हिदायतुल्ला, मोहम्मद : (१७ डिसेंबर १९०५–१८ सप्टेंबर १९९२). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदेपंडित, भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश. त्यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील बैतुल येथे खानबहाद्दूर हाफिज मो ह म्म द विलायतुल्ला आणि मोहम्मदी बेगम या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील विलायतुल्ला हे मध्य प्रांतात शासकीय सेवेत होते आणि भंडारा येथून जिल्हा दंडाधिकारी म्हणून निवृत्त झाले (१९२८). त्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने हिदायतुल्लांचे सुरुवातीचे शिक्षण अकोला, सिहोर, रायपूर, नागपूर अशा विविध ठिकाणी झाले. पुढे रायपुरातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले (१९२२). पुढील उच्च शिक्षण केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात झाले व लंडन येथील लिंकन्स इनमधून ते बॅरिस्टर झाले (१९३०). भारतात परतल्यावर त्यांनी नागपूर येथे वकिलीस प्रारंभ केला (१९३०–३६). नागपूर विद्यापीठात थोडा काळ कायद्याचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर सरकारी वकील म्हणूनही काम केले. पुढे नागपूरला १९३६ मध्ये उच्च न्यायालय स्थापन झाले. त्यात ते वकिली करू लागले. नंतर त्यांनी सरकारी वकीलम्हणून (१९४२-४३) काम केले आणि त्यांची महाधिवक्ता (ॲडव्होकेट जनरल) म्हणून मध्य प्रांतात नियुक्ती झाली (१९४३–४६). वकिली करीत असताना नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात ते अध्यापन करीत असत (१९३५–४३). त्यांची नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली (१९४६). या काळात नागपूर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश (१९५४–५६) असताना जबलपूर येथील मध्य प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयात (१९५६–५८) ते मुख्य न्यायाधीश होते. त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून १ डिसेंबर १९५८ रोजी नियुक्ती झाली. १९६८ मध्ये ते सरन्यायाधीश झाले आणि १९७० मध्ये निवृत्त झाले. भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून त्यांनी दोन वेळा कार्यभार सांभाळला (१९६९ व १९८२). ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायाधीश असताना काही लक्षणीय व दूरगामी परिणाम करणारे खटले न्यायालयापुढे आले. त्यांपैकी सज्जनसिंह, गोलकनाथ आणि माजी संस्थानिकांची मान्यता व तनखे रद्द करण्याचा खटला हे विशेष उल्लेखनीय होत. या तीनही खटल्यांत त्यांनी स्वतः विचारप्रवर्तक निकालपत्रे लिहिली. निवृत्तीनंतर ते वाचन, लेखन, गोल्फ, ब्रिज या छंदांत उर्वरित जीवन व्यतीत करीत असताना त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली आणि भारताचे उपराष्ट्रपती म्हणून ते बिनविरोध निवडून आले (१९७९–८४). 

 

मोहम्मद हिदायतुल्ला
 

 हिदायतुल्ला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी, उमदे व प्रसन्न होते. त्यांनी देशात व परदेशांत काही महत्त्वाच्या संस्थांवर सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष या नात्याने काम केले. नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळाचे ते एकोणीस वर्षे (१९३४–५३) सदस्य होते. दिल्ली व पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू (१९७९–८४) व जमियत मीडिया हुसनलियत विद्यापीठाचे कुलगुरू (१९६९–८५) म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. इंटरनॅशनल लॉ असोसिएशन या संस्थेत त्यांनी भारतीय शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच भारतीय रेडक्रॉस संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. जमनालाल बजाज प्रतिष्ठानचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. 

 

राज्यसभेचे अध्यक्ष असताना (१९७९–८४) हिदायतुल्लांची कारकीर्द विशेष संस्मरणीय ठरली. न्यायक्षेत्रात काम करताना त्यांनी दिलेलेमहत्त्वाचे निवाडे व व्यक्त केलेली मते हा विधी व न्यायक्षेत्रातील चिरंतन मौलिक ठेवा आहे. 

 

काव्यशास्त्राचे, विशेषतः उर्दू शायरीचे, हिदायतुल्ला गाढे अभ्यासक होते. बहारदार शैलीत उर्दू काव्यवाचन करणे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. भारतीय लोकशाही, कायदा, न्यायदान पद्धती इ. विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून आपली मते परखडपणे व्यक्त केली आहेत. डेमॉक्रसी इन इंडिया अँड द जूडिशल प्रोसेस (१९६६), जूडिशल मेथड्स : यूएस्ए अँड इंडिया (१९७७), द फिफ्थ अँड सिक्स्थ शेड्यूल्स टू द कॉन्स्टि-ट्यूशन ऑफ इंडिया (१९८४) इ. त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीयआहेत. यांशिवाय त्यांनी भारतात व परदेशांत प्रसंगोपात्त केलेली भाषणे ‘ए जज्स मिसलेनी’ या शीर्षकार्थाने संग्रहित केलेली आहेत. शिवाय त्यांनी मुल्लाज मोहमेडन लॉ या पुस्तकाचे संपादन केले. त्यांचे आत्मवृत्त मायओन बॉसवेल (१९८०) त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकते. 

 

हिदायतुल्ला यांनी हिंदू मुलीशी विवाह केला होता (१९४८). त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. मुलीचे अकाली निधन झाले. मुलगा अर्शाद वकिली व्यवसाय करतो. 

 

मुंबई येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. 

गुजर, के. के.