अहमद बिन हनबल : (? डिसेंबर ७८०–३१ जुलै ८५५). प्रख्यात अरबी धर्मशास्त्रवेत्ता, बगदादचा इमाम, न्यायशास्त्रकार, परंपरावादी व त्याच्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या सुन्नी कायद्याच्या एका शाखेचा संस्थापक.

न्यायशास्त्र, कोशरचना व परंपरेचा (हदीस) अभ्यास बगदाद येथे केल्यानंतर त्याने पैगंबराच्या खऱ्या परंपरेच्या अभ्यासाकरिता इराक, हेजॅझ येमेन आणि सिरिया या प्रदेशांत अनेक वेळा प्रवास केला.

 त्याच्या मते कुराण स्वयंभू असून ते कोणीही निर्माण केलेले नाही. त्यामुळे अल्-मामून (७८६–८३३) व त्याच्या नंतरच्या खलीफांच्या कारकीर्दीत त्याचा फार छळ झाला. पण अल्-मुतवक्किलच्या कारकीर्दीत (८४७–८६१) त्याच्या विचारसरणीचा विजय झाला व तो अत्यंत लोकप्रिय झाला.

संप्रदायाच्या चाकोरीतला हनबल हा स्वतंत्र विचारवंत होता. मसनद ही त्याची प्रचंड व अभिजात कृती होय. त्यात सर्व इस्लाम संप्रदायांची क्रमाने माहिती दिली आहे.

फैजी, अ. अ. अ. (इं.) श्रीखंडे, ना. स. (म.)