राजपत्र : (गॅझेट). शासकीय विधिविधान, अधिनियम, अधिसूचना, देशाच्या संविधानानुसार झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुका व शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कामकाजविषयक घोषणा व निर्णय आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत करणारे सरकारी नियतकालिक. प्राचीन काळी अधिकृत शासकीय बातम्या, समाचार आणि धोरणात्मक निवेदने प्रसृत केली जात. त्यांमध्ये राजांची आज्ञापत्रे, ताम्रपट वा शिलालेख, जाहीरनामे, फर्माने, दानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. तसेच त्यांमधून राजाज्ञा, सरकारी आदेश, निर्णय, निवेदने अथवा अधिसूचना घोषित केल्या जात. प्राचीन रोमन साम्राज्यात सार्वजनिक घोषणेद्वारे राजाज्ञा प्रसारित केल्या जात. अशाच प्रकारचे अधिकृत अहवाल चीनमध्ये सातव्या शतकापासून जाहीर केले जात. तथापि त्यांना आधुनिक काळातील नियतकालिक राजपत्राचे स्वरूप नव्हते. आवश्यकतेनुसार ते वेळोवेळी प्रसारित केले जात.

यूरोपातील गॅझेटचा इतिहास मनोरंजक आहे. राजपत्रास इंग्रजीत गॅझेट म्हणतात. गॅझेट्ट (एक छोटे नाणे) या मूळ इटालियन शब्दावरून गॅझेट हा शब्द इंग्रजीत प्रचलित झाला. पहिले गॅझेट सोळाव्या शतकाच्या मध्यास अनौपचारिक तथा अतिरंजित बातमीपत्र या स्वरूपात व्हेनिसमधून प्रकाशित झाले. त्यातून अनधिकृत माहिती प्रसारित करीत असत. सोळाव्या शतकांच्या पूर्वार्धापासून अशी खाजगी बातमीपत्रके इंग्लंडमध्ये अस्तित्वात होती पण त्यांमध्ये प्रामुख्याने राजकीय डावपेच, राजदरबारातील समाचार आणि काही वेळा काव्यसुद्धा समाविष्ट असे. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८-१६०३) इंग्लंडमध्ये विविध प्रकारची बातमीपत्रे उदयास आली. लोकप्रियता मिळविण्यासाठी त्यातून अशासकीय सूत्रांकडून मिळविलेला अनधिकृत वृत्तांत, कपोलकल्पित, क्षुल्लक व सनसनाटी बातम्या, गुन्हेगारी, दैवी चमत्कार व चेटूक यांसारख्या मनोरंजक बातम्या प्रसारित होत असत. प्रसंगी ही पत्रके विनोदाचा विषय बनत.

तथापि सतराव्या शतकात गॅझेट हा शब्द अधिकृत शासकीय बातमीपत्र या अर्थाने इंग्लंडमध्ये अधिकाधिक रूढ होऊ लागला. १६ नोव्हेंबर १६६५ रोजी प्रथम द्विसाप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेले ऑक्सफर्ड गॅझेट हे पहिले शासनाधिकृत इंग्रजी नियतकालीक जन्माला आले. प्लेगच्या साथीमुळे ते लंडनऐवजी ऑक्सफर्डहून प्रकाशित झाले होते. ऑक्सफर्ड गॅझेटचे तेवीस अंक निघाल्यानंतर चोविसाव्या अंकास लंडन गॅझेट असे नाव प्राप्त झाले. हे गॅझेट सरकारचे अधिकृत बातमीपत्रक म्हणून आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे. अद्यापही ते अस्तित्वात आहे. त्यानंतर १६९९ मध्ये एडिंबरो गॅझेट व १७०५ पासून डब्लिन गॅझेट प्रकाशित होऊ लागले. १६३१ पासून गॅझेट द फ्रान्स हे शासनाधिकृत फ्रेंच साप्ताहिक सुरू झाले.

शासनाचे अधिकृत वृत्त देणारे भारतातील पहिले समाचारपत्र म्हणून कलकत्ता गॅझेटचा उल्लेख करावा लागेल. फ्रान्सिस गोल्डविन याने त्याचा पहिला अंक मार्च १७८४ मध्ये काढला. तदनंतर मुंबईत १७९० मध्ये खाजगी रीत्या निघालेल्या बॉम्बे कुरिअरला सरकारने १७९२ पासून आश्रय दिला. मात्र १८३० मध्ये मुंबई इलाखा शासनाने बॉम्बे गव्हर्न्मेंट गॅझेट नामक स्वतंत्र राजपत्र काढण्यास प्रारंभ केला. इतर इलाख्यांमध्येही त्याचे अनुकरण झाले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून शासनयंत्रणेची व्याप्ती वाढल्यामुळे राजपत्राचे महत्त्व वाढले. त्या दृष्टीने देशाचे केंद्र आणि प्रांतिक सरकारांनी आपापली राजपत्रे प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. स्वतंत्र भारतातील शासनाने विकास व जनकल्याणाची कार्यव्याप्ती विस्तृत केल्यामुळे जनता, संबंधित व्यक्ती आणि संघटनांना प्रशासकीय निर्णय, विधेयके, अध्यादेश, हंगाम व पिकांचा अहवाल इ. कळविण्यासाठी राजपत्राचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे शासन प्रक्रियेत लोकांचा सहयोग साधून शासन लोकाभिमुख होण्यास मदत होते.

केंद्र सरकार इंग्रजी आणि हिंदीतून, तर राज्य सरकारे इंग्रजी व आपल्या राज्यभाषेत राजपत्र प्रकाशित करतात. विषयांनुसार राजपत्राचे काही विभाग व उप-विभाग पाडलेले असतात. प्रत्येक विभाग व उप-विभागांत छापावयाचे विषय निश्चित केलेले असतात. विशिष्ट उपविभागात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नेमणुका व पदोन्नत्या घोषित करतात. नियतकालिकाव्यतिरिक्त तातडीच्या मजकुरासाठी असाधारण राजपत्र प्रसिद्ध करतात. प्रत्येक विभाग व उप-विभागाच्या प्रतींची संख्या सारखी नसली, तरी आवश्यकतेनुसार हजारो प्रती छापतात. शासकीय कार्यालयांव्यतिरिक्त प्रत्येक नागरिकास हे राजपत्र शासकीय ग्रंथभांडारांतून अत्यल्प किंमतीत अथवा वार्षिक वर्गणी भरून प्राप्त करता येते.

चौधरी, कि.का.