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास मुस्लिम विवाह विघटन अधिनियम १९३९ या अन्वये मुस्लिम स्त्रियांना मुसलमानी विधीत अंतर्भाव नसलेल्या कारणाखालीसुद्धा नवऱ्यापासून विवाहविच्छेद मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु विवाह, घटस्फोट, वारसा इ. बाबतीत स्त्रीपुरुषांना समान नियम असावे, ह्याला बहुसंख्य मुसलमान समाजाची मान्यता मिळेल, असे दिसत नाही. केवळ विधीवेत्ते किंवा मुज्तहिद हे कायद्याला वळण लावू शकत नाहीत आणि विधीमंडळाने जर केवळ संख्याधिक्याच्या बळावर मुसलमानी विधीमध्ये परिवर्तन करावयाचे ठरविले, तर कदाचित ती शोकांतिका ठरेल. तेंव्हा जनसंपर्क आणि योग्य ती लोकजागृती यांच्या जोरावरच समान नागरी संहितेबद्दलचे प्रयत्न यशस्वी होतील.

पहा : इस्लाम धर्म इस्लामी धर्मपंथ.

संदर्भ : 1. Anderson, J. N. D. Islamic Law in the Modern World, London, 1959.

             2. Coulson, N. J. A History of Islamic Law. Edinburgh, 1964.

             3. Fyzee, A. A. A. Outlines of Muhammadan Law, Oxford, 1964.

             4. Hamilton, Charles, Hedaya, A Commentary on Mohammedan Law, Lahore 1957.

             5. Mahmood, Tahir, Family Law Reform in the Muslim World, New Delhi, 1972.

             6. Majid, Khadduri, Islamic Jurisprudence, Baltimore, 1961.

             7. Mulla, Dinshah Fardunji, Principles of Mahomedan Law, Bombay, 1977.

             8. Saksena, Kashi Prasad, Muslim Law as Administered in India &amp Pakistan, Lucknow, 1963.

             9. Schacht, Joseph, The Origins of Mahammadan Jurisprudence, Oxford, 1950.

             १०. श्रीखंडे, ना. स. मुस्लिम विधी, नागपूर, १९७६.

रेगे, प्र. वा. 

Close Menu
Skip to content